Tuesday 24 June 2014

अमर अकबर अंथोनी.....

अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, योगायोग हा जीवनात महत्वाचा घटक आहे, मुर्खपणा भाबडेपणाने मांडला तर जास्तं भावतो. ही सगळी एकमेकांशी संबंधित नसलेली विधानं आठवायचं कारण म्हणजे मनमोहन देसाई. काल सेट म्याक्स २ ला  अमर अकबर अंथोनी कितव्यांदा तरी बघितला. या पिक्चरचं गारुड काही संपत नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला लास्ट शो. पाचवीला असेन, सोनमर्गला  पाहिला  होता मी. त्यानंतर खूप वर्षांनी. पहिल्या फटक्यात तो आवडला होताच नंतरही आवडत राहिला. 
 
 
निरुपा रॉयला रक्तं देतात त्या शॉटवर अनंत वेळा अनंत जणांनी लिहून झालंय. मी दवाखान्यातच काम करत असल्याने काल मात्रं ढसाढसा हसलो. पण पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मात्रं आईचं आणि मुलांचं रक्तं एकसारखंच असतं आणि एकमेकांना कडेला झोपवून भरता येतं असा खरं कळेपर्यंत कितीतरी वर्ष माझा समज होता. पण त्या गैरसमजामधे विश्वास होता - काही झालं आपल्याला तर आईचं रक्तं मिळेल किंवा आपलं तिला - हा विश्वास ज्ञानामुळे मिटला.
याची स्टोरी, स्टारकास्ट, गाणी, अमिताभचा आरशासमोरचा सीन याबद्दल बच्चा बच्चा जानता है. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे मनमोहन देसाई. पहिल्याचा दुस-याशी संबंध असेल असं अजिबात नाही पण बघायला मजा येते ना तसं. डोकं वगैरे अवयव वापरायचे असतील तर तुम्ही त्याचे सिनेमे बघायला लायकच नाही. हे असं कुठे असतं का, हे  अतीच होतंय, आम्ही एवढे मुर्ख आहोत का असे प्रश्नं पडत असतील तर तुम्ही देसाई ऑप्शनला टाका. दिसायला सोप्पा विषय पण अभ्यास कराल तर प्रचंड अवघड. ते त्याचं तोच करू जाणे.

'परदा है परदा' मधे 'तो तो तो अकबर तेरा नाम नही है…' ही एकंच ओळ रेकॉर्ड करून किशोरकुमार अमेरिकेला कार्यक्रमासाठी निघून गेला. ७७ साली एल.पी.नी ते कसं मिक्सिंग केलं ते तोच जाणे. गाणी तर सगळी अफाटच. दोन कव्वाल्या,  माय नेम इज, तय्यब अल्ली  प्यार का दुष्मन, हमको तुमसे आणि शेवटचं अनहोनी को होनी करदे झकासच. मुकेश आणि महेंद्र कपूर विनोद खन्ना साठी, रफी आणि शैलेंद्र ऋषी कपूर साठी आणि किशोर एकटा अमिताभ साठी. सगळ्या बायका लताच्या आवाजात. अनहोनी ला रफी आणि  हमको तुमसे ला महेंद्र कपूर का नाही (किंवा उलट) हे विचारायचं नाही. मनमोहन देसाईना हे कुणीही विचारायचं नाही.
 
आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत याची जी काय लिंक आहे ना त्यासाठी आपले फूल मार्क्स आहेत. सगळं कसं वेळेत कुठलाही गोंधळ न होता एकमेकाला ते बरोब्बर समजतं. सर्वधर्मसमभाव तर कुठलाही प्रचारकी आव न आणता तो जपतो. हिंदू किशनलाल रॉबर्टच्या मुलीला जेनी म्हणून वाढवतो. जीवनवरचा राग  त्याच्या मुलीवर नाही काढत. त्याच्या ड्रायव्हरची मानसिकता बघा किती उच्चं दर्जाची आहे ती. अशी सगळी चांगली मुल्यं मात्रं तो कसोशीने जपतो. अकबर, अंथोनी अनाथ असल्यामुळे ज्याला सापडतात त्याचा धर्म त्यांना मिळतो. बरं प्रत्येकाची प्रेयसी त्याच्या त्याच्या धर्माची, उगाच वाद नको. देसाई म्हणजे सरळ माणूस बघा. सगळ्यांना खुश ठेवणार.  



