Saturday 1 August 2015

निरोप…

मला नेहमी तिला स्ट्यांडवर सोडायला जायची वेळ येते कारण मी तिच्या गावाला जाण्याचा प्रसंग विरळ. तिलाच असं नाही कुणालाही सोडायला गेलं की मला भरून येतं. घरातून पाहुणे जातानाही मला असं होतं. तीन मे ला आलेले मुकुंदा, नंदू, स्वरूपा जाणार होते. मी कामावर निघालो साडेआठला, ते नंतर जाणार होते (सावीला मी सकाळीच सोडलेलं स्वारगेटला), माझा काय पाय निघेना. मग तो संपूर्ण दिवस मला फार उदास वाटतं. त्यादिवशी त्यामुळे असेल पण मी जास्ती काम करतो. मी कुणाकडे गेलोय आणि त्याला मला सोडायला येताना भरून आलंय अशी ठिकाणं माझ्या आयुष्यात नाहीत फार. उलट माझ्या जाण्यानी होणारा आनंदच असू शकेल, असला तर. तर मूळ मुद्दा… 

तर एकदा मी तिच्या गावाला होतो. निघण्याचा वेळ जवळ येत चालला. मी एकटा जाऊन बस पकडून, खिडकीतून हात बाहेर न काढता येऊ शकतो खरंतर पण ती आली. पुण्याच्या बस ढिगानी लागलेल्या पण सगळ्या पुणे स्टेशन, मला स्वारगेट बरं पडतं. पण तिला अर्धा तास होता आणि स्टेशनची सुटणार होती दहा मिनिटात. मी स्वारगेटनी जावं असं तिच्या चेह-यावर होतं पण निरोप लांबला की त्यातली मजा जाते. आर्ट फिल्म सारखं घडत काहीच नाही, नुसतेच नजरेचे क्यामेरे फिरत रहातात. तिला रडू फुटण्याच्याच बेतात होतं. पण ती मुळातच हुशार आहे. गाडीत त्या दोन बोन्साय पाण्याच्या बाटल्या देतात की खरंतर पण पाणी घेऊन येते म्हणाली रोडच्या पलीकडून. 

ती फ्रुटी आणि बिसलेरीची बाटली घेऊन येईपर्यंत तिकीट काढून झालं होतं. गाडीत मी निरक्षर आहे, सीटचे इंग्लिश आकडे समजत नाही अशा भावनेने ती पुढे गेली, सीट दाखवली, मी ही शहाण्यासारखा बसलो लगेच. बसमध्ये पब्लिक नसतं तर तिनी बोनक्रशर मिठी मारली असती निश्चित. कंडक्टरच्या आवाजानी ती थरथरत्या ओठांनी आणि ओथंबलेल्या डोळ्यांनी खाली उतरली. बसच्या पुढे जावून फ्लायओव्हरच्या पिलरखाली जाऊन थांबली. बस वळून निघाली आणि तिनी हात केला माझी काच समोर आल्यावर. 

मी मान तिरकी करून बघत होतो. हरवल्यासारखा तिचा चेहरा आणि कधीही रडू फुटेल असे भरलेले डोळे. अशावेळी सिग्नल हिरवा असतो, रोड मोकळा असतो, गाडी सुसाट निघते. तिचा निरर्थक मेसेज आला 'नीट जा'. गाडी काय मी चालवणार होतो का? एसी गाडीला उघडी खिडकी नाही म्हणजे हात बाहेर काढणार नाही. हसू आलं. डोळ्यात पाणी आलं ते हसण्यामुळे असा समज मी करून घेतला आणि पुणं यायची वाट बघायला सुरवात केली. 

--जयंत विद्वांस
 

 

No comments:

Post a Comment