Tuesday 7 April 2015

लाईक्स आणि कॉमेंट्स…

कौतुक! कौतुक प्रत्येकाला हवं असतं. एक वर्षाच्या मुलाला सुद्धा लक्ष दिलेलं, कौतुकमिश्रित प्रेमानी बघितलेलं आवडतं त्यामुळे ते आपल्या बरोबर रहाणारच. एफबीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. साहित्यिकांची वीण तिथे जोरात प्रसवली गेली कारण इतकी वर्ष तशी काही उमटायची सोय नव्हती. ती अचानक मिळाली. माणूस हा सहवास प्रिय आणि वसाहत करून रहाणारा प्राणी आहे कारण त्याचेही फायदे तोटे आहेत. तीच आयडिया एफबी वर आहे. नविन गोष्टं आत्मसात करताना ती आपल्या सोयीची कशी करता येईल हा विचार आपण प्रथम करतो. ग्रुप्स करा, एकमेकांना उचलून धरा, विरोध करणा-याची खिल्ली उडवा, त्याला पळवून लावा हा वसाहतवाद आला, प्रत्येकाची टेरिटरी ठरली. 

एफबीनी ती मानसिकता कॅश केली आणि ग्रुप्स, पेजेस, इनबॉक्स, स्टेटस प्रकार आणले. एफबीवर सगळेच वाईट लिहितात? नाही, पण चांगलं वाचायला तिथे कुणी येत नाही फार. वेळ घालविणे, खिल्ली उडवणे, जोक्स, कोट्स, फोटो पेस्ट करणे, काड्या घालणे, वाट्टेल त्या कॉमेंट करून वाद निर्माण करणे, चेहरे बघून रिक्वेस्ट पाठवणे, जमलंच काही तर संपर्क वाढवून च्याटिंग करणे, अंदाज घेत इप्सित साध्यं करणे, दुस-याचे विचार नाव वगळून आपल्या नावावर खपवणे आणि अशी अनेक कारणं आहेत एफबीवर येण्याची.

ट्याग हा एक त्रास त्यामुळेच चालू झाला. या, बघा आणि माझं कौतुक करा. ग्रोइंग, ग्रोन अप असे दोन शब्दं फार महत्वाचे आहेत. एफबी नवीन होतं तेंव्हा ग्रोइंग स्टेज समजू शकतो पण अजूनही ग्रोन अप व्हायला आपण तयार नाही. आपण बायकांना नावं ठेवतो पण पुरुष तेचं करतात की, "तू नाही ना माझी पोस्ट बघितलीस, जा, कट्टी, मी पण नाही बघणार तुझी". हा रोग आहे त्याला इलाज नाही. एफबी हा न्यूजपेपर आहे. उद्या शिळा होणारा. मग त्यासाठी 'दिसामाजी काहीतरी लिहित जावे' याचा सोयीस्कर अर्थ काढून मी कुठे आहे, काय खातोय, गावाला कधी जाणार आहे, काय ऐकतोय, काय फील करतोय वगैरे प्रकार टाकायचे आणि चार जणांच्या सेम प्रकाराला लाईक करायचं, अर्थात वसाहतवादी लोकांच्याच फक्तं.

मागे एक किस्सा ऐकून मी गार पडलो होतो. एका गृपवर एक कविवर्य रोज साधारण एक कविता पोस्टायचे. साठीच्या आसपास असतील. मोतीचुराच्या एकसारख्या नाजूक बुन्द्या पाडाव्यात तशा ते साचेबद्ध बुंद्या झा-यातून पाडायचे. मुद्दा तो नाही. तर त्यांची एक कविता कुणीतरी त्याच्या नावाने पोस्ट केली आणि ते ह्यांना सापडलं. मग त्यावर चर्चा चालू झाली त्यावेळी त्यांनी चोरी कशी सापडली याचं दिलेलं स्पष्टीकरण वाचून मी वेडा झालो. 'मला एक कविता पोस्टायला साधारण दीड तास लागतो इतक्या ग्रुप्स मधे मी आहे, त्यामुळे पोस्टवर माझं टायमिंग आहे की जे चोरणा-याच्या आधीचं आहे म्हणून त्यानी ते चोरलंय हे मी सिद्ध करू शकतो'. मी सर्वसाधारण हिशोब केला. दीड तास? म्हणजे कमीत कमी पन्नास ग्रुप्स तरी असावेत. बरं तिथल्या नोटिफिकेशंस येणार. लाईक आणि कॉमेंटवाल्यांचा नाव ट्याग करून आभारसोहळा होणार (प्रत्येक नावाला वेगळी कॉमेंट, परत त्याला लाईक किंवा उत्तरादाखल कॉमेंट येईल तो हिशोब वेगळाच) म्हणजे नोटिफिकेशंस अनलिमिटेड. साठी पार केलेल्या माणसाची ही त-हा तर नवीन माणसाला काय बोलावं.

आपण जे लिहितो, व्यक्तं होतो ते चिरकाल स्मरणात राहील अशी आपल्याला खात्री नाही त्यामुळे हे घडतंय.नाव निघाल्यावर त्याचं लिखाण आठवावं असं प्रत्येकाच्या बाबतीत घडणार नाही हे मान्य आहे पण मग अट्टाहास निर्माण झाला की हे चालू होतं. अटेन्शन सिकिंग सिंड्रोम. माझी लायकी नाहीये हे मला माहित आहे पण म्हणून काय मी मागे रहायचं का? माझ्यासारखे भरपूर आहेत की इथे, चला टोळी बनवूयात. एकता हीच शक्ती. आयपीएलचं तत्वं. वेगवेगळ्या टोळ्या, मेंबर कधीही बदलू शकतात, जे आहेत त्यांच्या बरोबर करमणूक करा विसरून जा. मास महत्वाचा, क्लास गेला …. त. लाईक्स आणि कॉमेंट्स, पॉपकॉर्न आणि पेप्सी, जोडीनं रहायला शिका, एकटे पडाल नाहीतर!!!! :D :P ;)

--जयंत विद्वांस
(कृपया यातील कुठलाही मुद्दा कुणीही वैयक्तिक घेउ नये कारण तो कुणालाही उद्देशून लिहिलेला नाहिये.)




No comments:

Post a Comment