Friday 9 October 2015

ऐकत रहावं फक्तं....

वाचाळ असणं हा खरं तर दुर्गुण आहे पण इथले काही वाचाळ मला आवडतात. वृत्तांत, कौतुक सोहळे मला अण्णांनी गळ्यात मारलेत आणि मलाही ते आवडतं आणि खोटी स्तुती करायला कुठे फार कष्टं आहेत, त्यामुळे ती मी अधूनमधून करतोही.

गेटूगेला समजलेला पहिला वाचाळ राजेश मंडलिक. हा माणूस सुंदर कविता वाचतो. स्पष्टं शब्दोच्चार मला मोह घालतात. बरं तो छापील वाचत नाही. त्या छापखान्यातल्या खिळ्याला चिकटून आलेला कवीच्या मनातील अर्थ तो शब्दं इकडचा तिकडे न करता आव न आणता पोचवतो. माणसाचा स्वभाव त्याच्या कृतीत, कलेत कुठे न कुठे डोकावतो असं म्हणतात. राजेश मोकळा माणूस आहे, कलासक्तं आहे हे त्याच्या वाचण्यात दिसतं. प्रोफेशनल तयारी त्याच्यात दिसत नाही पण अभियंत्याचा काटेकोरपणा मात्रं दिसतो. आनंद द्यायची सुद्धा वृत्ती लागते. फक्तं स्वत: आनंद घेणं वेगळं आणि स्वत: घेत असताना तो हसमुख चेह-यानी दुस-याला देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

काही गवई गाताना अतिशय विद्रूप हावभाव करतात. सतत बद्धकोष्ठं झाल्यासारखा चेहरा असतो. लहान मूल जसं न ठरवता कागदावर कुठलाही आकार, चित्रं मनात न धरता रेघा मारतं तसं राजेश सहज वाचतो. त्याची आणि अण्णांची संपू नये अशी वाटणारी जुगलबंदी ज्यान्नी पाहिली ते लोक भाग्याचे. 

दुसरी वैशाली. ती लहान मुलासारखा आवाज काढते, कार्टून्सना बोलतं करते यात मला काही आश्चर्यं वाटत नाही. ती मोठ्यानी ओरडली तरी नाजूक आणि लयबद्ध ओरडेल अशी मला खात्री आहे इतकी ती गोड आहे. काही शब्दं काही भाषांमधून घ्यावेच लागतात. प्लेझंट फेस. हाच शब्दं योग्यं आहे तिच्यासाठी, गोड पेक्षा सरस आहे तो. ती एरवी बोलताना सुद्धा मंजूळ बोलते. सिंथेसायझरवर काढलेला आणि मूळ वाद्यावर काढलेला आवाज यात फरक असतो. यंत्रावर भास निर्माण करता येतो फारतर, मूळ वाद्यात आस निर्माण करता येते. तसा वैशालीचा गळा मूळ वाद्यासारखा आहे.

एखाद्या माणसाबद्दल आपण प्रथमदर्शनी ठोकताळे मांडत असतो. ती चेह-यानी जेवढी आनंदी दिसते तेवढीच आवाजानीही आहे. गेटूगेला ती आवाज काढत असताना मी एकटक तिच्या आनंदी चेह-याकडे बघत होतो. तो चेहरा मी विसरणार नाही.

तिसरी वाचाळ, स्वरूपा. हौशी आणि एकूणच दणकट प्रकरण आहे. तिचा एरवी फोनवर आवाज ऐकलात तर तुम्ही फोन पुढे धरून नंबर चेक कराल की मी फोन तर स्वरूपाला लावला आणि कुठल्यातरी बाप्याला कसा काय लागला. तिच्या आवाजाला एक कोकणी मालवणी अनुनासिक स्वर, हेल आहे. एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्हाला तो मंजूळ वगैरे वाटण्याची पण शक्यता आहे. मकर राशीच्या माणसाला एकानी सांगितलं पुढची दहा वर्ष तुम्हाला खडतर आहेत. त्या बिचा-यानी उत्साहानी विचारलं, नंतर? तो म्हणाला, नंतर सवय होईल. असा प्रकार आहे.

