Wednesday 1 April 2015

वन्स अपॉन अ टाईम (१४)..... वीरेंद्र सेहवाग

मनमोहन देसाई आणि विरेंद्र सेहवाग यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय.

१) दोघंही त्यांना आवडेल, रुचेल तेच करायचे


२) लॉजिक वगैरे गोष्टीशी त्यांच्या काहीही संबंध नसायचा 
३) हिट/फ्लॉप असल्या क्षुल्लक गोष्टींची ते फिकीर करायचे नाहीत 
४) दोघंही मास एंटरटेनर होते
५) दोघांचाही शेवट चांगला झाला नाही


सेहवाग, तेंडूलकर, अमला आणि रोहित शर्मा ओपनिंगला बढती मिळाल्यावर जास्ती चांगले खेळायला लागले (सन्माननीय अपवाद रवि शास्त्री). सेहवाग आला तेंव्हा तो तेंडूलकरसारखे हुबेहूब फटके मारायचा, अगदी झेरॉक्स काढल्यासारखे. पण फटके मारताना त्याला पुस्तकी शिक्षण वगैरे मान्यं नव्हतं. इच्छा झाली की तो त्याला हवा तो फटका मारू शकायचा कारण डोळे, हात आणि मेंदू याचा समन्वय त्याला उपजत होता, पायांची हालचाल, कोपर अमुक अंशामधे हवं असले किचकट, वेळखाऊ प्रकार त्याला जमले नाहीत. ब्रॅडमन म्हणालेला, ब्याट चेंडू मारण्यासाठी आहे, सोडण्यासाठी नाही. त्या लायकीचा खेळ व्हिव रिचर्डस आणि आपला सेहवाग करायचे. बरं तो उपजत क्रिकेटिंग उर्मट होता, समोरच्या बॉलरचं नाव मोठं आहे, पिच कंडिशन काय आहे, स्विंग मिळतोय का, फिल्डिंग काय लावलीये असले विचार त्याच्या डोक्याला त्रास द्यायचे नाहीत. 

टेस्टच्या तीन स्लीप, गली या फिल्डिंगचा सगळ्यात जास्ती फायदा यानी घेतला असेल. कव्हर मधून मागे शिकारी कुत्रं लागल्यासारखा बॉल पळायचा त्याचा. रजनीकांतच्या बालचित्रपटात ती बंदुकीची गोळी कशी स्लोमोशन मधे दाखवतात तसा याचा कव्हरचा चौकार स्लोमोशनला दिसायचा. तो आणि तेंडूलकर आळीपाळीनी वाजवायचे, बरं पहिला आउट होण्याचा बट्टा तो सचिनला लागू द्यायचा नाही हा बोनस होता. माझं मी काम केलंय, चेचून आलोय, तुम्हांला जमतंय तर धुवा नाहीतर माझ्या करणीवर फिरवा बोळा. ते काम विकेट पडल्याच्या नावाखाली आपले बाकीचे लोक प्रामाणिकपणे प्रयत्नं करून रनरेट दारिद्र्य रेषेखाली आणायचे. 


बॉलरना ओपनिंगलाच धुतलं की मग ते आणि त्यांचे साथीदार शांत पडतात हे जयसूर्या आणि कालुवितरणानी पहिलं शिकवलं ते सेहवाग तेंडूलकरनी पुढे नेलं. तो अपमान केल्यासारखा मारायचा बॉलरला. बरं ते करताना तो ते सगळं शांतपणाने करायचा त्यामुळे अजून चिडचिड व्हायची बॉलरची. रेकॉर्ड वगैरेचा हिशोब ठेवणारा हा माणूस नव्हे. पुण्यं केल्यासारखं तो आपलं काम करत जायचा. तरीही त्याच्या नावाला पुढचे रेकॉर्ड चिकटलेच आपोआप - वेगवान अडीचशे (२५०-२०७ चेंडू) त्रिशतक (३००-२७८ चेंडू), भारतातर्फे फास्टेस्ट शंभर (६० चेंडू), कसोटीत त्रिशतक आणि वनडे मधे द्विशतक काढलेला पहिला खेळाडू (वर्ल्डकपमधे गेलनी त्याची बरोबरी केली). 


२०११ च्या वर्ल्डकपला टीम मिटिंग होती ओपनिंग म्याचच्या आधी (बांगलादेश विरुद्ध - कारण त्यांचा २००७चा दणका जिव्हारी लागला होता). कर्स्टन आणि मंडळी प्लानिंग करतायेत आणि हा आपला काही संबंध नसल्यासारखा गाणी ऐकत होता. कर्स्टन त्याच्यावर उखडला. तो म्हणाला, बांगलादेश विरुद्ध काय करायचाय प्लान, जायचं आणि धुवायचं. आपण ४-३७० केल्या त्यात ह्याच्या १७५ होत्या. आत्मविश्वास म्हणायचा की बोलण्यातला आगाऊपणा हे ज्याचं त्यानी ठरवावं. पण निदान त्यानी बोलला ते करून दाखवलं.   


त्याला तसंही एका कानानी ऐकायला कमी यायचं, त्यात त्यानी चष्मा लावायला पण उशीर केला, आयपीएलच्या एका म्याचला रनरेट वाढावा म्हणून सिंगल घेऊन समोरच्याला स्ट्राईक देणारा वीरू पाहिला आणि वाईट वाटलं. काळाचा महिमा. कुठे थांबायचं हे कळायला हवं. कळत असावं पण मोह जिंकत असेल. वाढतं वय, कमी झालेले रिफ्लेक्सेस आणि हरपलेला फॉर्म. वाईट काळ आला की आजवरच्या दुर्लक्षित चुका पहिल्या दिसतात. लोकांना आधी चौकार, षटकार दिसायचे, पडत्या काळात लगेच त्याचे न हलणारे पाय दिसू लागले. हत्ती दलदलीत सापडला की बाहेर पडायचा मार्ग सांगायला त्याच चिखलातला बेडूकपण सल्लागार होतो म्हणा. 


तर तात्पर्य निरोपसमारंभ सुद्धा नशिबात लागतो. वगळल्यावर ते कौतुक नशिबात नाही म्हणून संसारात काय, खेळण्यात  कुठल्याही क्षेत्रात, ऐन भरात असताना, शिखरावर असताना निवृत्ती स्विकारता यायला हवी. गावसकर म्हणालेला ते कोरलं गेलंय अगदी "लोकांनी 'का' विचारलं पाहिजे, 'कधी' नाही"


जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment