Wednesday 19 August 2015

माया.....

भोपळ्यासारख्या सुटलेल्या पोटाचा नागू भटजी चालताना मोठा मजेशीर दिसायचा. सकाळी स्नान झाल्यावर पोटावर बांधलेलं धोतर दहा एक मिनिटात वीतभर खाली सरकलेलं असायचं. सुटण्याच्या भीतीनी तो ते परत घट्ट आवळून घ्यायचा. ओथंबलेल्या पोटाखाली ते नाहीसं व्हायचं आणि मग फक्तं मागच्या बाजूनी ते दिसत असल्यामुळे जंगलात पाऊलवाट गायब व्हावी तसं कमरेच्या दोन्ही बाजूनी ते अदृश्यं झाल्यासारखं दिसायचं. करगोटा आणि जानवं दोन्ही आलटून पालटून वापरलं असतं तरी चाललं असतं असं एकाच रंगाचं झालं होतं. वाढलेलं वजन त्याचं त्यालाच पेलवायचं नाही. त्याची फुफुसं आणि नाक यांचं कायमचं हाडवैर होतं. हट्टी मुलासारखी फुफुसं कायम मागणी करायची आणि पुरवठा करताना ऑक्सिजन पंपून नाकाच्या नाकी नऊ यायचे अगदी. नाकाची कीव येउन त्याच्या मदतीला तोंड सतत उघडं राहायचं. झिरमिळ्या सोडल्यासारख्या असलेल्या मिशांचा नागू त्यामुळे अजूनच विचित्रं दिसायचा.  

थोड्याश्या चालीनी पण नागू अभिषेकपात्रं डोक्यावर ठेवलेल्या पिंडीसारखा सतत घामानी ओला दिसायचा. कधीकाळी पांढरा रंग असलेला पंचाचा कळकट्ट चौकोनी तुकडा त्याच्या खांद्यावर असायचा. सिझन कुठलाही असो, घाम येवो न येवो, दर दोन मिनिटांनी तो खांद्यावरून पंचा काढून डोकं, तोंड आणि मान खसाखसा पुसायचा. कुणीतरी अचानक झडप घालेल अशी भीती असल्यासारखा तो दहा पावलांवर थांबून श्वास गोळा करत आजूबाजूला बघायचा आणि मग पुढे निघायचा. वाटेत कुणी भेटलं की त्याला थांबण्यासाठी कारण मिळायचं. समोरून येणारा माणूस 'काय नागूभट, बरंय ना' म्हणून त्याला वळसा घालून निघून गेला तरी तो तिथेच मिनिटभर थांबायचा. कोकणातल्या आडगावात नागू अंत्यविधीची कामं करायचा. कोकणी माणूस आधीच चिवट त्यामुळे नागूला सटीसहामासी काम असायचं. गेल्या महिन्या दोन महिन्यात कुणी मेलंच नव्हतं गावात. कुणी गेलं की गेलेला दिवस, दहावा, तेरावा असा तो व्यस्तं असायचा, तेवढाच त्याचा वेळंही जायचा, दोन पैसेही मिळायचे.

त्याचा वर्षात सगळ्यात प्रिय काळ कुठला असेल तर पितृपंधरवडा. रोज सकाळ, संध्याकाळ जेवायला आमंत्रण असायचं, पैसे कनवटीला यायचे. दिवसातून दोनदाच जेवायचं आमंत्रण आणि फक्तं पंधरा दिवसाचा काळ याचं त्याला दरवर्षी दु:खं व्हायचं. आपण त्यात काहीही बदल करू शकत नाही यामुळे त्याला अजूनच वाईट वाटायचं. शहरातून आलेला समव्यावसायिक बघितला की त्याच्या बोलण्यातून शहरात याच कामासाठी मिळणारे पैसे ऐकून त्याचा तिळपापड व्हायचा. मग तो चारपाच दिवस घरात मयत झाल्यासारखा दु:खी चेहरा करून फिरायचा. आपण उगाच इथे थांबलो, पुण्यामुंबईकडे गेलो असतो तर रग्गड पैसा मिळवून आत्ता सतत पान खाऊन, दात कोरत गावात फिरलो असतो असा विचार त्याला सतावायचा पण नंतर त्याचीच त्याला शरम वाटायची. मुळात त्याला सगळे मंत्र, विधी यायचे नाहीत हे तो जाणून होता. गावाला दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे नागूभटाची झाकली मूठ शाबूत होती. 

