Monday 21 September 2015

रावसाहेब

रावसाहेब म्हणजे आमच्या छोट्याश्या गावचा राजाच म्हणा नं तुम्ही. तसं त्यांचं नाव भारदस्त होतं एकदम, श्रीमंत सत्यजितराजे पटवर्धन. रावसाहेब म्हणजे आमच्या गावाची शानच म्हणा ना. वय काही तसं फार नव्हतं. साधारण तीस-एकतीसच्या आसपास असेल. पण त्यांच्याकडे बघून तेवढंही वाटायचं नाही. चांगली सहा, सव्वासहा फुटाच्या आसपास उंची, गरुडासारख धारधार नाक आणि समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे निळसर झाक असलेले डोळे, व्यायाम करून चांगली धष्टपुष्ट केलेली सुडौल अंगकाठी आणि थोडासा खर्ज असलेला दमदार आवाज. विदेशात राहिल्यामुळे नुसते गो-या साहेबासारखे दिसायचे. 

त्यांचे पूर्वज सांगलीच्या राजघराण्याशी संबधित आहेत असं म्हणतात. सगळे त्यांना रावसाहेब असच म्हणायचे. त्यांच्या वडिलांना 'रावबहादूर' पदवी मिळाली होती. यांना कुणी दिली नव्हती. पण सगळं गाव त्यांना 'रावसाहेब'च म्हणायचं. त्यांचे वडील रावबहादूर लवकर गेले त्या मानानी, एकुलते एक रावसाहेब पंधरा वर्षाचे असतील जेमतेम. एवढ्या लहान वयात पण ते डगमगले नाहीत. त्यांच्या आईसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ होतं एकदम. रावसाहेबांच इंग्लंड मधलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकटीन सांभाळल त्यांनी सगळ. खटलं काय लहान होतं होय. पण बाईमाणूस म्हणून कुठे काही दुर्लक्ष झाल नाही. गावाच्या बाहेर एक साखर कारखाना, दाराशी बाहेरून आणलेल्या चार पाच किमती गाड्या, मोजता येणार नाही इतकी चहूकडे पसरलेली शेती, ऊस, गहू, फळबागा, कुठल्यातरी जीपची एजन्सी, पुण्याकडे मालकीची दोन थेटर आणि बरच काही. तुम्हाला सुचेल तो आणि आठवेल तो धंदा त्यांच्या मालकीचा होता म्हणाना. 

एकवीस बावीस वय असताना ते शिक्षण पूर्ण करून आले परत आणि त्यानंतर साधारण वर्षभरानी आईसाहेब गेल्या. खूप वाईट झाल हो. पण रावसाहेबांनी दोनेक वर्षात असा काही जम बसवला की सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. चोविसाव्या वर्षी त्यांचं लग्नं झालं बघा, ते इंदूर की काय तरी गावाचं नाव आहे ना तिथल्या राजघराण्यातल्या मुलीशी. वहिनीसाहेब म्हणजे नुसत्या फोटोतल्या लक्ष्मीसारख्या. आमच्या रावसाहेबांच्या तोडीस तोड एकदम, त्यांच्या खांद्यापर्यंत येणा-या, गो-यापान आणि गुडघ्यापर्यंत केस असलेल्या. त्या चुकून कधी बोलल्या तर आपल्या तोंडून तर शब्दच नाही निघायचा बघा. इतकी रूपवान, श्रीमंत बाई पण गडी माणसांशी पण अहो जाहो करत मध सांडल्यासारख बोलणार. आवाज नुसता कानात साठवावा. 

उगाच म्हटलं का आमच्या गावची शान होते म्हणून. रावसाहेबांनी गावात शाळा काढली, कांलेज पण काढलं. गरिबांना फी नाहीच. पुस्तकं पण फुकट. एवढा श्रीमंत राजा पण देवमाणूस एकदम. कधी अंगावर दागिना म्हणून दिसायचा नाही, एक बोटातली हि-याची अंगठी सोडली तर. त्यांची श्रीमंती बघावी दस-याला. एवढा मोठा चौसोपी वाडा राजवाड्याच्या तोंडात मारेल असा सजलेला असायचा. मखमली लोड तक्क्याची बैठक घातलेली असायची. दोन्ही हाताच्या चारी बोटांत वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या, गळ्यात बोराएवढ्या टपो-या मोत्यांची माळ आणि खाली लोंबणारा मुठीएवढ्या आकाराचा हिरवाकंच पाचू, सोन्यात गुंफलेली पोवळयाची माळ, डोक्यावर पगडी, कानात भिकबाळी, सिल्कचे उंची कपडे घालून रावसाहेब झोकात बसायचे. पण हे काहीच नाही. दागिने आणि श्रीमंती बघायची असेल तर आमच्या वहिनी साहेबांना बघायचं त्या दिवशी. मगाशी म्हटलं न तश्या साक्षात फोटोतल्या लक्ष्मी सारख्या. काही काही दागिन्यांना काय म्हणतात ते ही सांगता यायच नाही मला. नखशिखांत हि-या मोत्याच्या दागिन्यांनी मढलेल्या असायच्या. जरा हलल्या की कुठल्या हि-याच्या किरणानी डोळे दिपले सांगता यायच नाही. रावसाहेब येईल त्याच्याकडून वयाप्रमाणे सोन द्यायचे किंवा घ्यायचे. सगळ काम कस आदबीनं एकदम, सोन घेता देताना त्यांचा हात जरी आपल्या हाताला लागला तरी धन्य वाटायचं. अख्खा गाव जेवायचा त्या दिवशी वाड्यावर. पण ही सगळी श्रीमंती सणापुरती. एरवी वागण्या बोलण्यात हा माणूस अगदी साधा. 

रावसाहेबांचा दिनक्रम ठरलेला असायचा, एकदम शिस्तीचा माणूस. सगळी कामं कशी वेळेत. रोज संध्याकाळी रावसाहेब चालत निघायचे आणि गावात एक चक्कर मारायचे. अगदीच टेकले तर लखीचंद सराफाच्या पेढीवर नाहीतर बँकेच्या साहेबाकडे, नाहीतर कुठेही थांबायचे नाहीत. गळाबंद कोट, हातात सिंहाच तोंड असलेली चांदीच्या मुठीची काठी हातात खेळवत ते फिरायचे. काठीची काही गरज नव्हती खरतर त्यांना पण त्यांच्या एकूण रुबाबात ती भर घालायची. त्यांनाही ती आवडायची. सगळ गावच त्यांना ओळखायचं आणि ते गावाला. रस्त्यात दिसेल त्या माणसाकडे बघून ते हलकंसं, ओळखीचं हसायचे. रावसाहेबांनी आपल्याकडे बघाव, हसावं, बोलावं असा रस्त्यातल्या प्रत्येकाला वाटायच. काही चौकशी करायला रावसाहेबथांबले आणि बोलले तर तो दिवस एकदम भारी गेल्यासारखा वाटायचा. 

आयुष्यात काही बनायचं असेल, चांगला माणूस व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर रावसाहेबांसारख असं प्रत्येकाला वाटायचं. हे स्वप्नं खरं होवो न होवो पण प्रत्येकाला ते बघायला आवडायचं आणि ते एकमेकांजवळ कबुल करताना पण काही कमीपणा वाटायचा नाही आम्हाला. आमची गरिबी सुसह्य करायला त्यांचं आमच्या सोबतचं अस्तित्वही कारणीभूत आहे असं वाटायचं. माणूसच तसा होतो हो तो. आदर्श ठेवावा असा. निष्कलंक चारित्र्याचा, सरळ मनाचा, एवढ रुबाबदार श्रीमंत व्यक्तिमत्व पण माणुसकी शिल्लक असलेला. त्यांची असूया नाही वाटली कधी, उलट आपणही त्यांच्या सारखं व्हाव असच वाटायच. 

आठवडा होईल आता त्या गोष्टीला विपरीतच घडलं म्हणा ना एकदम. आदल्या दिवशीच तर मी बोललो न त्यांच्याशी, त्यांनी माझ्या मुलाबाळांची चौकशी पण केली. एवढा आनंद झाला होता म्हणून सांगू तुम्हाला. कशामुळे काय कळल नाही अजूनपर्यंत तरी पण त्या दिवशी रात्री पंख्याला टांगून आमच्या रावसाहेबांनी गळफास घेतला. 

जयंत विद्वांस 

(आम्हाला बारावीला E.A.Robinson यांची 'Richard Cory' कविता होती. तिचा शेवट अजूनही डोक्यातून जात नाही. का केलं असेल त्यांनी असं? याच्या अनेक शक्यता मी पडताळून पाह्यला आणि त्या रिचर्ड कोरीनी मला अस्वस्थ केलं. रावसाहेबांशी मिळतं जुळतं काही असेल तर त्यांचा शेवट. पण रावसाहेबलिहायला रिचर्ड कोरी पर्यायानी त्याचा निर्माता रोबिनसोन तेवढाच कारणीभूत आहे, त्यामुळे ते श्रेय त्यांच. मूळ कविता खालीलप्रमाणे – 

Whenever Richard Cory went down town, 
We people on the pavement looked at him: 
He was a gentleman from sole to crown, 
Clean favored, and imperially slim. 

And he was always quietly arrayed, 
And he was always human when he talked; 
But still he fluttered pulses when he said, 
"Good-morning," and he glittered when he walked. 

And he was rich – yes, richer than a king – 
And admirably schooled in every grace: 
In fine, we thought that he was everything 
To make us wish that we were in his place. 

So on we worked, and waited for the light, 
And went without the meat, and cursed the bread; 
And Richard Cory, one calm summer night, 
Went home and put a bullet through his head. 

(E.A.Robinson)

No comments:

Post a Comment