Monday 25 May 2015

दो बिघा जमीन.....

शंभू महातो, त्याची बायको पारो (निरुपा रॉय) आणि मुलगा कन्हैया एवढं कुटुंब. गावाच्या जमीनदाराचं (मुराद) कर्ज असतं त्याच्यावर. त्याला त्याच्या जागेवर मिल काढायची आहे पण नेमकी मध्यात शंभू महातोची जमीन आहे. शंभूनी त्याच्याकडून पैसे उसने घेतले आहेत त्यामुळे तो ती जागा आपल्याला देईल याची त्याला खात्री आहे. शंभूच्या जगण्याचा एकमेव सहारा ती जमीन आहे. मुराद त्याला उद्याच्या उद्या पैसे परत दे नाहीतर जमिनीचा लिलाव करेन म्हणतो. बरं हिशोबानी कर्ज किती, तर एकूण रुपये ६५ फक्तं. शंभू घरातल्या वस्तू, बायकोचं कानातलं विकून ६५ रुपये गोळा करतो आणि त्याच्याकडे जातो. फुगवलेली रक्कम असते २३५ रुपये. कोर्टात ती रक्कम तीन महिन्यात फेडण्याची सवलत त्याला दिली जाते. शंभू आणि त्याच्या बरोबर हट्टानी, फसवून आलेला त्याचा मुलगा कन्हैय्या कलकत्त्याला जातात. रिक्षा चालवून पैसे गोळा करायचे आणि जमीन वाचवायची यासाठी.

शंभू नझीर हुसेनची रिक्षा चालवतो, हमाली करतो, त्याचा मुलगा जगदीप बरोबर बूट पॉलिश करतो. तिसरा महिना संपत आलाय. जास्तीत जास्ती पैसे गोळा करण्यासाठी तो पैशेवाल्याच्या हौसेसाठी रिक्षाची रेस लावतो, त्यात चाक निघतं आणि त्याला अपघात होतो. बापाची हालत बघून कन्हैया पाकीटमारी करतो. इकडे काही वार्ता नाही म्हणून काळजीत पडलेली पारो कलकत्त्याला येते. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्नं होतो. तिथून पळताना ती गाडीखाली येते आणि  तिला दवाखान्यात नेण्यासाठी कडेनी जाणारी रिक्षा नेमकी शंभूचीच असते (मनमोहन देसाईला नावं ठेऊ नका आतातरी). कन्हैय्या इकडे पैसे चोरतो. आईला दवाखान्यात बघून त्याला वाटतं चोरीबद्दल देवानी शिक्षा दिली म्हणून तो ते पैसे फाडून टाकतो. शंभूची सगळी पुंजी पारोवर खर्च होते. इकडे गावात त्याच्या जमिनीचा लिलाव होतो. तिघे गावाकडे येतात आणि स्वत:च्याच जमिनीवर परके होतात. तिथली मुठभर माती घेणा-या वेड्या शंभूला रखवालदार मनाई करतो. जगण्यासाठी जगाच्या पाठीवर ते दिशाहीन निघतात आणि चित्रपट संपतो.

