Thursday 6 August 2015

सतू...

 १९८८ ते ९१ मी बदलापूरला काकांकडे कॉलेजला होतो. त्या दरम्यान अनेक वल्ली मला तिथे भेटल्या. ब-याच वर्षात गेलेलो नाही निवांत. पण ती ३-४ वर्ष अविस्मरणीयं आहेत. छोटंसं होतं अगदी गांव, सगळे एकमेकांना चेह-यानी ओळखायचे, लाल मातीचे रस्ते, रया गेलेल्या फुलप्यान्टीच्या केलेल्या हाफ चड्ड्या आणि दोन टी शर्ट एवढ्यावर मी गांव फिरलेलो आहे. व्यसनाला घरचे पैसे नकोत म्हणून स्वकमाईसाठी मी इस्त्री करायचो दिन्याच्या लौन्ड्रीत. पंधरा पैसे नग, तासाला वीस कपडे, आठ तास राबलो की साधारण पंचवीस रुपये, साताठशे रुपये झाले की काम बंद आंदोलन. तर संतोष पटवर्धन आणि इतर अनेक टोळभैरव तिथे नित्यंनियमानी हजेरी लावायचे. एवढं पूर्ण नावानी कुणी कुणाला हाकारायचा नाही. त्याला सगळे सतू म्हणायचे, प्रदिप गोखलेची आई घरी पापड करायची म्हणून तो लाटी गोखले आणि असे अनेक.

तसं बाराही महिने रमीचे अड्डे चालायचे तेंव्हा बदलापुरात, गणपतीत जरा जास्ती जोर, त्यात तिथे माघी गणपती बसायचे स्टेजबीज घालून, त्यामुळे अजूनच धमाल. दोन पैसे पासून आठ रुपये पोइन्टपर्यंत लोक नित्यनियमाने बसायचे. मी दारिद्र्यरेषेखाली सात गज जमीनके नीचे असल्यामुळे पाच रुपये एक्कावन्न पोइन्ट ज्याकपॉट खेळायचो. तर सतू हळूहळू तिथे रमायला लागला. चांगल्या घरचा मुलगा खरंतर. वडील पोस्टात होते. तेंव्हा रिटायर्ड झालेले. पोस्टाच्या आवारातच दोन खोल्या होत्या. एक बहिण लग्नं झालेली, घरात ही तिघंच. सतूचा फिटर ट्रेडचा आय.टी.आय.झालेला. पुढे त्या जोरावर तो कुणाच्यातरी शब्दानी एसटी मधे पर्मनंट झाला.त्याला शिफ्ट असायच्या. मुरबाड डेपोला होता. संख्या कमी असल्याने असेल पण ओव्हरटाईम ब-यापैकी मिळायचा.

लोकलनी जा ये, त्यात बदलापूरला तेंव्हा फार गाड्या नव्हत्या. आठ तासाच्या ड्युटीला जाणंयेणं धरून बारा तास जायचेच. बावन पत्त्यांनी सतूला पुरता पागल केला. रम, रमा, रमी ह्यांच्या विळख्यात तो कधी सापडला ते त्याचं त्यालाच कळलं नाही. कामावर तर खेळायचाच, लोकलमधे जाताना येताना आणि प्लाटफॉर्मला उतरला की घरी ब्याग टाकायला जी काय दोन मिनिट वाया जातील तेवढीच की हा पठ्ठा व्रत घेतल्यासारखा अड्ड्यावर हजर व्हायचा. तसा मितभाषी, पाच फूट, सडसडीत अंगकाठी, सावळा आणि उत्तम विनोदबुद्धी असलेला होता. भेंxx, एकदा Hand लागू दे मग उद्या कोण जातंय कामावर म्हणायचा. पण ड्युटीला इमानेइतबारे जायचा. कदाचित खेळायला पैसे लागतीलच म्हणूनही जात असावा.

नंतर नंतर आपण काहीतरी वेगळं करतोय असं त्याला वाटू लागलं. प्रिन्स गुटखा होता तेंव्हा, तो नसेल तोंडात तर विल्स, दोन्हीचा कंटाळा आला असेल तर गाय छाप, डाव लागत असतील तर व्हिस्की, बिअरच्या बाटल्या. कसली तरी घाई असल्यासारखा जगत होता. आई वडिलांनी हात टेकले असणार. बरं रस्त्यात पिऊन पडणे, कुणाला शिव्या देणे, भांडणं वगैरे प्रकार नाहीत, कुणाकडे उधारी नाही, कुणाची छेड काढणं नाही, स्वकमाईवर नरकात पडत होता. सरळमार्गी होताच तो खरा, नाकासमोर चालणारा पण दुर्दैवाने म्हणा, लहानपणी दारिद्र्यात काढलेल्या दिवसांची शिसारी म्हणा पण पैसा उधळायचा नाद त्याला लागला एवढं खरं. या व्यसनांनी झिंग येईनाशी झाली असावी म्हणून नंतर ग्रांटरोड, घाटकोपरच्या वा-या चालू झाल्या.

शेवटी व्हायचं तेच झालं, सगळ्या प्रकारची व्यसनं, वेळी अवेळी जेवण, जागरणं आणि वेश्यागमन, सतूला एड्स झाला. वर्षभर तग धरला असेल फार तर. कातडी सोलायचीही गरज नव्हती, सायन्सच्या पोरांना अभ्यासाला सापळा म्हणून डायरेक्ट वापरता आला असता. का माणसं अशी जीवावर उदार होऊन जगतात, कंटाळा येतो? की दारिद्रयापेक्षा आलेली किरकोळ सुबत्ताही भोगून घ्यावी असं वाटतं? बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे असं होतं? आपल्यापेक्षा पटीत कमावतोय म्हणून वडिल कानफटात मारायचं विसरतात की शारिरीक दौर्बल्यं आड येत असावं? असे अनेक आहेत काही काळ माझ्या जगण्यातले सहप्रवासी झालेले त्यांच्याबद्दल परत कधीतरी खास करून कानिटकर जोडप्याबद्दल नक्की सांगेन.

पण काही म्हणा, सतू उर्फ संतोष पटवर्धन, पोरगा चांगला होता राव.

--जयंत विद्वांस



1 comment:

  1. सर्व काही सुरळीत चालत असतांना व्यसनांच्या आहारी जाऊन बरबाद होणारे अनेक जण गावाकडे मी बघतो. कदाचित संस्कारांचा अभाव असेल. पण ब्राह्मणाचं पोर असं वाया गेलेलं बघितलं की मनस्वी दुःख होतं .

    ReplyDelete