Tuesday 13 October 2015

घास….

घास…. 

काल घराघरातून खिडक्यात, अंगणात, टेरेसवर पान वाढून ठेवलं गेलं. श्रद्धा अंधश्रद्धा भाग सोडून देऊ. त्यावरच्या चर्चेतून निष्पन्न काही होत नाही. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. ती अंध आहे की डोळस हे आपण कशाला ठरवूयात. मला त्याच्या मागची भावना दिसते. खरंतर अनेक माणसं आयुष्यातून भरल्या पानावरून उठून जावं तशी कायमची निघून जातात परत न येण्यासाठी. त्यामुळे ठेवलेलं पान नेमक्या कुणासाठी हा प्रश्नं चेष्टेने विचारतात लोक, त्याला उत्तर नाही आणि देऊही नये.

जीनी ठेवलं तिला ते रिकामं उचलताना हुंदका फुटला असेल. तीच्या मनातला माणूस येउन गेला, जेवला, आशीर्वाद दिला आणि गेला. या न घडलेल्या गोष्टी कदाचित तिच्या दु:खावर पांघरुण घालत असतील. ते शल्यं/सल यावर फुंकर बसत असेल. वर्षभर आठवण येतेच की, येतंच असणार पण रोज रडू येणं शक्यं नाही, तसं केलं तर जगणंही मुश्किल होईल. आपणही त्याच मार्गावर आहोत, पुढे गेलेल्यांच्या आठवणी काढत आपणही तिकडेच चाललोय मग का जीव गुंततो एवढा? गुंततो, त्याला उत्तर नाही.  

माणूस निर्वतला म्हणजेच आठवण येते? काही लोक आयुष्यातून दूर जातात. चूक कुणाची, कारणं काय वगैरे मुद्दे सोडा, प्रत्येकाची एक बाजू असते आणि ती त्याच्या मते खरी असते. तरीपण त्या मोकळ्या जागा आपल्या लक्षात रहातात. घासातला घास आपण ज्याला देत होतो किंवा जो आपल्याला देत होता, त्याची आठवण होते. आपण कुणासाठी किंवा कुणी आपल्यासाठी काही चांगलं चुंगलं केलं तर दोन घास बाजूला काढायची पद्धत होती. आज्जी म्हणायची, 'राहू दे थोडं, मूलं डोकावली तर हातावर द्यायला राहू दे'. माया असायची. गुप्तंधन ठेवल्यासारखं भांड्यात ठेवलेला खरवस, साखरभात, मोडकळीला आलेली अर्धी पुरणाची पोळी, नारळाच्या दोन वड्या, बेसनाचा बुडाला चिकटलेला लाडू, खारट गाळ जास्ती असलेला चिवडा कुणी मायेचं माणूस घासभर काढून ठेवायचं. जिभेवर ती काढलेल्या घासाची अमृतचव अजून रेंगाळतीये

'हॉटेल रविराज'ला असताना ऑफिसमधे आम्ही चार पाचजण एकत्रं जेवायला बसायचो. एक दिवशी जेवताना मी नव्हतो, उशिरा आलो आणि दुष्काळातून आल्यासारखा जेवायला बसलो, *** जेवायची थांबली होती, मला माहित नव्हतं. कुणीच काही बोललं नाही. माझं जेवण झालं, मी जागेवर येउन बसलो. सगळे हसत होते. तिनी डबा काढला, कोप-यात जाऊन जेवायला बसली. नकळत घडलं माझ्याकडून, त्या चुकीला माफी नव्हतीच. मी कडेला जाऊन बसलो आणि 'सॉरी' म्हणालो. काहीवेळा काहीच बोलू नये चूक झाल्यावर, समोरच्याला पश्चात्ताप कळतो. हातातला घास तसाच ठेऊन तिला हुंदका फुटला आणि ती हमसाहमशी रडायला लागली. ऑफिसमधे मी तिला जवळ घेऊ शकलो नाही. बेसिनपाशी जाऊन आवाज न करता रडलो, तोंड धुतलं आणि परत आलो. कधीतरी डबा खाताना ती आठवते. घास अडकतो, डोळ्यात पाणी येतं मग उरलेले दोन घास तसेच घरी जातात.   

आता सुबत्ता आली. पैसा, माणसं मुबलक झाली, लोक घास जेवढे खातात त्याच्यापेक्षा दुप्पट वाया घालवतात. आता लोक वगळून खातात, दोन घास वगळून, काढून ठेवायचे दिवस गेले. कधीतरी आज्जी आठवते, जेवायला थांबणारी ती आठवते, आठवण उफाळून येते आणि मग घास अडकतो. डोळ्यात पाणी येतं. त्या सगळ्यांसाठी प्रथा म्हणून आपण घास ठेवत नाही तर ज्यांच्यासाठी घास अडकतो त्यांच्यासाठी ठेवतो, एवढाच मी त्यातला काढलेला अर्थ आहे.   

जयंत विद्वांस 





No comments:

Post a Comment