श्रीनिंच्या वर्कशॉपला जाउन तिनी मेहनत घेतलीये. तिनी वाचलेल्या काही कथा माझ्याकडे आहेत. अतिशय मन लावून वाचल्यात तिनी. प्रत्येकवेळेला तिच्यातला तो नविन काहीतरी करण्याचा उत्साह मला मोहवून जातो. उपजत कला असणं हे भाग्यं लागतं आणि आपल्यालाही हे यायला पाहिजे या हौसेनी शिकणं हे वेगळं असतं. (श्रीनीचा आवाज बिघडायला लागलाय त्यामुळे ते आता ती यायच्या आत दार घट्ट बंद करून घेतात असं कानावर आलंय. लोक बोलतात काहीही, आपण लक्ष नाही द्यायचं).

चौथी लेटेस्ट सापडलेली वाचाळ शिल्पा केळकर. ती सराईत वाचाळ आहे. ती अभिनय करते वाचताना. लहानपणी रेडिओवर श्रूतिका लागायची. ती ऐकून सुद्धा समोर घडत असल्याचा फील यायचा. बातम्या देताना पण वाचतातच की पुढ्यात लिहिलेलं (भक्ती बर्वे इथून तुला एक सलाम) पण अर्थात त्यात भावना, अभिनय अपेक्षित नसतो. पण पुढ्यातला कागद असा वाचायचा की कागद नाहीसा व्हावा आणि समोर सगळं घडतय असं वाटायला लागण्याची ताकद शिल्पाकडे आहे.

उशाशी, शिक्षा, गोष्टं, काढायची या शब्दातले ष श क्ष च तिच्या तोंडातून मूळ रुपात बाहेर येतात. उच्चारात पण अर्थ असतो. वेद, ऋचा, मंत्र शुद्ध त्यासाठीच म्हणतात. प्रत्येक व्यंजनाला, स्वराला वजन आहे, अर्थ आहे, त्याचे वेगवेगळे परिणाम आहेत. शिल्पानी ते कसोशीने जपलंय. (श फार वेळा येतोय का माझ्या लिहिण्यात?). माणसं चेह-यानी आज सुंदर असतील, उद्या नसतील पण ती असं काही सादर करताना, बोलताना जेवढी सुंदर दिसतात तेवढी इतर वेळी मला दिसत नाहीत.

'ओव्हरड्राफ्ट'मधलं तिचं '.. ऐकत रहावं फक्तं' हे वाक्यं ऐका. ऐकत मधे ऐ वर दिलेला जोर, आपण सहसा राहावं म्हणतो तसं न म्हणता म्हटलेलं 'रहावं' ऐका आणि सांगा. गोष्टं छोटी असते पण फार आनंद देउन जाते.

असा एक छुपा रुस्तूम आहे विशाल वाड्ये. त्याचा आवाजही ऐकत रहावा असा खर्जातला आहे. त्याच्याकडे सादरीकरण आहे, आवाजात सुत्रसंचालन आहे.

स्टेजवर राजेश वैशाली स्वरुपा शिल्पा श्रीनी नंदू बसलेत, विशाल आणि अण्णा त्यानां बोलतं करतायेत, मधूनच स्वत: आपल्याला चकित करताहेत. आपण सगळे समोर बसलोय. शोची सगळी तिकिटं मुकुंदा आणि शैलेशनी प्रेमळ भाषेत विकली आहेत. शो फूल आहे. समोर कधीही संपू नये असं वाटायला लावणारा काव्यं कथा गझल सुर गाणी यांचा उत्सव चालू आहे. टाळ्या वाजवून हात थकतील. नेमकं काय सुख प्राप्तं झालं हे सांगता येणार नाही अशी अवस्था असेल.

जमवा राव एकदा, नवी पेठेत जायच्या आधी अशा काही आठवणी सोबत घेउन जाउयात.

--जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment