Tuesday 14 April 2015

घेता घेता एक दिवस…….

हॉटेल रविराजला ९१ ला कामाला होतो अकौंटसला. शिकाऊ म्हणजे कमी पगारात पडेल ते किंवा कुणाला नकोसे झालेले काम करण्यासाठी घेतलेला त्यापेक्षा ठेवलेला माणूस. तर तेंव्हा रिकव्हरीचं काम पण माझ्याकडे होतं. हॉटेलची म्हणजे दारूची वर्षानुवर्षे थकलेली बिलं होती तिथे. दिग्गज लोक होते, मोठ्या नावांचा फायदा घ्यायचे. पैशाची मस्ती आणि त्यामुळे समोरच्याला तुच्छ लेखण्याची अंगभूत गुर्मी. पैशांनी गरीब असलेला माणूस एखाद्याचे पैसे बुडवतो ते नाईलाज म्हणून पण त्याच्या चेह-यावर ती खंत, लाज कायम बाळगतो तो. आताच्या काळातही बँकांची कर्ज प्रामाणिकपणे कोण फेडत असेल तर तो नोकरदार किंवा गरीब ज्याने दोन जामीनदार वगैरे रीतसर दिलेत आणि जो बँकेचा फोन आला तर अपमान समजतो तो. 

थकितची यादी भली मोठी होती, कंपन्या होत्या, वैयक्तिक खातीही होती. त्याकाळात १५ लाख जुन्यापैकी येणं बाकी होतं. 'वसूल कर, दोन टक्के तुला'. पगार पाचशे. गेला बाजार दहा लाख आणले तर वीस हजार मिळणार. घरी गेल्यावर लगेच झोपलो आणि मुंगेरीलाल के हसीन सपने चालू. बावीस हजार खर्चाची यादी सकाळपर्यंत तयार. वीसशे सोडा, दिवाळीला आम्ही टेम्पररीला बोनस देत नाही असं सांगितलेलं मला. तर येणेका-यांमध्ये एक किर्लोस्करांपैकी होते, पाच-दहा हजार काय अवघड नव्हते त्यांना त्या काळातही एकावेळी द्यायला. औंधला मी जायचो, एकदा सकाळी आठला गेलो कारण ते कधीच भेटायचे नाहीत. आडनावामुळे फार बोलायचो नाही मी. ते गार्डनमधे आठ वाजता अंब्रेला लावून हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन बसलेले. त्यांच्या बायकोला लाज वाटली, ती म्हणाली नका येऊ तुम्ही, किती अमौंट आहे मी पाठवते चेक दोन दिवसात. पैसे आले ते. 

एफसी रोडला एक सुपर शॉपी होती चांगली दोन मजली. तेंव्हा मॉल नव्हते, त्यामुळे सगळा कन्सेप्टच नवीन होता. नवरा बायको दोघं बघायचे सगळा खेळ. रोज दुपारी दीड दोनच्या सुमारास आणि रात्री उशिरा एक-दोन पेग आणि जेवायचे येउन, मग घरी. टेबल रिझर्वड लागायचं, वागण्यात मस्ती होती ती वेगळीच. सहा महिने एक रुपया दिलेला नव्हता. दीड एक लाख असतील बाकी. क्रेडीट बंद केलं त्याचं मालकांनी एक दिवस. मग त्याचा इगो दुखावला. तीन महिने रोज जात होतो मी चेक साठी, आणले सगळे पैसे. केबिनच्या आत बसून सांगायचा मी नाहीये सांग, मागच्या दारानी पळायचा, चेक भिरकावल्यासारखा फेकायचा. मग मी ही अरे तुरे करायचो. 'आहे का रे, बघ थाप सुचतीये का नवीन, नाहीतर मी सांगतो' हे त्याच्या माणसाला बोलताना ऐकलं त्यानी. जाम झाली चारचौघात. सोडला नाही, वयानी मोठ्या माणसाचा अपमान मी करत नाही पण जिरवली त्याची. गृहस्थ, घर, बायको असलेला माणूस रोज हॉटेलमधे कसा काय जेवू शकतो हा मला तेंव्हा पडलेला गहन प्रश्नं होता. पैसा आला की सुख मिळवण्याच्या व्याख्या बदलतात.

एक प्रसिद्ध, सेलेब्रेटी चित्रकार, फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या इंटेरिअरची काम घ्यायचे त्यामुळे भेट मुश्किल. एकेक चित्रं लाखाच्या हिशोबात विकलं जायचं, माणूस सतत विमानात फिरणारा. दोन वर्षापूर्वी पार्टी केलेली त्यातलं थोडं बिल बाकी होतं. पत्रं टाकली, मेसेजेस ठेवले दरवाज्याला लावून, उपयोग काही नाही. मालक म्हणाले, अरे तो वैशालीला येतो रविवारी काहीवेळा सकाळी. आम्ही सातला हजर. नशिब असं की तो एकटाच बसलेला. विषय काढला, तेंव्हा त्यानी अशा तुच्छतेनी बघितलं की आम्ही भिकारी आणि काहीतरी लाचारासारखी मदत मागतोय. समोरच रहायचा वैशालीच्या. चेकबुक मुंबईच्या घरी आहे म्हणाला, मग पोस्ट करतो म्हणाला, मालक म्हणाले मला पैसे आज हवेत, मग रागानी घरी नेवून सगळे पैसे दिले रु.सात हजार असतील फक्तं. शक्यं नव्हतं देणं? पण मी कलाकार आहे, वेगळा आहे, असामान्यं आहे, मला पैसे मागून लो लेव्हलला आणताय तुम्ही असा सगळा थाट होता. 

विंदा करंदीकर चुकलातच तुम्ही, "देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणा-याचे प्राण घ्यावे" असं लिहायला हवं होतं तुम्ही, विजय मल्ल्यानी सगळ्या ऑफिसमधे या ओळी लावल्या असत्या अर्थात त्याचे पैसे नसतेच मिळाले म्हणा तुम्हांला. 

--जयंत विद्वांस     

No comments:

Post a Comment