Tuesday 5 August 2014

बुगीची पत्रं (१०) - प्राविण्य आणि चिकाटी

बुग्यास,
 
खूप दिवसांनी पत्रं ना तुला! वेळच झाला नाही. मागच्या पत्रात काय लिहिलं आठवत नाही. नको आठवू दे म्हणा, आपलं हे पुराण काही विषयवार नाहीये आणि तशी गरजही नाही. असो! तू गाणं शिकतेस म्हणून तुला एक किस्सा सांगतो. शुक्रतारा….वाले अरुण दाते इंजिनिअरिंगच्या परीक्षेत एकदा नापास झाले. वडील रामुभैय्या दातेंना कसं सांगायचं हा यक्ष प्रश्नं होता त्यांना. शेवटी भीत भीत सांगितलंच त्यांनी. वडील पण अफाट. ते म्हणाले, ते राहू दे, नविन गझला कुठल्या शिकलास सांग आणि म्हणून पण घेतल्या. नंतर रडणा-या मुलाच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, 'अरे, इतकी मुलं पास झाली त्यात किती जणांना गाणं येतं?' मुलानीही पुढे वडिलांच्या विश्वासाचं चीज केलं.



आपली मुलं अभ्यास सोडून काहीतरी इतरही करतात हे सांगण्यासाठी पालक हल्ली मुलांना अब्याकस, डान्स, चित्रकला, गाणं, सिंथेसायझर, क्रिकेट शिकायला पाठवतात. किती जणं आवडीनी जातात? गाण्याची कितवी परीक्षा झाली आणि ग्रेड कुठली मिळाली याचा तोरा मिरवण्यासाठी त्या दिल्या जातात. तोंड उघडलं की समजतं ऐकणा-याला मार्क/ग्रेड कितपत योग्यं आहेत ते. अर्थार्जनासाठी कला ही विद्या म्हणून शिकली जाते, हे दुर्दैवं. त्यात गैर नाहीये काही पण तो मूळ हेतू झाल्यामुळे गंमत निघून गेलीये.

कट्यार… तू दोन तीन वेळा पाहिलंयेस. ते तुला कथा समजण्यासाठी नव्हतं दाखवलं तर गाणं शिकतेस म्हणून. दारव्हेकरांनी त्यात कला आणि विद्या यातला फरक फार सुंदर सांगितलाय. कला आतून बाहेर येते आणि विद्या बाहेरून आत येते. विद्या दुस-याला देता येते, कला देत येत नाही. कला तपकिरी सारखी उचलावी लागते, विद्या तंबाखू सारखी देता येते. क्लास मधे जाणारा माणूस जे गाणं वाजवणार नाही तेच गाणं रस्त्यावरचा माणूस मधल्या म्युझिक पिस सकट वाजवून जाईल. आता प्रत्येकाला नसणार अवगत हे ही मान्यं. पण जे शिकतीयेस ते मन लावून शिक. मार्क शून्यं पडले चालतील, ग्रेड सगळ्यात शेवटची चालेल पण गायला तोंड उघडलंस तर ऐकणा-यांनी अजून एक म्हण असं म्हणायला हवं. वसंतराव देशपांडे, भीमसेनजी हे काही परीक्षेत पास झाले म्हणून थोर गायक नव्हते. पु.लं.नी बालगंधर्वांबद्दल फार सुरेख म्हटलंय, ' ते मैफिलीतल्या प्रत्येकाला आपल्यासाठीच गातायेत असं वाटायचं'. ही फार पुढची स्टेप झाली पण एखाद टक्का जमला तरी पुष्कळ.

लहान असताना कसंही म्हटलंस तरी प्रोत्साहनाकरिता छानंच म्हणतात लोक. त्यामुळे थोडीशी मोठी झाल्यावर लोक नाकं मुरडतील, चुका काढतील, रामदासांनी सांगितलंय ते लक्षात ठेव 'अभ्यासोनि प्रगटावे'. कळावं, यावं, आनंद मिळावा, देता यावा म्हणून शिक, काय येतं हे दाखवण्यासाठी शिकू नकोस. लहान वयातलं क्षणिक कौतुकं आणि स्टेजवरची चमकोगिरी तेवढ्यापुरतीच असते हे ध्यानात ठेव म्हणजे झालं.
चला पुढच्या पत्रापर्यंत बाय.

--जयंत विद्वांस




No comments:

Post a Comment