Saturday 11 April 2015

वन्स अपॉन अ टाईम (१५).....

जुन्या क्रिकेट टीम मधली विशेषत: महाराष्ट्रीयन खेळाडूंची नावं वडिलांच्या नावासकट लक्षात ठेवायची खोड होती तेंव्हा मला. उदा  सु.मनोहर गावसकर. दि.बळवंत वेंगसरकर, रविशंकर जयंद्रथ शास्त्री, सं.मधुसूदन पाटील. पण दोन नावांशी आलो की मला प्रश्नं पडायचा एक एस.एम.एच.किरमाणी आणि दुसरं आर.एम.एच.बिन्नी. तीन इनिशियल कशी काय या दोन नावात तेंव्हा काही गुगल नव्हतं त्यामुळे ते शोधायला बराच काळ गेला. असल्या निरुपयोगी गोष्टी शोधण्यात पण मजा असायची तेंव्हा. दोन वेगवेगळ्या मासिकात मला ती माहिती मिळाली 'सैद मुजतबा हुसेन किरमाणी' आणि 'रॉजर मायकेल हम्फ्रे बिन्नी'. कसलं भारी वाटलेलं तेंव्हा. 

८३ च्या वर्ल्डकपला नाकाशी सूत धरण्याची वेळ आली होती झिम्बाब्वेविरुद्ध त्यावेळी नवव्या विकेटकरीता कपिल देव बरोबर नाबाद एकशेसव्वीसच्या भागीदारीचं गाठोडं बांधायला हाच उभा होता. ८३ च्या वर्ल्ड कपला त्याला बेस्ट कीपरचं अवार्ड मिळालं होतं. रामानी सेतू बांधताना ज्या खारीच्या पाठीवर हात फिरवून डिझाईन काढलं त्यांच्या वंशातली अनेक लोकं आजूबाजूला दिसतात, ते बिचारे आपली कामं करत असतात, कुणी कौतुक करो न करो, श्रेय मिळो न मिळो, रामाचा एकदा हात फिरलाय पाठीवरून यांना हाच आनंद मोठा, याची उत्तम उदाहरणं म्हणजे आपला किरमाणी, यशपाल शर्मा आणि न्यूझीलंडचे गेविन लार्सन आणि ख्रिस हरीस. तीस चाळीस रन हमखास करतील, एक बाजू लावून धरतील, ओव्हर्स खेळून काढतील, पार्टनरशिप करतील, ओव्हर्स टाकतील, फिल्डिंग करतील, व्यवस्थित क्याचेस घेतील बट नथिंग मि-याक्युलस. हेच त्यांचं दुर्दैव. एकदा तुम्ही स्वामी समर्थ झालात की आयुष्यं भर लोकांना सांगायचं 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'. हे कायम मागेच उभे त्यामुळे. 
 
तेंव्हा प्रत्येक देशाचा एकेक भन्नाट आणि लायक कीपर होता आणि तो दीर्घकाळ असायचा. वासिम बारी, नॉट, रॉडनी मार्श, जेफ दुजां, इयान स्मिथ सगळे टीममधे फिक्स असायचे. आपला किरमाणी दहा वर्ष टीममध्ये होता. त्याच्यानंतर जास्ती काल खेळलेला धोनीच असेल माझ्या मते. साबा करीम, पार्थिव पटेल, दीप दासगुप्ता, विजय दहिया, सदानंद विश्वनाथ, चंद्रकांत पंडित, समीर दिघे असे अनेक आले नी गेले. त्यामानानी नयन मोंगिया, किरण मोरे बरंच खेळले. आत्ता एवढ्या टेस्टस तेंव्हा नव्हत्या नाहीतर किरमाणी किती सरस होता ते लोकांना आकड्यांवरून समजलं असतं. इयान हिली आणि किरमाणी यांच्यात साम्यं काय तर दोघंही बॉल स्पिन कुठे होणार ते फलंदाजाच्या आधी ओळखायचे आणि फरक काय तर हिलीला मजा घ्यायला स्पिन आणि पेस दोन्ही होतं, किरमाणीची कपिल आणि घावरी मधेच यादी संपायची. आकडे बघा हिली (अनुक्रमे झेल/स्टंपिंग) ११९ टेस्टस - ३६६/२९, वनडे - १९४/३९, किरमाणी - ८८ टेस्टस - १६०/३८, वनडे - २७/९). वनडे सोडा, पण टेस्टमधे ऑस्ट्रेलिया सारखी बॉलरची फौज आपल्याकडे असती तर किरमाणीचे आकडे म्हणजे सुके बोंबिल - कितीही झाकले तरी दरवळत उठले असते. 

मिशी ठेवलेल्या गावस्करच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड सिरीज खेळलो होतो आणि जिंकलोही होतो. त्यात बॉर्डरचा भन्नाट झेल घेताना त्याचा पाय वाईट्ट दुखावला गेला आणि त्याला राहिलेल्या सामन्यात बाहेर बसावं लागलं आणि मग कायमचंच घरी बसावं लागलं. सदानंद विश्वनाथ तरुण होता, तो जास्तं फीट होता. संदीप पाटीलच्या 'कभी अजनबी थे' मधे त्यानी छोटासा रोल केला होता. पण सज्जन माणूस, उगाच वादविवाद नाहीत, स्लेजिंग नाही, आपलं काम भलं नी आपण भलं. 

हिलीच्या देशात जन्माला आला असता किंवा आपल्याकडे बॉलरची रेलचेल असती तर किरमाणी त्याच्यासारखे किंवा इतर यशस्वी कीपरसारखे आकडे बाळगून असता. काही म्हणा, योग्यं ठिकाणी आणि योग्यं वेळी जन्माला येणं याला सुद्धा नशिब लागतं आणि असलं समजा नशिबात तरी फायदा घेता येतोच असंही नाही म्हणा (भेटा अथवा लिहा - विनोद कांबळी). 

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment