Monday 14 September 2015

कालच्या पावसात....

कालच्या पावसात काय काय घडलं? खूप काही. कुणाची मनं जुळली, कुणाला ओलं लंपट काहीतरी आठवलं, कुणी पहिल्यांदाच भिजलं, कुणी कितव्यांदातरी भिजलं, कुणी खिडकीत उभं राहून आपल्या माणसाची वाट बघितली, कुणी कुणाच्या तरी आठवणींनी उशीवर पूर आणला, कुणा आडगावच्या गरीब शेतकऱ्याच्या  चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीच्या खुंटांना पालवी फुटली, कुणाची तरी पांढ-या कपाळाची घरधनीण वरातीमागून आलेल्या पावसाला शिव्या देत होती.

कुणाच्या घरात पाणी शिरलं, कुणाच्या विहीरीत पहिल्यांदाच पाणी साठलं, कुणाच्या घरात गळक्या पत्रातून उलटी कारंजी गळत होती, कुणी पागोळीच्या आड पाउस थांबू नये अशी आशा करत बिलगून उभं होतं, कुणी तांबड्या पाण्यात लगेच बुडणा-या होड्या सोडल्या, कुणी कुणीही बघत नाहीयेना ते पाहून साठलेल्या पाण्यात उडी मारली, कुणी साठलेल्या पाण्यावरून सगळं सावरत उडी मारली.

एक घटना अजून घडली. झाडावरचं एक घरटं वा-यानी अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्यानी तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. 'सकाळी बोलूयात', तो म्हणाला. 'हो', ती म्हणाली. रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.

सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. तो उत्साहानी म्हणाला, 'निघूयात? नव्यानी काड्या आणू'. तिच्या डोळ्यात पाणी आलं. 'वेडी, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत! चल निघूयात". आणि त्यांनी उंच आकाशत झेप घेतली.

कालच्या पावसात हे सगळ्यात सुंदर घडलं.

--जयंत विद्वांस 





No comments:

Post a Comment