Wednesday 4 March 2015

लल्याची पत्रं (२०) ..... जिया बेकरार है.....

लल्यास,

खूप दिवसात पत्रं नाही जमलं. काल असंच च्यानल बदलता बदलता अख्खी 'निम्मी' दिसली आणि ठेचाळल्यासारखा तिथेच थांबलो. 'बरसात'चं 'जिया बेकरार है' लागलं होतं. राजकपूरला त्याचा एका हातावर नर्गिस आणि एका हातात व्हायोलीन हा सिम्बॉल सापडला तोच 'बरसात'. उत्खनन केल्यावर जुनी शहरं, तिथली भांडी, शस्त्रं सापडतात तसं ही गाणी सापडतील शेकडो शतकांनी कुण्या नशीबवान माणसाला. तो काम थांबवून वेड लागल्यासारखी ती ऐकत बसेल आणि वेडा होईल. पण गंमत म्हणजे त्याचं मूल्यंमापन तेंव्हाचे पुरातत्वशास्त्रज्ञ कुठल्या निकषांवर करतील असा मला प्रश्नं आहे.

तेंव्हाची गाणी सुंदर का व्हायची माहितीये का तुला? ते लोक एरवीही एकत्रं असायचे, गप्पा मारायचे, कुणाला काहीतरी सुचून जायचं आणि अफलातून काहीतरी घडायचं. राजकपूर हा मुळात अड्डाप्रिय माणूस, तो स्वत: सुंदर गायचा, अकोर्डीयन, व्हायोलीन वाजवू शकायचा त्यामुळे त्याची गाणी इतरांपेक्षा सरस असायची, होती, रहातील (जाने कहा…. ची ट्यून त्याचीच होती). त्यानी जमवलेली सगळी रत्नं होती, सगळं चांगलं आपल्या चरवीत त्यानी हुशारीनी ओढून घेतलं. योग जुळून आले होते हेच खरं, घटकपदार्थ तेच असले तरी आचा-याचं कसब असतंच चव येण्यासाठी. राजकपूर हा संजीव कपूर होता. पहिल्या पहिल्यांदा तो चविष्ट पदार्थ बनवायचा, जोकरच्या अपयशानंतर तो आकर्षक, स्पायसी बनवायला शिकला. 

बरीचशी गाणी लोकगीतातून यायची पहिल्यांदा, तो ग्रामीण गोडवा पॉलिश झाला की अजून देखणा दिसायचा. त्यांच्या चालीही लोकगीतांवर आधारित असायच्या (हृदयनाथ, आरडी, सलील चौधरी, शंकर जयकिशन सगळेच माहीर होते यात) इन्ही लोगोने, रंग बरसे, पान खाओ सैय्या हमारो ऐक, कसा कच्च्या कैरीचा फील आणतात ते. तर रिकाम्या वेळात शंकर एक पंजाबी लोकगीत म्हणत बसला होता 'अम्बुआकी पेड है, छाई मुंदेर है, आजा मोरे बालमा, तोरा इंतजार है'. त्या लोकगीतातली चव आरकेनी नेमकी ओळखली. सिद्धहस्तं हसरत जयपुरीनी पहिली ओळ बदलली फक्तं आणि पुढे ओघवतं, सुटसुटीत, अर्थपूर्ण गाणं लिहीलं. संपूर्ण गाण्यात बदरिया, बलमवा आणि आनेवाले एवढे तीनच शब्दं चार अक्षरी आहेत, बाकी सगळे एक, दोन, तीन अक्षरी. बाकी गाण्यात न कळण्यासारखं अवघड काहीही नाहीये. सिंपल, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट, हल्ली दुर्मिळ झालेला भोळं भाबडं गाणं.
  
इथे 'तुझको नज़रे ढूँढ रही हैं, मुखड़ा तो दिखला जा, रस्ते पर हूँ आस लगाये, आनेवाले आ जा' मधे जी आग, विरह, ओढ आहे तीच आग 'मौसम है आशिकानाच्या' 'ऐ दिल कहिसे उनको ऐसेमें धूंड लाना' मधे होती बघ. 'सुहाग'मधलं 'अठरा बरस की तू होनेको आई' आठवतंय?  त्यातल्या मेरे घुंगरू सलामत, हजारो कदरदान है, एक तू ही नही दिलमें, लाखो मेहमान है' ला या गाण्याची चाल आहे. असे तुकडे ऐकताना जाम मजा येते. मागे म्हटलं होतं बघ तुला 'मुकद्दर का सिकंदरच्या' 'दिल तो है दिल' मधे कडवं संपलं की 'ये दोस्ती' एवढंच वाजतं आणि 'ये दोस्ती' संपताना तिसरी मंझीलचं 'आहा आजा' माउथऑर्गन वर वाजतं. चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय, तोपर्यंत ऐका 'जिया बेकरार है'

-- जयंत विद्वांस

--------------------------------------

जिया बेकरार है, छाई बहार है
आजा मोरे बालमा, तेरा इंतजार है

सूरज देखे, चंदा देखे, सब देखे हम तरसे
जैसे बरसे कोई बदरीया, ऐसे अखियाँ बरसे

नैनों से एक तारा टूटे, मिट्टी में मिल जाये
आँसू की बरसात बलमवा, दिल में आग लगाये 

तुझ को नज़रे ढूँढ रही हैं, मुखड़ा तो दिखला जा
रस्ते पर हूँ आस लगाये, आनेवाले आ जा
(बरसात, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन, लता मंगेशकर) 



2 comments:

  1. शिवाय निम्मीचे ते गोड दिसणे, साध सुध नृत्य म्हणता येईल की नाही पण त्या गाण्याला नैसर्गिक वाटणारे हाव्भाव सगळेच परीणाम्कारक होते

    ReplyDelete
  2. हसरत जयपुरी यांचे रेकोर्ड झालेले हे पहिले गाणे . त्या वेळी ते मुंबई च्या सुपर सिनेमात बुकिंग क्लार्क होते .

    ReplyDelete