साधारण २/३ एकर म्हणजे दोन बिघे. साधारण ६२ वर्ष झाली या सिनेमाला. तेंव्हाही जागेला किंमत होती आणि आजही आहे. आता जागा बळकावण्याची पद्धत बदलली , एवढाच काय तो फरक. ४८ च्या बायसिकल थिव्हज वरून प्रेरित होऊन हा सिनेमा काढला असं वाचलंय, पण तो मी काही पाहिलेला नाही. Top 25 Must See Bollywood Films मधे दो बिघा जमीन आहे. अर्थात त्यात दिलंय म्हणून मी तो पाहिलेला नाही, न कळत्या वयात तो मी टी.व्ही.वर पाहिला होता. उर फुटस्तोवर रिक्षा चालवणारा माणूस म्हणजे अजय उर्फ परिक्षित सहानीचा बाप बलराज सहानी, इंग्लिश साहित्यात मास्टर आणि हिंदी साहित्यात पदवी घेतलेला एक उच्च शिक्षित माणूस आहे असं बघताना एका कळत्या माणसानी सांगितलं. तेंव्हा अभिनय वगैरे म्हणजे काय हे कळायचं वय नव्हतं. पण एवढं शिकून पण रिक्षा चालवतो म्हणजे हा माणूस फार भारी आहे हे मत कायम झालं. पुढे वक्त मधला 'ऐ, मेरी जोहराजबी' गाणारा, काबुलीवालामधे रडवणारा बलराज सहानी, कठपुतली मधे सुबीरसेनच्या आवाजात पियानोवर बसून 'मंझील वोही है प्यार की' म्हणणारा, सीमा मधला खुर्चीत बसून 'तू प्यार का सागर है' म्हणणाता बलराज सहानी आवडत गेला.
 मागच्या वर्षी मी एका च्यानलवर हा चित्रपट बघितला. डिप्रेशन आल्यासारखं झालं. आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी सांगतात त्या बदलल्या पाहिजेत. चांगल्याचं चांगलं होतं, देव संकटात मदत करतो वगैरे बदलायला हवं सगळं असं वाटून गेलं. सगळी पात्रं अभिनयानी जिवंत केली, ते त्या भूमिका जगले वगैरे सगळं नाही आठवलं मला हा चित्रपट बघताना. पैसे गोळा करण्यासाठी राब राब राबणारा, मुलगा आजारी पडल्यावर चिंताक्रांत झालेला, आपल्याच जमिनीकडे सर्वस्वं हरवल्यासारखा बघणारा बलराज सहानी आपला कुणीतरी जवळचा वाटून गेला. पैशाकडेच पैसा जातो हेच खरं. सगळीकडे कंपन्या काढून खायला उगवण्यासाठी जमीन उरणार नाही अशी भीती वाटते. मिडास राजाची गोष्टं खरी होईल कदाचित. हात लावाल तिथे सोनं लागेल पण सोन्याचा घास कदाचित मिळणार नाही.   

हरियाला सावन ढोल बजात आया, आजा री आ निंदिया आणि धरती कहे पुकारके ही तिन्ही गाणी मला आवडतात यातली. अपनी कहानी छोड जा,  चुनरी सम्हाल गोरी आणि ए भाय चं शेवटचं कडवं (आणि अर्थात अशी अनेक गाणी) मन्नाडेनीच म्हणावीत.  'धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के, मौसम बिता जाय' या गाण्यातला आशावाद आता साहित्य म्हणून उरलाय किंवा त्या अर्थानीच वाचायचा. कसला आलाय पापभिरूपणा असं वाटणं आता दृढ होत चाललंय. आतापर्यंतच आयुष्यं पापपुण्याच्या, समाजाच्या, संस्काराच्या भीतीनी स्वत:च्या इच्छेप्रमाणे मला किंवा अजून कुणाला जगता आलंय? आयुष्यं सरायची वेळ आली तरी राहून गेलेल्याची यादी खूप मोठी रहाते आणि मग एखाद्या क्षणी आपणच बाळगलेल्या तत्वांचा आपल्याला राग येतो. हताशपणा वाढतो, चीड येते पण काहीही करू शकत नाही याची जास्ती चीड येते. धनदांडग्याच्या मनाप्रमाणे वागायचं किंवा मग धनदांडगे व्हायचं एवढेच दोन पर्याय उरतात. दो बिघा… अस्वस्थ करतो. निरुपा रॉय, बलराज सहानी, त्याचा बाप, कन्हैया यांच्या घरावर, चेह-यावर, कपड्यांवर चिकटलेली ती गरिबी, लाचारी नकोशी वाटते. 

ते तिघं परत जातात तेंव्हा ह्या ओळीनी मात्रं पाणी आलं डोळ्यात. 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस ओर तू फिर आये ना आय'. जिथे जन्माला आलो तिथून बेघर व्हायचं २३५ रुपयांसाठी? परत दिसेल ती भूमी की मेले असतील असेच कुठेतरी अज्ञातात? जगले असतील भिका-यासारखे खूप वर्ष सचोटीने की जगले असतील मनाप्रमाणे अल्पकाळासाठी जग वाईट म्हणतात त्या मार्गाला लागून? कोण कुठला शंभू महातो, मेला काय, जगाला काय, नाहीसा झाला काय, कोण नोंद ठेवणार? असे असंख्य महातो जगाच्या पाठीवर चरफडत असणार, उध्वस्त होत असतील, मातीवर प्रेम करताना माती होत असतील, जाना देव. रोज थोडं थोडं मरायचं आणि मरेपर्यंत त्याला जगणं म्हणायचं, थूत असल्या जिंदगी वर.

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment