Friday 4 September 2015

दुर्बोध.....

दुर्बोध..... 

अनेक दुर्बोध कवी, लेखकांची शपथ घेऊन सांगतो, मी एक आत्ता पर्यंत कधीही लिहिली न गेलेली दुर्बोध कविता/लेख लिहीन म्हणतोय. वाचकांचे, समीक्षकांचे डोळे पांढरे होतील किंवा कायमचे मिटतील. कदाचित माझ्यावर चिखलफेकही होईल, काही विद्वान लोक त्यातून मला न सापडलेले, अभिप्रेत नसलेले अर्थ सापडवतील आणि मला चारी मुंड्या चीत करून बेशुद्धावस्थेतही पाठवतील. असूयेपोटी काही कुपमंडूक वृत्ती माझ्या कवितेवर दुर्बोध, अर्थशून्यं, 'आपण लिहिणं बंद कराल का कृपया?' , भिकार कविता, 'जोड्यानी मारला पाहिजे', 'कविता आहे का ओकारी?' अशा प्रतिक्रिया देखील देतील. कदाचित माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही (हे आपलं उगाच महत्वं वाढवण्यासाठी लिहिलंय). 

पण मी असल्या झुंडशाहीला भिक घालणार नाही, माझ्या त्या कविते/लेखाप्रमाणेच अनाकलनीय कविता, गद्यं लिहिणा-या लोकांच्या प्रतिक्रिया मला प्रिय होतील. त्यातल्या प्रत्येकाला मी मेसेज करेन, फोन करेन, माझ्या कवितेवर/लेखावर तुफान चर्चा घडवून आणेन (म्हणजे ते आम्ही आधी सगळं ठरवणार फोनवर किंवा इंबॉंक्सात) अर्थात बार्टर सिस्टीम फॉलो होणार. त्यांच्या अशाच अगम्यं कवितेवर, उता-यावर मी हजेरी लावणार, मला मनात नसलेले त्यांच्या लिखाणाचे अर्थ मी तिथे बादल्या बादल्या ओतणार (यात पुराव्याचे संदर्भ वगैरे द्यायचे नसतात ते एक बरं आहे). मग आमची दुर्बोध वीण झपाट्याने वाढेल. मला ज्यांच्या सरळ, सोप्या, समजेल अशा अर्थपूर्ण लिखाणाचा हेवा वाटतो त्यांच्या लिखाणासाठी माणुसकी म्हणून एका, फारतर तीन शब्दांची कॉमेंट करायची असं मी ठरवलंय. क्लास, क्या बात, सुंदर किंवा सुं द र …., काय लिहितोस/लिहितेस रे/गं, कै च्या कै अप्रतिम, …।. अप्रतिम, केवळ अप्रतिम अशा कॉमेंटची वर्ड फाईल करून ठेवलीये. 

तर मुद्दा असा होता की 'आत्ता पर्यंत कधीही लिहिली न गेलेली दुर्बोध कविता'. मी एक वर्ड फाईल केलीये, त्यात अवघड (म्हणजे मला एकट्यानी आणि वाक्यात आले तरी न समजलेले) शब्दं मी सेव्हायला सुरवात केली आहे, त्याचा नमुना देतो, तुमच्या सारख्या वाचकांकडून अजून गूढ शब्दं, शब्दंसमूह अपेक्षित आहेत (अति दुर्बोध कल्पनेला ब.मो.पुरंद-यांसारखे कविता/लेखाच्या ओळीत त्या शब्दाच्या डोक्यावर आकडे टाकून तळाला त्या शब्दंकर्त्या/कर्तीचा नामोल्लेख करण्यात येईल)

आकाशाचा परीघ, पृथ्वीची त्रिज्या, द्वैत, अद्वैत, अनादी अनंत उपेक्षा, मनाच्या पाताळातील केविलवाणी अदम्यं सनातन घुसमट (क्या बात है), समांतर क्षितिजाचा सांगावा, चांदण्यांनी भारलेल्या वाटेवरचा प्रवास, रात्रीच्या गर्भात दबलेला असीम हुंकार, प्राजक्ताच्या देठातला केशरी शृंगार, पूर्वेला पहाटे तुझ्या आठवणीने पडलेला लाल सडा, मानेवर जाणवणारे तुझे मोग-याचे श्वास, रंध्रात पेरलेले तुझे स्पर्श, काळाच्या पेटा-यात तळाशी दडलेली तुझी ती स्वर्गीय हाक, तो झुळूकेवर स्वार झालेला तुझा कायागंध, उद्वेगाच्या अजस्त्र शेवाळ भिंतीवर कोसळणारे ते अलवार क्षण (मलाही नेमकं काय ते कळलेलं नाही, अर्थ विचारू नये, तुमच्या नावावर फुली मारण्यात येईल), तुझ्या श्वासातला मारवा (आईशप्पथ सांगतो, ही फ्रेज वापरणा-याने या रागाचे आरोह, अवरोह जरी सांगितले ना तरी लकडी पुलावर सत्कार करेन), ती निसटलेली उल्का आणि तुझ्या डोळ्यातून सटकलेला तो युगानुयुगे थांबलेला सागरअश्रू..... 

बास, माझ्याच कपाळावर आयोडेक्सचं बोट फिरवलंय आत्ता, कानात दडे बसलेत, चेहरा असा झालाय की जाणकार माणूस कापूस शोधून नाकपुड्यात कोंबेल आणि जवळच्या माणसांना फोन करायला सुरवात करेल. तर माझ्यासारख्या पुरोगामी माणसाला कराल ना मदत? आपल्या मदतीच्या अपेक्षेत… 
 
जयंत विद्वांस 

2 comments:

  1. समांतर क्षितिजाचा सांगावा, चांदण्यांनी भारलेल्या वाटेवरचा प्रवास, रात्रीच्या गर्भात दबलेला असीम हुंकार, प्राजक्ताच्या देठातला केशरी शृंगार, पूर्वेला पहाटे तुझ्या आठवणीने पडलेला लाल सडा, मानेवर जाणवणारे तुझे मोग-याचे श्वास, रंध्रात पेरलेले तुझे स्पर्श, काळाच्या पेटा-यात तळाशी दडलेली तुझी ती स्वर्गीय हाक, तो झुळूकेवर स्वार झालेला तुझा कायागंध, उद्वेगाच्या अजस्त्र शेवाळ भिंतीवर कोसळणारे ते अलवार क्षण (मलाही नेमकं काय ते कळलेलं नाही, अर्थ विचारू नये, तुमच्या नावावर फुली मारण्यात येईल), तुझ्या श्वासातला मारवा (आईशप्पथ सांगतो, ही फ्रेज वापरणा-याने या रागाचे आरोह, अवरोह जरी सांगितले ना तरी लकडी पुलावर सत्कार करेन), ती निसटलेली उल्का आणि तुझ्या डोळ्यातून सटकलेला तो युगानुयुगे थांबलेला सागरअश्रू.....


    खल्लास..

    ReplyDelete