Tuesday 10 June 2014

लल्याची पत्रं (१२) …'जीवनसे भरी तेरी आंखे …'

मागच्या पत्रात तुला  म्हटलं ना की किशोरकुमार गांगुली काही गाण्यांना जरा आतलाच सूर लावतात. 'गीत गाता हुं मैं…' तसंच हे ही गाणं, 'जीवनसे भरी तेरी आंखे…'. काही नटांच्या नशिबात शब्दंसुरांचे अप्रतिम योग होते. राजेश खन्ना, देव आनंद त्यात अग्रणी. यांच्या एकाच चित्रपटातली सगळी गाणी हिट, सुंदर, अर्थपूर्ण असायची. गाणी हा हिंदी सिनेमांचा अविभाज्यं भाग आहे. पहिल्यांदा तो श्रवणीयं असायचा हल्ली  प्रेक्षणीयं असतो एवढाच काय तो फरक.

'सफर'ची इंदीवर आणि कल्याणजी-आनंदजी जोडीची सगळी गाणी हिट होती. 'हम थे जिनके सहारे…', 'नदिया चले चले  रे धारा…', 'जो तुमको हो पसंद….' आणि किशोरचं अजरामर 'जिंदगी का सफर…' ही  बाकीची. शर्मिला टागोरचा अतिलाडिक अभिनय गाण्यांमुळे सुसह्य होतो. 'आनंद' आणि 'सफर' दोन्हीत कर्करोगी पण गाल  चांगले वर असलेला राजेश खन्ना. मुळात त्या आजारामुळे मिळणारी सहानुभूती, जोडीला अशी गाणी मग  काय लोक गर्दी करणारच की बघायला.

काही शब्दांचे अर्थ माहित नसले की अर्थ लागत नाही ओळीचा किंवा विचित्रं लागतो. या गाण्यातल्या 'सागर भी तरसते…' यात 'सागर' म्हणजे मद्द्याचा चषक हे फार नंतर समजलं  तो पर्यंत समुद्रं  तुझ्या रूपाचा रस पिण्यासाठी आतुर आहे हे काही पटायचं नाही. मरण समोरच्या वळणावर दबा धरून बसलेलं आहे हे माहित असताना जगण्याची निर्माण होणारी अनावर इच्छा आणि ते शक्यं नसल्यामुळे येणारी हताशता मोठी जीवघेणी आहे. (जॅकी, डिंपलचा 'काश' पण असाच सुरेख होता, हताशपणा म्हणजे काय ते सांगणारा). माणसाला मरण समजलं की तो भरभरून जगण्याचा प्रयत्नं करतो. डोळ्यात प्राण आणून वाट  बघणं आणि डोळ्यात प्राण, जिवंतपणा असणं किती फरक आहे ना. जगण्याशी संपलेली आशा, निरुत्साह, कशातच रस न  वाटणे अशा स्टेजला एखादं आनंदाने भारलेलं, भारावून टाकणारं, क्षण न क्षण उत्साहात जगणारी  व्यक्ति सामोरी आली तर ती हताशता अजूनच वाढत असावी.         

स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन जो तो आपापल्या परीनी शब्दाभांडाराच्या, अनुभवाच्या जोरावर करत असतो. अतिशयोक्ती हा अलंकार वापरणं जास्तं सोयीस्कर असतं बघ त्यासाठी. एखाद्या गोष्टीची परमोच्चता कशी  दाखवणार नाही तर. लैला मजनू मधली लैला काळी, कुरूप होती असं म्हणतात पण कवी लोकांनी, गीतकारांनी तिला सुंदर केलंच. व्यक्ती सुंदर असणं आणि समोरच्याला ती वाटणं यात फार फरक आहे. इंदीवर  म्हणतो, सौंदर्य एवढं अफाट आहे की चित्रात, कवितेत कशातूनही व्यक्तं होऊ शकत नाही. फार तर फार जवळपास जाऊ शकतो आपण. त्याच्या हृदयाचं स्पंदन ती, शरीराचा प्राण ती. वा-याची झुळूक, चाफ्याचा गंध, हरणाच्या पोटाचा मलमल स्पर्श, लहान बाळानी मुठीत बोट घट्ट पकडल्यावर झालेला आनंद, तिनी चोरून बघताना नेमकं आपण बघणं, शब्दात कसा सांगता येणार.
 
माणूस एकदा प्रेमात पडला ना की त्याला सगळं सुचतं बघ आणि आपटला की काहीच सुचत नाही. इंदीवरनी तिला अगदी अप्सराच करून टाकलंय. श्वासात फुलबाग, कमळाचा कोमल देह, सोनेरी चेहरा, हरणाची चपळता, काय नी काय एकेक. प्रत्येकालाच असं सगळं कसं मिळणार? म्हणून तर चित्रपट चालतात. सत्यं विसरून स्वप्नं बघायला, स्वप्नातलं बघायला, त्यात काही काळ रमायला तर आपण त्या अंधारात जातो. चित्रपट, त्यातले संवाद, गाणी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मानसोपचारच आहे. कुणी पहात नाही गं अंधारात. आपण लहान मुलासारखे खदखदून हसतो, कधी दबलेल्या हुंदक्याला अजिबात थांबवत नाही, कधी घाबरून घट्ट खुर्ची पकडतो, कधी लवकर संपलं स्वप्नं म्हणून चुटपुटतो तर कधी नवं काही गवसल्याच्या आनंदात बाहेर पडतो.

बरं, चल पुढच्या गाण्यापर्यंत बाय. तुला पत्रं लिहिणं हा ही मानसोपचारातलाच एक भाग आहे. :)

"जीवन से भरी तेरी आँखें
मजबूर करे जीने के लिए
सागर भी तरसते रहते हैं
तेरे रूप का रस पीने के लिए

तसवीर बनाए क्या कोई
क्या कोई लिखे तुझ पे कविता
रंगों छंदों में समायेगी
किस तरह से इतनी सुन्दरता
एक धड़कन हैं तू दिल के लिए
एक जान हैं तू जीने के लिए

मधुबन की सुगंध हैं साँसों में
बाहों में कमल की कोमलता
किरनों का तेज हैं, चहरे पे
हिरनों की हैं, तुझ में चंचलता
आँचल का तेरे हैं तार बहुत
कोई शाख जिगर सीने के लिए"

--जयंत विद्वांस   

No comments:

Post a Comment