Saturday 31 October 2015

विन्या पानसे....

विन्या पानसे....

"कपाळ, नाक, कान, तळपाय आणि तळहात सोडले तर अळीव टाकल्यासारखे केस आहेत लेका तुझ्या अंगावर. लहानपणी कुठे शेतात सुफला १५:१५:१५ टाकल्यावर लोळला वगैरे होतास का डुकरासारखा". कुठलीही ओळख नसताना विनय पानसे या महाभागानी मला हा प्रश्नं विचारलेला. महिनाभर लेट आडमिशनमुळे अड्ड्यात मी नविनच होतो, विनय गावाला गेल्यामुळे ओळख झाली नव्हती. बाकीच्यांच्या बोलण्यात सतत त्याचं नाव यायचं. मी ही उत्सुक होतो या प्राण्याला भेटायला. त्याचे उद्धटपणाचे किस्से कानावर आलेच होते.

चेह-यानी (फक्तं) अतिशय सालस, गोरापान, दाट काळेभोर कुरळे केस, व्यायामानी अगदी पिळदार झालेला सहाफुटाचा दणकट सागवानी खांब दिसायचा तो. मधाच्या रंगाचे पिंगट डोळे, व्यवस्थित कापलेली ट्रिम मिशी आणि विनोद खन्नासारखे कानापर्यंत जाड कल्ले असा सगळा एकूणच देखणा मामला होता. तो गावाहून आला ते बॅग रूमवर टाकून थेट अड्ड्यावर म्हणजे टपरीवर आला. टपरी मालक आबा पालकरना जोरात हाक मारलीन आधी बाहेरून 'आबा, आहात ना?' आतून आबांनी पण तितक्याच जोरात उत्तर दिलं 'आहे, मायझ्या मी मरायचीच वाट बघ. गिळलं आहेस का काही? गरम वडे टाकतो थांब'. गेल्या आठ दिवसात न खाल्लेले गरम वेगळ्याच चवीचे वडे आणि आख्ख्या दुधातला चहा आला.

आठवडाभराचा वृत्तांत ऐकून झाल्यावर त्यानी सगळ्यांकडे अत्यंत कौतुकानी बघितलं आणि अचानक आठवण झाल्यासारखं मला विचारलं, 'नाव काय रे तुझं?' मी आपलं पुर्ण नाव सांगितलं. 'मयताचा दाखला काढायचाय का? पुर्ण नाव तिथे सांगायचं. आजपासून तू जया'. जसं काही मी माझं नाव ठेवायलाच आलो होतो तिथे. खिशातून विल्सचं पाकिट काढलं, सिगरेट काढली, पेटवली. 'तुला हवीये? ही घे, सेपरेट पेटव, माझी कुणाला देत नाही, कुणाच्या तोंडातली मी ओढत नाही'. मी माझी सेपरेट विकत घेउन पेटवली. 'रागावला काय रे? असशील तर ह्याच्या मारी माझ्या' म्हणून हसत सुटला. प्रथमभेटीत वाईट मत होईल असाच होता तो.

वर्गात मात्रं तो सगळ्या तासांना बसायचा मागच्या बाकावर. तल्लफ आली की बाहेर टपरीवर जाऊन धूर काढून यायचा. त्याला कुणीच काही बोलायचं नाही. आम्ही सगळे लास्ट इयरला होतो इंजिनिअरिंगच्या. बाबांची बदली झाल्यामुळे मी या आडगावात आलेलो. हळूहळू ओळख झाली विन्याशी. त्याला आई नव्हती, वडिलांचा कारखाना होता. त्याला त्यामुळे बरीच माहिती होती आधीच मेकॅनिकलची, डिग्री हवी म्हणून तो आलेला फक्तं. 'काय करतोस घरी संध्याकाळी? अभ्यास सांगू नकोस, इथेच मारेन'. 'का रे?' 'योनेक्सच्या दोन रॅकेट आहेत. येशील?'. मग आम्ही रोज बॅडमिंग्टन खेळू लागलो. मी ही पावणेसहा होतो पण पावफुटाचा फरक पडायचाच. मजा यायची. खेळ झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. हळूहळू कवचातला विन्या दिसू लागला होता.

एक दिवस अचानक म्हणाला 'कधी प्रेमात पडलाएस?' 'हो, अजून आहे, का रे?' 'नशीबवान आहेस. फक्तं कविता बिविता देउ नकोस हा'. नंतर तो माझ्या घरी येउ लागला. घरचाच एक झाला. अनंत वेळा आला. जाताना आईच्या पाया मात्रं पडायचा कायम. एकदा आईनी काहीतरी काम सांगितलं, मी उद्या आणेन म्हटलं. हा तिरसटल्यासारखा उठला आणि ते काम करून आला आणि म्हणाला, 'भडव्यो, आई आहे म्हणून किंमत नाही तुम्हा लोकांना'. तो घरी फार कमी जायचा. मी विचारलं एकदा त्याला दिवाळीला. 'काय करू जाऊन, बाप पैसा जमवतोय फक्तं माझ्यासाठी, मोठेपणासाठी. लॉज आहे माझं घर, फाईव्ह स्टार एकदम. चेक इन,  चेकाउट, नोबडी आस्क मी, हाउ आर यू, व्हाय सो लेट, इज नेसेसरी टू गो टूडे? रहा अजून दोन दिवस कुणी म्हणायला हवं ना?' गाडीला किक मारून गेला सुद्धा तो.

आबा पालकर आजारी पडले म्हणून दवाखान्यात होते. सगळे गेलो होतो तर विन्या तिथे लाल डोळ्यानी बसलेला. '##मारीच्यान्नो आत्ता येताय होय, आहेत अजून' आणि ढसाढसा रडायला लागला. ' डॉक्टर म्हणालेत चोवीस तास काढायला हवेत हे'. चोवीस तास पार पडले, आबा वाचले. मी डिस्चार्जला गेलेलो विन्याबरोबर. चार पाच हजाराचं बिल यानीच भरलं. आबांनी घरी गेल्यावर डब्यातून दोन हजार काढून विन्यासमोर धरले. 'सुरनळी करा आणि घाला माझ्यात, खायला घालताना हिशोब केला होतात का? चार पाच महिन्यात मी जाईन, त्याच्या आत जा म्हणजे घोर नाही रहाणार मला'. आबा ढग फुटल्यासारखे रडले. लहान मूल रडतं तसा विन्या रडला त्यादिवशी.

'तुझी कविता दे की रे एखादी वाचायला, मी ही केल्यात मागे, थांब देतो'. अतिशय सुवाच्यं मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेली एक वही त्यानी दिली. पहिल्याच कवितेला मी गार झालो.

नक्षी.....

तिनी नक्षी काढल्यासारख
माझ्या तळहातावर
नाजूक बोटांनी कोरलं
'माझं तुझ्यावर प्रेम आहे'
आज इतकी वर्ष झाली
पुसलंही जात नाही, दिसतही नाही

माझा चेहरा ओंजळीत धरत
तिनी बाण मारल्यासारखे
माझ्या डोळ्यात डोळे घालून
टोकदार तीर सोडले
आज इतकी वर्ष झाली
निघतहि नाहीत, मारतही नाहीत

माझ्याकडे बघत हात हलवत
डोळ्यांना रुमाल लावत ती
कधीतरी परत येईन म्हणत
दूर अज्ञातात निघून गेली
आज इतकी वर्ष झाली
येतही नाही, कळवतही नाही

आणि खाली फक्तं तिरक्या अक्षरात ठोंब्या लिहिलेलं त्याखाली दोन टिंबं. मी त्याच्याकडे पाहिलं. 'ती म्हणायची मला, चल दे इकडे, वाच परत कधी, खेळायला उशीर होतोय'.

हाहा म्हणता वर्षं संपलं, परीक्षा झाल्या, रिझल्ट लागला. आईनी विन्याला जेवायला घरी बोलावलं होतं. जाताना आईला त्यानी भारीतली कांजीवरम आणली होती ती दिली आणि पाया पडला. 'परत कधी भेट होईल माहित नाही पण तुमच्या घरचं मीठ खाल्लंय त्याचे ऋण फिटणार नाहीत, फेडणारही नाही'. रात्रीची गाडी होती. तासभर आधी आबांकडे गेलो. आबांनी त्याला डबा भरून दिला होता. म्हाता-याला शब्दं फुटेना. विन्या पाया पडला, त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि आम्ही निघालो. 'एकदा टपरीवर जाऊ चल' टपरीच्या बंद दरवाज्याला त्यानी खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, 'अन्नं खाल्लय रे इथे' आणि रडू लागला.

त्यानी आमच्यातलाच एका गरजूला गाडी अशीच देउन टाकली होती. माझ्या गाडीवर स्टेशनला सोडायला गेलो त्याला. 'पत्ता कशाला घेतलास आबांचा'. 'अरे कढईजवळ बसून खोकं झालंय पार, पैसे पाठवीन दर महिन्याला. कुणाला माहित नाही, मी आजारी होतो मागच्या वर्षी पंधरा दिवस. आबा चहा, नाश्ता, दोन वेळचं जेवण घेउन रुमवर यायचे. असो. फोन नंबर दिलाय तुला, कळवत रहा, चल बाय'. स्मशानातून परत यावं तसा मी परत आलो.

बाबांची बदली झाली दोन महिन्यात आणि आम्ही सगळे मुंबईला आलो. विन्याला सांगितलं. तो पुढे शिकायला यूएसला गेला तेंव्हा भेटून गेला. आबा गेले म्हणाला मागच्याच महिन्यात. पुढे संपर्क तुटला. मी ही नोकरीच्या निमित्तानी अनेक शहरं बदलली. विन्याचा काही तपास नाही. पंचविसेक वर्षं झाली. आईनी जीर्ण कांजिवरम अजून जपून ठेवलीये. येईल म्हणते शोधत बरोब्बर तो, भूत आहे ते. यायला तर पाहिजेच. अनंत गोष्टी अर्धवट सांगून गेलाय त्या विचारायच्यात आणि खूप काही. 

कॉलेजच्या रोडला टपरी दिसली की मी अजूनही थांबतो. एक वडा, एक कटिंग आणि दोन विल्स घेतो, एक सेप्रेट माझी, एक सेप्रेट विन्याची.

जयंत विद्वांस




No comments:

Post a Comment