Saturday 16 March 2013

वसंत लावण्य...

वसंत लावण्य : मधु पोतदार 

चित्रपटाशी निगडीत काहीतरी वाचायला मिळालं की ते आवडतच, खुमासदार, मसालेदार, चटपटीत हा एक भाग आणि त्यांची दु:खं, पूर्ण झालेली, अपूर्ण राहिलेली स्वप्नं, दुर्दशा, फसवणूक आणि उध्वस्त आयुष्याच्या कहाण्या हा एक भाग. आपल्याला वरवर दिसणार चकचकीत जीवन आतून कसं आहे ते कळत, वाईट गोष्टींचा मोह पटकन होतो म्हणतात पण चित्रपटांना वाईट तरी कसं म्हणायचं. कला वाईट नसते. तिचा वापर करणारे हात चांगल की वाईट ते ठरवतात. सुरी सर्जनकडे पण असते आणि खाटकाकडे पण. वापरणारे हात बदलले की निर्मिती बदलते. 

वसंत पवार - अनेक सुमधूर गाण्यांना सुरेल, श्रवणीय चाली देणारा हा संगीतकार फक्तं अडतीस वर्षाचं तुटपुंज आयुष्य जगला. विस्मरण आणि कृतघ्नपणा हे आपल्या समाजाचे उपजत गुण आहेत. चांगल्या लोकांच, त्यांच्या कामाचं लवकरात लवकर विस्मरण कसं होईल या करता आपल्याला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, इतकं ते अंगवळणी पडलंय. अरेच्च्या, हे गाणं यांचं आहे होय, माहितीच नव्हतं असे उद्गार वारंवार कानावर पडतात. या थोर लोकांच्या रचना गाणारे लोक पण याला कारणीभूत आहेत. ज्यांच्या जीवावर पोट भरता त्याचं निदान नाव तरी घ्या, पैसे तर द्यावे लागणार नाहीयेत ना? गीतकार, संगीतकार यांची नावं घेणं त्यासाठी गरजेचं आहे. 

वानगीदाखल ही गाणी बघा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, बुगडी माझी सांडली ग, कसं काय पाटील बर हाय का?,. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची आणी हे तुफान चाललेले चित्रपट - सांगत्ये ऐका, मल्हारी मार्तंड, रंगल्या रात्री अशा, मानिनी. एकूण ५० मराठी चित्रपट, काही हिंदी आणि एक इंग्लिश - महात्मा. काही नाटक. 

हे काही आत्मचरित्र नव्हे कारण मुळात चरित्रकथानायक नव्हताच हे लिहिताना, त्यामुळे परिचित लोक आणि इतर साधने यावरून लिहिलंय सगळं. ब-याच ठिकाणी काही गोष्टींची, किश्श्यांची पुनरावृत्ती झाली आहे. पण ते काही फार महत्वाचं नाही. मुळात प्रेमापोटी, आपण काहीतरी त्या व्यक्तीच देणं लागतो या भावनेपोटी जेंव्हा कुणी कष्ट घेऊन लिहितं त्या वेळी चुका काढण्यापेक्षा ते वाचावं असा मला वाटत. मनस्वीपणा हा कलाकाराचा गुण की अवगुण? कलेची निर्मिती होते हे मान्य केलं तरी व्यावहारिक पातळीवर काय करायचं? लाखमोलाच्या चाली रचणा-या माणसाचं कुटुंब मात्रं उद्या काय या विवंचनेत. हाडाचा कलाकार वगैरे  मोठे शब्दं वापरून हुशार लोक स्व:ताची पोतडी तुडुंब भरून घेतात आणि हाडाच्या कलाकाराची मात्रं हाडं निघतात. कलेच्या दुनियेतले हे व्यवहारी अपूर्णांकच म्हटले पहिजेत.

दारूची बाटली देऊन त्यांच्याकडून अप्रतिम काम करून घेणारे दिग्दर्शक, निर्माते, त्यांच्या मरणानंतर त्यांचं नाव काढून त्यांच्या चालींवर स्व:ताचं नाव लावणारे संधिसाधू आणि आमच्या आयुष्यभराच्या  मीठ भाकरीची सोय त्यांनी केली असं कृतज्ञतापुर्वक सांगण-या सुलोचना चव्हाण, त्यांच ऋण मानणारे आणि लावणीचा वारसा पुढे नेणारे सहाय्यक राम कदम, जगदीश खेबुडकर, त्यांच्या कलेवर प्रेम करणारे पु.लं., गदिमा, शांताबाई, हंसा वाडकर असे दिग्गज लोक पण इथे भेटतात. 

शेकडो लावण्या, अभंग, कवन, फटके, गीतं, उर्दू शेरोशायरी, सवालजबाब मुखोद्गत असणारा, उत्कृष्ट सतार वाजवणारा, अनेक वाद्य वाजवणारा, खिळवून ठेवणारे जादूचे प्रयोग करणारा (पत्त्यांच्या ६५ जादू यायच्या म्हणे त्यांना), नृत्यदिग्दर्शन करणारा, छोटे मोठे फुटकळ रोल करणारा, पार्श्वगायन करणारा, पु.लं.नी ज्याला मैफिलाचा चांद म्हटलं असा मैफिल रंगवणारा हा माणसांचा, सुरांचा लोभी अवलिया माणूस. जगाकरता प्रतिभावंत, असामान्य कलाकार पण कौटुंबिक आयुष्यात मात्रं पूर्ण अपयशी. तीन मुली आणि एक मुलगा. दोघींच्या आयुष्याची वाट लागली. मुलाचं आणि एका मुलीचं बरं आहे एवढंच काय ते त्यातल्या त्यात दिलासा देणारं.

के.एल.सैगल, चंद्रमोहन, आर.डी., मीनाकुमारी, लक्ष्मीकांत बेर्डे, डॉ. घाणेकर आणि असे अनेक कितीतरी लोक त्या हातभर बाटलीच्या कह्यात गेले आणि मग त्यांना परतीची वाट मिळालीच नाही. एका दिवसात सहा-सहा , नऊ-नऊ गाण्यांचं ध्वनिमुद्रण करून निर्मात्याचे पैसे वाचवणारा हा माणूस कसली तरी घाई झाल्यासारखा अनेक,  जो पर्यंत मराठी भाषा बोलली जाईल, चित्रपट निघतील तो पर्यंत, अजरामर गाणी ठेवून निघून गेला. 

(राम कदम - छिन्नी हातोड्याचा घाव, वसंत शिंदे - विनोदवृक्ष, अनंत मने, जगदीश खेबुडकर, सुलोचना चव्हाण, जयश्री गडकर, वसंत प्रभू आणि वसंत देसाई यांच्या पुस्तकांची नावं त्यात आहेत. आता ही सगळी आणून वाचण आलं, आपल्याला ह्या लोकांनी आनंद दिलाय, परतफेड काय करणार? निदान त्यांच्या विषयी वाचून कृतज्ञता व्यक्त करण आणि दुस-याला सांगणं एवढंच करू शकतो)

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment