Monday 14 July 2014

विनाशकाले...... पांढरा म्हातारा

मोह, वासना, विषय ही सगळी भावंडं जळवेसारखी आहेत. एकदा चिकटली की सगळं शोषून बाहेर पडणार. ज्याला चिकटली त्यालाच त्याचा त्रास माहित. आयुर्वेदात दुषित रक्तं काढण्यासाठी अंगाला जळवा चिकटवतात पण त्या काढायच्या कधी या साठी बाजूला तज्ञ उभा असतो. एकटया माणसानी काय करावं? जमलं तर सावरावं नाहीतर नशिबात असेल ते भोगावं. 

८८ ला कोल्हापूरच्या गोकुळ शिरगांव एम.आय.डी.सी.त मी आठवडाभर नोकरी केली होती. पिंपरीचे श्री.दुंडगे म्हणून होते त्यांनी इंजिनीअरिंग वर्कशॉप काढलं होतं. मी सुपरवायझर. आठवड्याभरातच माझ्या लक्षात आलं की इथे आपलं जमणार नाही त्यामुळे मी पुण्याला येउन त्यांना रीतसर तसं सांगून टाकलं. वर्कशॉप अर्धवट बांधून झालं होतं त्यामुळे दिवसभर काहीच काम नसायचं. दिवस थंडीचे होते त्यामुळे दिवस लवकर मावळायचा. दुंडगे दोन दिवस थांबून पुण्याला आले. फरशी घालण्याचं काम चालू होतं. कर्नाटकी गवंडी, त्याची बायको, मुलगा आणि एक म्हातारा बिगारी यांचं काम चालू असायचं. त्याचा मुलगा साधारण माझ्यापेक्षा २-४ वर्षांनीच लहान असेल. तगडा आणि उद्योगी होता. साहेब संध्याकाळी या हायवेला, मस्तं ऊस खाऊ म्हणायचा. त्याची आणि माझी चांगली गट्टी जमलेली. चालत्या ट्रेलर मधून ४-५ उस उपसून काढायचा. माझा वितभर खाऊन होईपर्यंत त्याचा पाऊण ऊस संपायचा. 

तेंव्हा रु.१.२५ ला प्रिन्स हा गुटखा मिळायचा. मी नाक्यावरून चहाला गेलो की दोन तीन आणून ठेवायचो.  दिवसभर पुरायचे. म्हातारा सुपारीसाठी घुटमळायचा मग त्याला अर्धी पुडी एकदाच दयायचो, गडी खुश व्हायचा एकदम. साठीच्या पुढे असावा. त्याला कुठलंच काम यायचं नाही. गवंडी वयाचा मान राखून शिव्या घालायचा दिवसभर. जरा काम केलं की दमायचा. तण वाढल्यासारखी पांढरी स्वच्छ तोंडभरून दाढी आणि मिश्या, ओठ दिसायचे नाही इतकी. अगदी बारीक शरीरयष्टी, कमरेला धोतर साधारण दोन पंचे होतील इतपत लांबीचं गुंडाळलेलं, मातकट, बटणं तुटलेला सदरा. संध्याकाळ होत आली की त्याला हुडहुडी भरायची. गवंडी शिव्या पुटपुटत अंगावर बिड्या आणि माचिस फेकायचा. काहीही ऐकलं नाही असं दाखवत तो एका कोप-यात बसून झुरके घेत थंडी घालवायचा प्रयत्नं करायचा. अंधार पडल्याच्या त्याला आनंद व्हायचा कारण वीज नसल्यामुळे काम संपायचं. हायवेच्या पलीकडेच सगळ्यांच्या झोपड्या होत्या. 

माझ्या दोस्ताला मी सांगितलं मी काही येईनसं वाटत नाही परत. रविवारी जाईन, आलो परत तर भेटू. म्हणाला, साह्येब, चिकन खाता का? शनिवारी आमच्या बरोबरच चला, जेवा, मी परत आणून  सोडतो इकडे. मी ही गेलो. साडेसहाला त्याच्या घरात. बरं, सगळं मटेरीअल आणण्यापासून तयारी, त्यामुळे रग्गड वेळ होता. चिकनच्या रश्श्याचा चुलीवरचा वास अजून नाकात आहे. दोन झोपडी सोडून म्हातारा त्याचं जेवण बनवत होता. मला हसूच आलं. मोजून ३ दगड, त्यावर एक कळकट्ट भांडं, गवताची एकेक काडी, काटक्या असं तो घालत बसला होता. बिरबलाची खिचडीच आठवली. पहाट झाली असती तरी आधण आलं नसतं  शिजणं लांब. म्हटलं, काय रे, वेडा आहे का म्हातारा? दोस्त म्हणाला, नाटकी आहे, ज्येवताना बा ला इचारा, मग ऐका. मलाही उत्सुकता होतीच. 

आम्ही जेवायला बसलो, घासलेटचे दोन मोठे टेंभे आणि चंद्रप्रकाश. बसायच्या आधी, गवंड्यानी त्यांच्या भाषेत म्हाता-याला बोलावलं (पण शिव्याच असणार). म्हातारा नाईलाज झाल्यासारखा आला. त्याच्या बायकोनी ताटात ढीगभर भात आणि रस्सा त्याला दिला. डोळ्यात जे काही दिसलं त्याला चमक म्हणवत नाही आता. मला काय कमी उत्सुकता नव्हती, मी आपली काडी पुढे सरकवली. इथेच जेवणार होता तर कशाला नाटक चालू होतं ते खिचडीचं. मग गवंडी जे सुरु झाला ते जेवेपर्यंत. कानडी मिश्रित मराठीत, पु.लं.च्या रावसाहेबांसारख्या शिव्यांचा पिसारा काढून. मतितार्थ मोठा धक्कादायक होता. 

म्हातारा ना त्याचा नातेवाईक ना ओळखीचा. म्हातारा रईस होता चार वर्षांपूर्वी. १२-१५ एकर जमिन, सगळ्यात ऊस लावलेला, स्वत:चं घर, एकुलता एक मुलगा, बायको गेलेली, अंगावर १५-२० तोळे सहज बाळगायचा. घरात ४०-५० असेल. विनाशकाले विपरीत बुद्धी. चार वर्षामागे त्यानं लग्नं केलं. हा ५५-५६, ह्याचा मुलगा २४-२५ चा आणि नवीन बायको २२ ची. सगळ्यांनी तोंडात शेण घातलं. त्यात ती अंगापिंडानी सणसणीत, गोरीपान पण गरिबाघरची. एवढं सगळं वैभव पाहून तिचे डोळे विस्फारले. पहिल्याच दिवशी म्हाता-याच्या लक्षात आलं, आपण कमरेत नाही हलू शकत. म्हाता-याच्या मुलाच्या लक्षात आलं ते. एकदा दारू पाजून त्याने कागदपत्रांवर सह्या घेतल्या. सगळं शेत,घर त्यानी एका रात्रीत विकलं, परस्पर पैसे घेतले. घरातले सगळे पन्नास एक तोळ्यांचे दागिने आणि वडिलांची तरणी ताठी बायको यासकट पोबारा केला. म्हाता-याकडे ताकद, पैसे काहीच नव्हतं. सकाळ संध्याकाळ आठवतील त्या शिव्या द्यायचा. बोटातल्या अंगठ्या आणि गळ्यातली चेन किती दिवस पुरी पडणार. मग तो रस्त्यावर आला. मुलगा आणि बायको इतके छान पळून गेले की त्यांचा तपास लागलाच नाही. पोलिसात कुठल्या तोंडानी जाणार आणि? त्यामुळे तो फक्त शिव्या द्यायचा. गवंड्याला दया आली. काहीही काम जमायचं नाही कारण कधी केलेलंच नव्हतं. शिव्या देऊन का होईना पण तो त्याला जेऊ घालायचा, थोडा पगारही द्यायचा. गवंडी जाईल तिकडे घेऊनही जायचा.

'जेवा साह्येब. काही दया वाटायला नको. त्याच्या कर्माची फळं आहेत. एवढी खाज होती तर जायचं की रांडेकडं, पैका होता. पण ह्याला वाटलं आपण अजून जवानच. मसणवाटेच्या रस्त्याला फुलपाखरू नाही पकडत कुणी'. सव्वीस वर्ष झाली. नात्यागोत्याचा नसताना त्या म्हाता-याला सांभाळणारा तो काळा गवंडी, त्याचा तो बिनधास्त पोरगा आणि वासनेपायी रस्त्यावर आलेला, लाजीरवाणं जिणं जगणारा तो सांताक्लौज सारखा दिसणारा पांढरा म्हातारा अजून डोळ्यांपुढून हलत नाहीत. 
 
--जयंत विद्वांस
 
 

No comments:

Post a Comment