Tuesday 27 October 2015

विनासायास वेट लॉस - लेखक डॉ.जगन्नाथ दिक्षीत

विनासायास वेट लॉस - लेखक डॉ.जगन्नाथ दिक्षीत 

वीतभर पोटाची खळगी वगैरे शब्दंप्रयोग आता बाद होणार अशी परिस्थिती आहे. तमन्ना, करीना कपूर आणि काही तत्सम सपाट तलम पोटं सोडली तर बाकीची सगळी पोतं दिसतात. वीतभर पोट मीटरभर होतं, शिंप्याच्या टेप ऐवजी सुताराचा मेझरिंग टेप लागेल अशी पाळी येते मग माणसं झटून विचार (फक्तं विचार, नथिंग एल्स) करायला लागतात. सौंदर्य काही आपल्या हातात नसतं पण फिट राहणं निश्चितच आपल्या हातात आहे. तरुण माणूस त्याच्या केशरचनेकडे, कपड्यांकडे फार लक्ष देत नाही पण जिमला मात्रं जातो अर्थात फिट रहाण्यापेक्षा वेगळा हेतू त्यात असतो पण निदान तो ती नाटकं चार सहा महिने तरी करतो.

दिखाव्याला जग भुलतं असं म्हणतात. माणूस एकदा तिशी ओलांडून गेला की त्याच्या पाठीमागे व्याप लागतात. पैसे कमावून तो आधी घर सजवतो, मग बायका, मुलं सजवतो, पैसे साठवतो. या सगळ्यात चाळीशी येते आणि मग पुढची वर्ष पटापट चालली आहेत असं त्याला वाटतं. केस शिल्लक राहिले असले तर पांढरे होऊ लागतात, मान, पोट, मांड्या, दंड, पार्श्वभागावर चरबीच्या अनधिकृत वसाहती उभ्या रहातात. मार्करनी नकाशावर मिठी नदीचा मूळ प्रवाह मार्क करतात तसं 'इथे हनुवटी संपते किंवा मूळ इथंपर्यंत होती ' अशी रेघ आणि पाटी लावायला लागेल अशी परिस्थिती येते. आपण महापालिकेला उगाच नावं ठेवतो, 'डोळ्यांसमोर उभ्या रहात होत्या तेंव्हा दिसली नाहीत का अनधिकृत बांधकामं?' हे वाक्यं आपल्यालाही लागू होतं. मग आपल्या एकूणच पळ काढण्याच्या वृत्तीनुसार समस्येच्या मुळाशी न जाता निरुपयोगी बाह्य उपाय चालू होतात.

ढगळे शर्ट, टी शर्ट घालणे, प्यांट वर नेसणे, शर्ट इन न करणे, आपण कसे फिट आहोत याच्या आपल्याच ढेरपोट्या मित्रांबरोबर चर्चा करणे, 'आयुष्यं एकदाच मिळतं, खा प्या मजा करा' असे वरकरणी छान वाटणारे कोट्स फेकायला सुरवात होते. डाय लावायला सुरवात होते. मग कुणाच्या तरी सांगण्यावरून बर्मुडा, टीशर्ट, चारपाच हजाराचे शूज खरेदी करून रनिंग, योगा (योग कोण म्हणालं रे? गावठी कुठला), जॉगिंगचं प्लानिंग होतं. नेट आणि अर्धवट माहिती असणा-यांकडून डायेटिंग चार्ट तयार होतात. अर्धा किलोमीटर चालून आल्यावर येता येता रुपया खर्चून २०० ग्रॅम वाढलेलं वजन शूज मुळे असणार असा दिलासा देता येतो. आलेला घाम व्यायामामुळे नसून न झेपलेल्या कष्टामुळे आलाय हे फक्तं मनाला माहित असतं. रक्तात साखर वाढते आणि जीभ मात्रं कडवट होते, रक्तं उसळ्या मारतं ते पेटून उठल्यामुळे नाही तर वाढलेल्या दाबामुळे, त्यात मग छातीत हलकीशी चमक जरी उठली तरी जीव घाबरा होतो.

तात्पर्य, आपण अस्ताव्यस्त वागून शरीर जुगारी माणसाच्या कर्जासारखं आटोक्याच्या बाहेर जाऊ देतो आणि सरकारसारखं समस्येच्या मुळाशी न जाता कर्ज माफीसारखे वरवरचे उपाय वारंवार करतो, निष्पन्न काही होत नाही. आयुष्यं एकदा मिळालंय हे कळतं पण ते कसं जगावं हे कळत नाही. जाहिरातींना भुलून कचरा आपण सोन्याच्या भावात खातो आणि नको असलेले नातेवाईक चिकटतात तशी बिनकामाची चरबी अंगात मेहनत न करता साठवतो. मिळेल तेवढं खातो आणि ताण सहन झाला नाही की अजून खातो. दुष्टंचक्रं आहे ते. वेळीच बाहेर पडायला हवं असं मन सांगत असतं पण मन, मसालेदार, चमचमीत खायला चटावलेली जीभ ऐकत नाही. शिस्त कुणाला प्रिय असते तशीही? टाळण्याकडे कल असतोच प्रत्येकाचा. अर्थात जमिनीत तोंड खुपसून बसलं म्हणून वादळ यायचं काही थांबत नाही.

परवा डॉ.जगन्नाथ दिक्षीत भेटले होते. एबीसीडी लिहावी तशा या माणसाच्या नावापुढे डिग्र्या आहेत. नावाखाली दोन तीन ओळी सहज भरतील एवढा मजकूर आहे ज्ञानाचा. माणूस साधा आहे, जमिनीवर पाय असलेला आहे. त्यांनी मला परवा पुस्तक सप्रेम दिलं. एका बैठकीत वाचून होईल एवढं छोटं आणि नगण्यं किंमतीचं आहे. अतिशय सोप्या शब्दात आणि मराठीत सगळ्यांना समजेल असं आहे. ये दिक्षीत भी पागल आदमी मालूम पडता है! रिझल्ट मिळत असताना असं कमी पैशात साधे सल्ले कुणी देतं का? कसं मस्तं अवघड इंग्लिशमधून गुळगुळीत कागदावरचं, अनेक स्लीम देखण्या बायकांचे फोटो टाकून, आधीचा एकशेवीस किलोचा लाल भोपळा आणि नंतरचा सत्तर किलोचा दुधी भोपळा (ते पण फक्तं चार महिन्यात [फक्तं चार महिन्यात बोल्ड लेटरिंग]) असे चार पाच जणांचे फोटो त्यांच्या मुलाखती सकट टाकून हार्ड बाउंड चार पाचशे रुपयाचं पुस्तक काढायला हवं होतं. बल्क एसेमेस वर जाहिरात करून चार पाच शहरात आठवड्यातून एकदा एसी रुमात कन्सल्टंसी ठेवायला हवी होती. लई पैका ओढला असता.

आपणांसी जे जे ठावे…या भावनेनी त्यांनी पुस्तक लिहिलंय. स्वत:वर प्रयोग करून लिहिलंय. ऐकीव, वाचलेल्या माहितीवर लिहिलेलं नाही. सगळ्यांनी निरोगी रहावं इतका आणि इतकाच स्वच्छ हेतू आहे त्यात. काय खा, कधी खा, केवढं खा इतकंच सांगितलंय त्यांनी. उपाय साधा आणि स्वस्तं असला की तो लायकीचा नाही अशी आपली मानसिकता आहे. "भोपळी मिरचीची भाजी साठ रुपये? लुटतात साले". "स्टफ्ड कॅप्सीकम अडीचशे रुपये, यू नो, इट्स रिअली माउथ वॉटरिंग". दिक्षीत साध्या शब्दात सांगतायेत ते लक्षात घ्या. पुढचा काळ वाईट आहे. किती पैसे साठवाल असे? कितीचा काढाल मेडिक्लेम? त्यानी फारतर बिल भरलं जाईल पण भोग तुम्हांलाच भोगावे लागणार ना? It's better late than never. नुसता पश्चात्ताप होऊन उपयोग नाही, अंमलात आणाल तर निरोगी जगाल.

मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी काढलंय पुस्तक. मिळतंय सगळीकडे. नवी पेठेत वजन जास्ती म्हणून कुणी खांदा देणार नाही अशी वेळ आणू नका. अजून या कामाला जेसीबी वापरल्याचं ऐकिवात नाही. एकतर पुस्तक वाचून अंमलात आणा नाहीतर जेसीबीचं कोटेशन आणून बिझनेस करा. सोप्पं काय ते तुमचं तुम्ही ठरवा. 

जयंत विद्वांस        




No comments:

Post a Comment