Thursday 30 July 2015

लल्याची पत्रं (२४)…. 'जब प्यार किया तो…'

लल्यास…… 

जुनी गाणी आठवली की नुसता अर्थ, चाल आठवत नाही. गायीमागे वासरू यावं तशा त्या गाण्याच्या ख-या खोट्या कथा, गाण्याशी संबंधित असलेले, नसलेले किस्से पाठोपाठ आठवतात. मुग़ल-ए-आज़म बद्दल आधीच खूप बोललं गेलंय, लिहिलं गेलंय. सलीम अनारकली फेमस करायचं काम एखाद्या पुस्तकानी केलं नसेल तेवढं ह्या चित्रपटानी आणि बीना रायच्या 'अनारकली'नी केलं असेल. नंतर हा सिनेमा रंगीत झाला तेंव्हा काही मी पाहिला नव्हता पण मूळ कृष्णंधवल सिनेमात एवढंच गाणं रंगीत असलेला पाहिला होता लहान असताना. सत्तर एमेम पडद्यावर मधुबाला आणि तो शीशमहाल बघताना अवाक झालो होतो. शब्दांचे अर्थ कळण्याचं ते वय नव्हतं पण कथा समजण्याइतपत होतं. 

मोठ्यांची दु:खं आणि स्वप्नंही मोठी, बिलोरी, खर्चिक आणि चकचकीत असतात. आपल्या कल्पनांची रेंज पण नसते एवढी भव्यं. के.असिफ राजा माणूस असणार, बडे दिलवाला. अपयशी ठरला असता तर त्याची पण स्टोरी झाली असती. लोक 'बाहुबली'च्या खर्चानी आ वासतात. त्याचा पूर्वज आहे असिफ. चित्रीकरण, संगीत, स्पेशल इफेक्ट यासाठी संगणकीय करामत नसताना त्यानी जे बघितलं आणि सत्यात आणलं त्याला तोड नाही. त्यातल्या बडे गुलाम अली खाँ यांचा किस्सा ऐक - लता, रफीला ३००-४०० मिळायचे तेंव्हा एका गाण्याला. बडे गुलाम अली पाहिजेतच हा असिफचा हट्ट. त्यांना फिल्म मधे गायचं नव्हतं म्हणून त्यांनी २५००० सांगितले, म्हणजे आपोआप प्रश्नं मिटेल. असिफनी लगेच निम्मी आगाऊ रक्कम दिली आणि त्यामुळे त्यांना गावंच लागलं. तो पादेल तेवढं बाकीच्यांना ओरडता पण येणार नाही बघ. त्यानी तीन चित्रपट काढले फक्तं - फूल, हलचल, मुगल-ए-आझम आणि अर्धवट लव्ह एन गॉड. अमाप पैसा, दहा बारा वर्ष खर्च करून काढला त्यानी मुगल. 


मूळ सुरैयाच्या जागी आलेल्या मधुबाला बद्दल काय बोलावं. सगळी कास्ट जबराच होती. कधीही फार न आवडलेला दिलीपकुमार, पृथ्वीराज कपूर, निगार, अजित आणि माझी अत्यंत लाडकी, राजस, महाराणीचं खानदानी सौंदर्य दाखवणारी मायाळू चेह-याची दुर्गा खोटे. मोठे कलाकार, सुंदर कथा, पैसा खर्च केला म्हणजे चांगली कलाकृती होते असं मात्रं नाही, दिग्दर्शक महत्वाचा ठरतो (पहा आणि वेडे व्हा - रामगोपाल वर्मा की {न लागलेली} आग). त्याच्या डोक्यात तो संपूर्ण खेळ तयार हवा. कशानंतर काय, कशासाठी, केंव्हा, का असे अनेक प्रश्नं त्यानी स्वत:ला विचारलेले असतात. एकूण परिणाम त्याला माहित असतो. त्याचा स्कायव्ह्यू असतो गरुडाचा. यातलं 'तेरी महफ़िलमे' गाणं पण तेवढ्याच तोडीचं आहे 'जब प्यार किया' च्या. गाण्याविषयी सांगता सांगता बाकीच्याच गोष्टी झाल्या बघ जास्ती पहिल्यांदा म्हणालो तसं.      

एकूण गाणी वीस होती, त्यातली बारा सिनेमात राहिली. खेबुडकरांनी व्ही. शांतारामांच्या पसंतीला पडेपर्यंत जसं 'पिंजरा'चं 'दे रे कान्हा' जन्माला येईपर्यंत जशी अनेक गाणी लिहिली तसंच शकील बदायुनीनी नौशादचा आत्मा शांत होइतोवर एकशेपाच वेळा हे गाणं लिहिलं. एक कोटी रुपयाचा किरकोळ खर्च ह्या गाण्यावर केला होता पण कॉम्प्यूटर नव्हता त्यामुळे इफेक्टसाठी नौशादनी लताला स्टुडीयोच्या बाथरूममधे गायला लावलं होतं. छतापासून सगळीकडे त्या बिलोरी आरशात दिसणारी ती शेकडोंच्या संख्येत दिसणारी स्वर्गीय छबी कशी होती ते शब्दात सांगता येणार नाही. हिमालय बघितला की त्या शुभ्र सौंदर्याचं वर्णन करता येत नाही म्हणे. अनिमिष डोळ्यांनी बघायचं फक्तं, आपल्या क्षुद्रत्वाची, सुखाच्या क्षणभंगुरतेची जाणीव निर्माण होईपर्यंत बघायचं फक्तं आणि पहाता आलं हे भाग्यं याचा अफाट शब्दातीत आनंद मानून घ्यायचा. मधुबालाचं तसंच आहे. बघायचं गप्पं, बोलायचं नाही काहीही.   



गाण्याचा अर्थ तुलाही माहितीये. लालबुंद झालेला धिप्पाड पृथ्वीराज, भयानी कंपित झालेली दुर्गा खोटे, तणावलेला दिलीपकुमार आणि हृदयाला भोक पडलेली, वास्तवात दिलीपकुमारच्या प्रेमात पडलेली, लाल सलवारीएवढेच लालचुटुक ओठ असलेली, शब्दातून, डोळ्यातून खुन्नस दाखवणारी, गातागाता करूण हसणारी, तू शहेनशाह आहेस तर मी पण अप्सरा आहे असं ठसवणारी, डोक्यावर पीस लावून नाचणारी, रत्नजडीत मधुबाला पहावी फक्तं. शेवटच्या ओळींला - परदा नहीं जब कोई खुदा से, बन्दों से परदा करना क्या - बादशहा पृथ्वीराजकपूरची मान अर्थ समजल्यानी खाली जाते, लताचा आवाज काळीज फाडून आत शिरत असतो, परिणामांची जाणीव असतानाही महाकाय सत्तेशी लढणारी ती अनारकली, समोर बसलेला तो असहाय्य सलीम अभागी वाटू लागतो. बघताना मलाही तसंच होतं, ओठ थरथरू लागतात, शेकडो प्रतिमा धुसर होतात, मधुबाला परत पहायची नाही, लता ऐकायची नाही आता, चाल ऐकायची फक्तं, अर्थ नाही असा विचार येतो आणि मग मी च्यानल बदलतो.

चल थांबतो, ओसरत नाही तो असर आहे हा सगळा.   
     
--जयंत विद्वांस 
***********************************************************

इंसान किसी से दुनिया में एक बार मोहब्बत करता है
इस दर्द को लेकर जीता है इस दर्द को लेकर मरता है

प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या
प्यार किया कोई चोरी नहीं की छुप छुप आहें भरना क्या

आज कहेंगे दिल का फ़साना, जान भी ले ले चाहे ज़माना
मौत वही जो दुनिया देखे, घुट घुट कर यूँ मरना क्या

उनकी तमन्ना दिल में रहेगी, शम्मा इसी महफ़िल में रहेगी
इश्क में जीना इश्क में मरना, और हमें अब करना क्या

छुप ना सकेगा इश्क हमारा, चारों तरफ़ हैं उनका नज़ारा
परदा नहीं जब कोई खुदा से, बन्दों से परदा करना क्या

(मुग़ल-ए-आज़म, नौशाद, शकील बदायुनी, लता मंगेशकर १९६०)
****************************************************************




1 comment:

  1. अनार कली:: धडकतें दील का पयाम ले लो
    तुम्हा री दुनिया से जा रहे हैं
    ...अब हमा रा सलाम ले लो..!!दिलीपकुमार सह दुनियेला ही सांगणारी.

    ReplyDelete