आज पण सकाळी सकाळी आईनी पातेलंभर दडपे पोहे, पोह्याचे चार पापड त्याच्या समोर आणून रागानी आदळले होते तरी त्याला त्याचं काही वाटलं नाही. परशुरामानी नि:क्षत्रियं पृथ्वी केली तसं त्यानी दहा मिनिटात पातेलं नि:पोहे करून टाकलं आणि निम्मं पाणी छातीवर सांडत तांब्यानी घटाघटा पाणी पिऊन सगळ्या गावाला ऐकायला जाईल एवढी मोठी ढेकर दिली आणि पडवीतून आत डोकावून बघितलं. आईनी रागारागानी बाहेर येउन सांडशीसकट चहाचं पातेलं, स्टीलचा मोठ्ठा ग्लास त्याच्या समोर आदळला आणि ती आत निघून गेली. शेवटच्या घासाला लागलेल्या मिरचीनी आधीच तोंड पोळलं होतं तरी त्यानी पाउण ग्लास गरमगरम चहा ओतून घेतला आणि मिटक्या मारत आनंदानी संपवला. अजून पातेल्यात जेमतेम अर्ध्या ग्लासचा ऐवज शिल्लक असल्याचं पाहून त्याला दु:खाचा उमाळा आला. अतीव दु:खानी त्यानी तो ग्लासात ओतून घेतला आणि कमी असल्यामुळे अगदी चवीचवीनी प्यायला. 

मस्तं पंखा लावून थोडसं लवंडावं असा विचार बळावत असतानाच आतून आईनी हाक मारली त्यामुळे त्याचा हिरमोड झाला. पुलावर जाऊन वाणसामान आणि दळण आणायचं होतं ते त्याला आठवलं, 'जेवून झाल्यावर जावू काय?' आतून आई पाय आपटतच आली. 'फुटशील एखादे दिवशी सारखं खाऊन, मी मेले एकदा की गवत खावं लागेल. दळण आणलंस तर भाकरी मिळेल ना गिळायला? कुठून भस्म्या शिरलाय अंगात, झोळाईच जाणे. कष्ट नकोत शरीराला, नुसता आराम आणि खायला पाहिजे. उठ, तासाभरात सगळं आणलंस तर भाकरी करेन नाहीतर दोन वाडगे भात एकटाच खा. उन्हं वर आली की आतमधे चुलीपुढे बसवत नाही, एक पंखा लाव सांगतीये तिथे तर ते होत नाही'. आईची बडबड ऐकण्यापेक्षा उठलेलं बरं या विचारानी तो चपळाईनी उठला. कमरेभोवती धोतरात दोन्ही बाजूंनी बोटं घालून त्यानी ते सारखं केलं. खुंटीच्या दोन पिशव्या घेतल्या, कोनाड्यात उभा राहून सुपारी कातरून ती तोंडात टाकली, काताचा लहानसा खडा, चुना लावून एक अर्ध पान दाढेखाली सरकवलं वरून तंबाखूची चिमूट सोडली आणि 'आता पुलापर्यंत कुणीही हटकायला नको, नाहीतर एवढा सगळा रस थुंकावा लागेल' असा विचार करत तो निघाला. 

नाग्याच्या चार आणि आपल्या दोन भाक-या करायच्या तिच्या जिवावर आलं होतं. कमरेला हात लावून ती उठली आणि पडवी झाडता झाडता कुणाशी तरी बोलल्यासारखं बडबडू लागली. 'कमाई नाही दिडकीची, खाऊन फुगलाय नुसता, मी मेल्यावर काय करेल हा, पालासुद्धा खाईल उकडून किंवा घाई असली तर नुसता सुद्धा खाईल. कलिंगडासारखं पोट झालंय, कोण पोरगी देणार याला, ना रूप, ना शरीर, ना बुद्धी, ना काम, असा कसा निपजलाय काय माहित. मला मेलीला एक मरण येत नाही वेळेत. सुटेन तरी, याची काळजी कुठवर करू? हा उद्या पडला आजारी किंवा मेला अगदी तरी याला इथेच ठेवतील लोक. डोंगर उतरून याला नेणार कोण? फरफटत न्यायला सुद्धा जमणार नाही लोकांना'. शेवटच्या वाक्यानी आई भानावर आली आणि तिनी शरमेने पटपट झाडायला सुरवात केली. 'आहे एका भाकरीपुरतं पीठ आणि एक चांदकी पण होईल वर, आल्याआल्या भूक भूक करेल, करून ठेवते', असं म्हणत ती चुलीकडे गेली.    

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment