Monday 9 March 2015

वन्स अपॉन अ टाईम (१२).....

क्रिकेटवर प्रेम करणा-या लोकांना हेरोल्ड डेनिस बर्ड एवढ्या नावावरून अंदाज येईल कोण असेल ते पण 'डिकी' बर्ड म्हटलं की तो टोपी घातलेला सज्जन अंपायर कसा झटकन डोळ्यासमोर येतो. अम्पायरिंग हा खरं तर थ्यांकलेस जॉब. पण डिकीनी मिळवलेला रिस्पेक्ट फार कमी जणांनी मिळवला. डिकीनी आउट दिलंय म्हणजे असणारच आउट असं फलंदाजाला वाटायचं यातच सगळं आलं. त्याच्याच देशाचा १११, २२२, ३३३ धावसंख्येला नेल्सन अशुभ म्हणून विचित्र उडी मारणारा डेव्हिड शेफर्ड, सायमन टोफेल, स्वरूप किशन, अलीम दर, कुमार धर्मसेना हे जे चांगले अंपायर आहेत ना ते सगळे स्वत: क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अपील केल्यावर त्यातला खरेखोटेपणा लवकर उमगत असावा. 

आज ८१ वर्षाचा हा तरुण बुजुर्ग आहे. क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला तो एकमेव जिवंत माणूस असावा. अकरावी नंतरच्या परीक्षेत तो फेल झाला आणि स्पोर्ट्स मधे करिअर करायचं त्यानी ठरवलं. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फुटबॉल सोडून क्रिकेटकडे वळावं लागलं. यॉर्कशायरकडून फलंदाज म्हणून तो खेळला. अंपायर व्हायच्या आधी लीग क्रिकेट आणि कोचिंगचा उद्योगही त्यानी केला. संघाचे लोक प्रचारा करता जसे अविवाहित रहातात तसाच हा बर्ड. क्रिकेट प्रेमापोटी अविवाहित राहिला. त्याच्या श्वासात, धमन्यात क्रिकेट वहायचं फक्तं. त्याला पुढे ऑनररी डॉक्टरेट, मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर आणि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर असे सन्मानही मिळाले. त्याचा जन्मस्थानाजवळ त्याच्या सन्मानार्थ त्याचा पुतळाही उभा केला गेलाय.        

एरवी बस मधे रोज भेटणारा कंडक्टर, पोलिस, सिक्युरिटी गार्डस आपल्याला रोज युनिफॉर्ममधे बघायची  झालेली असते. त्यांची जागा सोडून ते दुस-या पेहरावात दिसले की आपल्याला पटकन ओळखता येत नाही. पहिल्या वर्ल्डकप नंतर एकदा बसमधून जात असताना डिकीला कंडक्टरच्या डोक्यावर त्याची टोपी दिसली. त्यानी त्याला विचारलं कुठे मिळाली तुला ही टोपी? त्याचं उत्तर मोठं गंमतीशीर होतं "डिकी बर्ड नाव ऐकलंयेस कधी? मी त्याच्या डोक्यावरून काढून घेतली ती. वर्ल्डकप फायनलला आम्ही सगळे मैदानावर पळालो आणि येताना मी शर्यत जिंकलो". कुणालाही आवडेल अशी चोरी होती ती. क्रिकेटचं पावित्र्यं, सभ्यता जपणारा खराखुरा इंग्रज होता तो. सत्तेनी, ताकदीनी निर्माण झालेला दबदबा कायम रहात नाही पण कर्तुत्वानी दबदबा निर्माण झाला की तो चिरंतन असतो, डिकीचा दबदबा तसा आहे. चिरंतन टिकणारा. 

आपल्याला सगळ्यात जास्ती जी गोष्टं करायला आवडते, ती आता उद्यापासून करता येणार नाही म्हणजे एकप्रकारे मरणाची सेमिफायनलच ती. १९९६ ला भारत इंग्लंड मधल्या पहिल्या टेस्टला त्याच्या साहसष्ठाव्या टेस्ट मधे शेवटचा उभा रहाण्यासाठी तो बाहेर आला तेंव्हा दोन्ही टीमनी त्याला गार्ड ऑफ ऑनर आणि प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली त्यावेळेस या इंग्रज रामशास्त्र्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. आक्रमक अपील केल्यावर भेदरलेले अंपायर बघितले की तू आठवतोस. तू नाही म्हणाल्यावर परत ओरडायची, नाखुशी दाखवायची हिंमत व्हायची नाही गोलंदाजाची.  एकूणच तो जंटलमन गेम आता 'गेम' झालाय. आमचं भाग्यं आम्ही तुला थोडं बघितलंय, तुझ्या बदल वाचलंय ते. 

मैदानाबाहेर आयुष्याची सेन्चुरी मारशीलच तू. अर्थात 'त्या' अंपायरचं बोट वर झालं की संपलं सगळं, संघ अडचणीत असो नसो, आपली खेळी संपली की ब्याट काखेत मारायची आणि निघायचं, एवढंच आपल्या हातात.  

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment