Wednesday 27 March 2013

ब (म) र्फी ......



ब (म) र्फी ......

रविवारी बर्फी बघितला. मस्तं एकदम. कोशिश, सरगम, सदमा, ब्लॅक, पा, आठवले. रणबिर, इलेना, प्रियांका - सगळेच् छान. सोबतीला दिग्गज बरेच् – आशिष विद्यार्थी, सौरभ शुक्ला, रूपा गांगुली (द्रौपदी), उदय टिकेकर.

काय आवडलं? सरळ, साधा. झाडांपाठीमागची गाणी, व्हिलन्स, गोळीबार, अचाट हाणामा-या, कमरेखालचे विनोद, अश्रूंचे पाट, ऑर्केस्ट्राचा ढणढणाट, पंजाबी लिरीक्स्, व्हॅम्प्स् - काही म्हणजे काही नाही. यातले विनोद सुद्धा हलकसं स्मित आणतात, क्वचित खदाखदा. प्रोमोज् मधे पाहिल्यामुळे काही जोक्स् आधीच् माहित होते, हा एकच् तोटा.

दार्जिलिंगचा निसर्ग, मेरे सपनोंकी रानीची आठवण करून देणारी ट्रेन आणि तो रस्ता. निरागस रणबिर कपूर (करिश्मा कपूर आली तेंव्हा तिला एकानी साडीतला रणधीर कपूर म्हटलं होतं, त्या धर्तीवर याला शर्ट पँटमधली नितूसिंग म्हणायला हरकत नाही), मोहक इलेना आणि नॉनग्लॅमरस् प्रियांका चोप्रा. मुळात कॅरॅक्टरच्या वयाला सुट होणारे कलाकार त्यामुळे ऑड वाटत नाही.

काही प्रसंग अनुराग बासूचे, काही कलाकारांचे. कलकत्त्यात घडणा-या चित्रपटात गाडीची नंबर प्लेटही तिथलीच्, गाड्याही जुन्याच्, एका पिक्चरमधे डेहराडूनमधे एम एच 02 पासिंगची गाडी होती. कपडेही बंगालचे, मर्फीची जाहिरात ऑटलासच्या जाहिरातीनी रिप्लेस होते. इव्हन नोटाही जुन्याच्. रणबिर प्रियांकाला इलेनासमोर आणताना तिल जरे बरे कपडे घालतो. छोट्या प्रसंगात बरच् काही.

रणबिर शोभून दिसतोच, पण इलेनाही छान् वावरली आहे. शेवटी रहाते प्रियांका चोप्रा. अप्रतिम काम. ती अभिनय करते असं वाटतच् नाही. दोन शॉट – एकदा ती आरश्यासमोर पदरासारखी पटकन ओढणी घेते तो आणि रणबिरच्या पुढे उभी राहून इलेनाला शब्दांपलिकडचं पोचवते तो. कुठेही शब्दं लागत नाहीत. ऐतराजमधे पण तिनी छान काम केलं होतं.

इतनीसी खुशी, गोरेगोरे, ओ बांके छोरेशी मिळत जुळतं वाटलं मला. पण प्रितमच्या गाण्यांचा त्रास होत नाही. म्हातारी इलेना थेट मेरा नाम जोकर मधल्या सिमी ग्रेवालची आठवण करून देणारी तर एंड पा सारखा बेडवर.

जयंत विद्वांस




No comments:

Post a Comment