म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर मुर्खासारखे प्रश्नं, उपप्रश्नं मलाही पडलेत. 
१) हिरोंच्या वयाच्या क्रमानुसार सिनेमाचं नाव 'अमर अंथोनी अकबर' असं का नाही?
२) ऋषी कपूर उजवीकडून डावीकडे उर्दू मधे जी चिठठी लिहून देतो ती चिठठी नितू सिंह डावीकडून उजवीकडे एका सेकंदात कशी वाचते?
३) डॉ.नीतूसिंहला नाडी बघून परवीन बाबी गरोदर आहे हे कसं कळतं? (ते खरं किंवा शक्यं असेल तर प्रेग्नन्सी टेस्टला लोकं पैसे का फुकट घालवतात?) 
४) आघाताने डोळे गेल्यास डोक्यावर नेमका कुठल्या भागावर आघात केल्याने दिसू लागतं?  


रामानुजन यांची गणिती कोडी सोडवायला लोक धाव घेतात पण मेडिकल सायन्सचा अभ्यास करणारे लोक यात लक्ष घालत नाहीत याचं दु:खं होतं. मनमोहन देसाईनी माझ्या सगळ्या प्रश्नांना निश्चित उत्तरं दिली असती याची मला खात्री आहे. 
१) मुर्खा, 'अमर अकबर अंथोनी' ला जो -हिदम आहे तो 'अमर अंथोनी अकबर' ला आहे का? (नावाच्या क्रमवारीत काही नसतं हे त्याचं क्रेडीट हुकलंच).
२) त्या क्षणाला  घाई होती, परवीनच्या मदतीला जाणं गरजेचं होतं तिथे असल्या फालतू गोष्टींना महत्वं द्यायची गरज नाही.
३) जुने वैद्य नाडी परीक्षेवरूनच सांगायचे. (नीतूसिंहनी आयुर्वेदात एम.डी.केलेलं असतं असंही कदाचित त्यानी सांगितलं असतं). 
४) ये, एका फटक्यात तुझे डोळे घालवतो, परत तिथेच फटका मारून नाही आले तर सांग. (माझी माघार)



मनमोहन देसाईंचे डेव्हिड धवन सारखे पाचकळ वारस बघितले की मग त्याची किंमत कळते. वरकरणी निर्बुद्ध, असंबंध वाटणारी पण स्वच्छ, निखळ, मूल्यं जपणारी, सर्व गुणदोषांचे कंगोरे दाखवणारी सांगितिक करमणूक करणं सोप्पं काम नाहीये. त्यानी त्याच्या हिशेबाप्रमाणे, कुवतीप्रमाणे चित्रपट काढले आणि लोकांना ते आवडले. दादा कोंडके आणि देसाई यांच्यात हे  फार मोठं साम्यं आहे. कुणीही कितीही टीका करू दे, नाकं मुरडू देत ते चित्रपट काढत राहिले, लोक  पहात राहिले. 
 
 
मी पहिल्यांदा ज्या वयात अमर अकबर बघितला तेवढ्याच वयाची माझी मुलगी आत्ता हा चित्रपट ती वारंवार बघते आणि तिला तो आवडतो. सदतीस वर्षं झाली. ती तिच्या मुलांनाही कदाचित हा दाखवेल आणि वाढलेल्या ज्ञानामुळे तिलाही असेच प्रश्नं पडतील आणि उत्तरंही सापडतील. 

एम.डी.वुई रियली मिस यू. तुझ्या भाबडेपणात, अशक्यं योगायोगात पण मजा होती राव. 
 
 
--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment