Thursday 20 August 2015

तो….

तसा मी माणूसघाणा माणूस आहे. तरीही काही लोकांशी मैत्रं  का जुळतं ते माहित नाही. उगाचच प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करणं हा माझा आणि त्याचा स्वभावही नाही. त्याचा म्हणजे 'तो' चा. साधारण तीनेक वर्षापूर्वी आमची ओळख झाली. आभासी जगातील ओळख म्हणजे चायना मेड मटेरीअल. ही ओळख अत्यंत आकर्षक दिसते, काही काळ चमकते, भुरळ पाडते पण कधी मान टाकेल सांगता येत नाही. आभासी जगातील माणसं लांब असतात तेंव्हा अतिप्रियं असतात, एकदा भेटले, घसट वाढली की हळूहळू अभिषेक बच्चनच्या करिअरसारखी त्या ओळखीला उतरती कळा लागते. एकमेकांना मिसणं कमी होतं जे मुळात नसतंच फार. माझं देव आणि मित्रं यांच्या बाबतीत सारखंच मत आहे. त्यांना रोज हात करायलाच पाहिजे असं काही नाही, दोघांना कळतं की कुठेतरी मनात आठवण शिल्लक आहे, म्हणायलाच पाहिजे असं काही नाही, दोघांना भेटल्यावर बोलण्यासारखं खूप असलं पाहिजे. तो तसाच आहे. आमच्या रोज उठून गप्पा होत नाहीत, महिनोनमहिने फोन होत नाहीत, हयात आहे, नाही, काहीही माहित नसतं पण असतं मनात कुठेतरी, करायला पाहिजे फोन म्हणून.  

तो एकटा आहे, अविवाहित (ब्रम्हचारी नाही). सहसा कुणाच्याही खाजगी आयुष्यात मी डोकावत नाही. आपण उगाच अर्धवट माहितीवर मत बनवण्यात काही अर्थ नसतो, आपल्याला सांगावंसं वाटलं किंवा आपली तेवढी लायकी आहे असं समोरच्याला वाटलं तर तो सांगतोच. त्यमुळे मी त्याला त्याचं कारण कधीच विचारलेलं नाही, विचारणारही नाही. काही लोकांचा सुखी होण्याचा मार्ग दुसयाची दु:खं, अडचणी विचारून ती आपल्याला नाहीत असा असतो. तर मूळ मुद्दा 'तो'. माझ्या पोस्ट्सना तो लाईक, कॉमेंट करायचा. तो फार कमी लिहितो पण रसिकतेने लाईक, कॉमेंट करतो. तसा तो मिश्किल आहे. ग्रेस, गुलजारचा झिजलेला कार्बन घालून खरडलेल्या दुर्बोध रचना(?), कविता त्याच्यासाठी उत्तम विनोदी लिखाण वाचायला मिळाल्याचा ठेवा असतो. पण तसा तो कुणाला नाराज करत नाही. त्याची कॉमेंट नसेल तर त्याचा अर्थ पोस्ट नजरेतून सुटली, त्याला वेळ नाही किंवा ती कॉमेंटायच्या लायकीची नाही एवढाच आहे.

गप्पा वाढत गेल्या मग तो माझ्या घरीही आला चारपाच वेळा. इतर लोकांबद्दल बोलणं कमी होऊन आपण एकमेकांविषयी बोलायला लागलो की आपण मित्रं झालो असं माझं मत आहे. त्याला महिन्यातून दहाबारा दिवस वाणं वाटत फिरायला लागतं जॉबमध्ये, त्यामुळे तो कधीही भेटायला येऊ शकतो. सुख आणि तो यात साम्यं आहे. दोन्ही कधीही येतात, न सांगता येतात, अल्पकाळ रहातात, पुढच्या येण्याची वाट बघायला लावतात. असाच तो मधे येउन गेला. 'तू कधी तरफडणार आहेस माझ्याकडे?' 'अरे, मी कशाला येतोय तिकडे आणि ते ही स्वखर्चानी? तुझ्यासारखं स्पॉन्सर्ड नशीब नाहीये बाबा माझं'. 'तुम्ही कधी सरळ बोलला आहेत का कोकणी, कुचकेपणा नसेल तर समोरच्याला चुकल्यासारखं होईल याची काळजी मात्रं सतत घ्या तुम्ही'. पुण्यात जन्म झाला की मुळामुठेच्या पाण्यातच असलेलं ते खवचट बाळकडू आपोआप मिळतं, वेगळे प्रयत्नं करावे लागत नाहीत. 

तर परवाच त्याच्याकडे जाउन आलो, आमचं बोलणं झाल्यावर दोनेक महिन्यांनी. मला त्याच्या गावात काम निघालं, त्याला फोन केला स्वस्तात लॉज कितीपर्यंत मिळेल? '**घाल्या, कुठल्या गाडीनी येणारेस एवढंच सांग, कुणाला घेऊन जायचंय का तिथे? मी सोडतो तासाभरासाठी हवंतर तिथे'. मी सकाळचाच उतरलो, पाच वाजेतोवर माझं काम केलं आणि त्याला फोन केला. शनिवार होता, तो घ्यायला आला, मग त्याच्या घरी गेलो. तीन रूमचा फ्लाट होता मस्तं. 'फ्रेश हो, गिळायला बाहेर जाऊ'. बाहेर गेलो आणि जेवून आलो. त्याच्या फ्लाटला मस्तं ओपन टेरेस आहे. खुर्च्या, पाय ठेवायला दोन स्टूल घेतली आणि बसलो. तो निर्व्यसनी आहे. त्यानी गाणी लावली एफेमवर. फोनची सेव्ह्ड गाणी ऐकायला कंटाळा येतो, आपल्याला क्रम माहित असतो, उत्सुकता रहात नाही, एफेमला ती मजा मिळते, कधी काय पदरात पडेल सांगता येत नाही. 'ये जिंदगीके मेले, दुनियामें कम न होंगे, अफसोस हम न होंगे' लागलं. 'तुझं वय किती रे?' 'तुझ्याएवढंच'. '२/३ आयुष्यं संपलं की रे'. मग विषयातून विषय निघत गेला आणि तो मोकळा झाला. 

'ब-याच दिवसांनी दोन आवाज ऐकले या भिंतीनी, रोज मी एकटाच बडबडतो. कंपनीचा फ्लाट आहे म्हणून नाहीतर मला काय करायच्यात तीन रूम्स, मी हॉल मधेच झोपतो तसाही. नाही केलं लग्नं, फार काही अडलंही नाही म्हणा तसं माझं. भाऊ माझ्यापेक्षा मोठा दहा वर्षांनी. त्याचं लग्नं झालं तेंव्हा मी दहावी झालो, दारू प्यायचा तो, मुंबईतील दोन खोल्या, आई, वडील, मी, ते दोघे . पाच माणसं रहायचो खुराड्यात. त्यांची रोज भांडणं चालायची. चुका दोघांच्याही होत्या, कुणाची बाजू घेणार? कंटाळलो सगळ्याला. घरात जाताना सतत दडपण असायचं, ग्राज्युएट झालो आणि लगेच नोकरी पकडली कारण पुणे ऑफिसला पोस्टिंग होतं. लगेच हो म्हणालो. पंचवीस वर्ष झाली बाहेरच आहे. त्याचा घटस्फोट झाला दहा वर्षांनी, मुलगी याच्याकडेच आहे. या सगळ्या रामायणात त्याचा जॉब गेला, आईवडील ही नाहीत आता. जोडून सुट्ट्या आल्या की मी जातो घरी, दोन दिवस रहातो, परत येतो. इच्छाच झाली नाही माझी, शरीराची गरज होतीच पण सारखी भीती वाटायची, असाच अनुभव आला तर?' 

'मी ठरवलंच, नको व्याप. देशविदेश, अनेक शहरं फिरलो, पाचशे रुपयापासून अठरा हजार रुपयापर्यंतचं क्षणभंगूर सुख विकत घेतलंय अगदी. आता त्याचाही फार मोह होत नाही, कंटाळा येतो खरंतर तेवढ्यासाठी जाण्याचा. असो! पण मी कामावर फेमस आहे, कमीतकमी सुट्ट्या घेणारा माणूस, लोकांना दिवाळी, ईद किंवा आपापल्या सणाला जायचं असतं तेंव्हा मी ग्यारंटीड लोकम असतो. सुट्टी घेऊन करू काय सांग, शनिवार रविवार मला निघत नाही इथे. तुला घर स्वच्छ दिसतंय ते माझा वेळ जात नाही दोन दिवस म्हणून. पण मी सुखी आहे. लोकांचे प्रॉब्लेम बघतो आणि सुटल्यासारखं वाटतं सगळ्यातून. शंभरेक पुस्तकं आहेत, डाऊनलोड केलेली वेगळीच. संध्याकाळी जेवण झालं की पुस्तकं किंवा एफबी वाचतो, कंटाळा आला की झोप येतेच मग. असो? काही 'माणसं' सापडली गेल्या काही वर्षात त्यांना भेटतो, रमतो, त्यांना आणि मला कंटाळा यायच्या आत निघतो. चुटपूट लागेल एवढाच सहवास असावा, काय म्हणतोस?' 'खरंय, निघणार आहे मी उद्या'. डोळ्यात पाणी येईस्तोवर हसलो. 'सरळ बोलशील तर शपथ, नवी पेठेत लांबच्या रोडनी नेणार बघ मी तुला'. मग झोप येईस्तोवर खूप बोलत बसलो. 

उशीराच उठलो. माझी चारची बस होती. त्यानी घरीच मटकीची उसळ, पोळ्या आणि भात केला. बाहेर जाऊ शकत होतो पण त्यानी हौसेने केलं. माझी मदत पाण्याच्या बाटल्या भरून घेणे एवढीच. त्यानी चांगलंच बनवलं होतं. जेवण संपताना लक्षात आलं हे तो रोज जेवतो. हॉटेलचं कौतुक आपल्याला कधीतरी जातो म्हणून, तो कंटाळलाय हॉटेलला. 'इतकी वर्ष तेच खातोय रे म्हणाला. कधी मग पोहे, उपमा करतो, कधी नुसती फळं खातो, कधी उपास करतो चक्कं कंटाळा आला की. एकदा थालीपीठ करायला गेलो, रात्री, दुस-या दिवशी सकाळी आणि डब्यात, एवढा गोळा भिजवला होता.' मला घरी चविष्ट मिळतंय त्यामुळे प्रत्येक गोष्टीत खोट सापडते त्यादिवशी आयुष्यात पहिल्यांदा जेवताना चव काय, पोळीचा आकार काय, कच्ची आहे का, काहीही लक्षात आलं नाही.  

गाडी सुटताना तो म्हणाला,'महाराज, गडावर पोचलात की तोफा उडवा, मिसकॉलचा शोध आपल्याच शहरात लागलाय, तेवढा करा म्हणजे खर्च होणार नाही काही'. पाठमो-या जाणा-या 'तो'ला बघून ठरवलंय मी, यायला पाहिजे वर्षातून एकदा तरी, तो येवो न येवो.  

--जयंत विद्वांस 

(यातला काल्पनिक भाग खरा आणि खरा भाग काल्पनिक वाटण्याची शक्यता आहे त्यामुळे कुणीही 'तो'ला माझ्या मित्रंयादीत, आजूबाजूच्या माणसात शोधण्याचा प्रयत्नं करू नये. 'तो'ची कथा सांगणारा 'मी' मी असेनच असं नाही)
 
 
 
 

No comments:

Post a Comment