Tuesday 4 August 2015

शापित विक्षिप्त…

अत्यंत प्रतिभावान माणूस. त्याच्या गाण्यांची यादी मी इथे देणार नाही, फार उल्लेखही करणार नाही. हा माणूस सोडून इतर गायक नेहमी नंतरच्या क्रमांकावर राहिलेत माझ्या, याचा अर्थ ते टुकार, भिकार, कमी दर्जाचे आहेत असं नाही. एखादी गोष्टं, माणूस का आवडतो याचं नेमकं स्पष्टीकरण देता येत नाही. जे उमगतात ते मन व्यापत नसावेत. त्याची नक्कल करणारे अनेक आले, येतील. पण काही नेमके हळवे शब्दोच्चार (त्याचा 'ह' दुसरा कुणी म्हणत नाही तसा), स्याड व्हर्जन त्याच्या आवाजातच ऐकावीत. 

मराठीत पुलं आणि हिंदीत हा. यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय. गीतलेखन, अभिनय, संगीतदिग्दर्शन, गायन, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि सोड्याच्या बाटलीसारखा बाहेर येणारा निर्विष, उच्च दर्जाचा कारुण्याची झालर लावून आलेला, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, सहज, आटापिटा न केलेला विनोद. त्याच्या हस-या मुखवटयामागे दडलेला खरा चेहरा पाह्यचा असेल तर दूर गगन की छांवमें बघा. त्याच्या धीरगंभीर आवाजातलं 'आ चल के तुझे' कधीही ऐका, श्रवणीयच. 

संगीत शिकलेला अशोककुमार आणि न शिकलेला हा. आपण जे शिकतो ते काम सोडून दुस-याच गोष्टीत जेंव्हा अफाट यश मिळतं तेंव्हा दैवी देणगी शब्दाचा अर्थ कळतो. मोठ्या भावानी सहज अभिनयाचे मापदंड निर्माण केले, यानी एकाच गळ्यातून नवरस बाहेर काढले. स्वत:विषयी फार कुणी चांगलं बोलणार नाही याची काळजी त्यानी सतत घेतली. त्याचे आचरटपणाचे, विक्षिप्तपणाचे अनेक खरे खोटे किस्से आहेत पण आपण नेहमी सांगणा-याची बाजू ऐकत असतो. मूळ घटना वेगळी असू शकते याची जाणीव आपण ठेवायला हवी. 

योगीताबालीशी लग्नं केलं म्हणून त्यानी काही काळ मिथूनसाठी आवाज देणं बंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' साठी कुमार गौरवचा आवाज तो देणार होता. कबूल करूनही रेकॉर्डींगला तो गेलाच नाही, माणूस घ्यायला आला तर त्यानी दरवाजाच उघडला नाही शेवटी आरडीनी अमितकुमारला घेऊन काम केलं, याचा हेतू साध्यं झाला.फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण प्रयत्नं करतोच आपल्या मुलांना पुढे आणायला, ह्याचा खाक्या वेगळाच. अनेक हिरोंची चलती याच्या आवाजामुळे झाली. आराधना हिट नसता झाला तर हा गायन बंद करणार होता. पण सगळी गाणी हिट झाली मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही कधी. रफी, मुकेश, मन्नादा सगळे मागे पडले. यॉडलींगचा आठवा सूर होताच. 

माणूस होता मात्रं हळवा, प्रेमळ. आपल्या भिकार संगीत देणा-या भाच्यासाठी - बप्पी लाहिरी साठी - त्यानी कुठलंही गाणं गायलं (ऐका सुमधुर - झ झ झ झोपडीमें चारपाई आणि खरोखर चांगलं दिलेलं - इंतेहा हो गई इंतजार की, चलते चलते  मेरे ये गीत). कुठलंही लग्नं याला लाभलं नाही. पहिल्या रूमाला आणि शेवटच्या लीनाला पोर झालं एवढंच. रुमा गुहा पहिली (५०-५८) मग अप्सरा मधुबाला (६०-६९), मग योगिता बाली (७५-७८) आणी अत्यंत दुर्दैवी, पहिल्या लग्नाच्या दुस-या दिवशी विधवा झालेली लीना चंदावरकर (८०-८७). कुणाच्या खासगी आयुष्याबाबत आपण अर्धवट माहितीवर खूप बोलतो.

आज त्याचा वाढदिवस. जिवंत असता तर ८६ वर्षाचा झाला असता. पण काय करायचं एवढं जगून? तुझ्या मागे अनेक पिढ्या तुझं नाव राहिल. सत्तेचाळीस गेलेला सैगल अजून ऐकतो मी, तुला जाऊन अठ्ठावीस वर्ष झालीत फक्तं. मी मरेपर्यंत तू सोबत असशील. शेवटी तूच लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, गायलेल्या, अभिनीत केलेल्या वर्णनाच्या ठिकाणीच जाणार, मी काय किंवा अजून दुसरा कुणी काय :

आ चल के तुझे मै लेके चलू एक ऐसे गगन के तले 
जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले

आहे का रे खरंच असं सगळं तिथे? तरच मजा आहे तिथे येण्यात. 

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment