Friday 16 October 2015

किती देते रे...

आयुष्यातली पहिली गाडी होती सेकंड ह्यांड स्प्लेंडर. तिच्यावर मी खूप फिरलो. नंतर नविन गाडी घ्यायचा विचार चालू झाला. सीबीझ आणि फिएरो नव्या आल्या होत्या दोन हजार साली. सीबीझला किक मारताना फूटरेस्ट आत घ्यावं लागायचं म्हणून मी ती घेतली नाही. एकतर माझ्या लक्षात राहिलं नसतं आणि किका बदलायचा खर्च झेपला नसता सारखा आणि नडगी किंवा घोटा पांढरा स्कार्फ घालून ठेवावे लागले असते..

मग पर्याय उरला फिएरो. तेंव्हा बावन्न हजाराला होती फिएरो. ऐपतीच्या बाहेरचीच गाडी खरंतर. दीडशे सीसी. मला झेपायचीही नाही. पण हौस दांडगी. तीन बारा दोन हजारला मी ती दाराशी लावली तेंव्हा मेन स्ट्यांडला लावताना तोल जात होता. एकतर त्या गाडीला लूक नाही. विचित्रं टाकी आहे तिची. एकंच फायदेशीर गोष्टं म्हणजे पुढे आणि मागे साईड इंडिकेटर आणि ल्याम्प एकाच साडग्यात आहेत. बाहेर कान आल्यासारखे नाहीत. त्यामुळे ते धक्का लागून तुटण्याची भीती कमी होती आणि ते आजतागायत शाबूत आहेत.

पंधरा वर्षात मी त्यावर रग्गड हिंडलो. अष्टविनायक, कोल्हापूर, महाबळेश्वर, अलिबाग, रोहा आणि अगणित वेळा बदलापूर, डोंबिवली. टायर, ट्यूब, बॅटरी, लॉक सोडल्यास एकही पार्ट चेंजलेला नाही. कुत्रं मधे आलं म्हणून चार जून चारला अपघात झाला एवढाच डाग तिच्यावर, बाकी अजूनही ती थंडीतसुद्धा फर्स्ट किकला स्टार्ट होते.

आता जरा वय मात्रं जाणवायला लागलंय तिचं. धापा टाकते चढावर. पण मी तिला काढणार नाहीये. तिच्या ब-याच गमतीजमती माझ्या आठवणीत आहेत. स्पीडोमीटर बंद होउन बरीच वर्ष झाली. तसंही असता चालू तरी मी ते अॅव्हरेज वगैरे चेकायच्या भानगडीत पडलो नसतो. लोकांनी सांगितलेलं अॅव्हरेज बाईनी सांगितलेल्या वयासारखं असतं, मजेशीर प्रकार आहे तो. कॉंट्रीब्युट असेल तर ते नेहमीच कमी असतं.

परवा पार्किंगमधे नेहमीप्रमाणे माझी फिएरो चेष्टेचा विषय होता. नेहमी पब्लिक एक प्रश्नं विचारतंच 'किती देते रे?'. म्हणतो मी, माहित नाही. जो पर्यंत ती चालतीये तोवर ती किती देते याची काळजी मला नाही. तिनी किती दिलंय ते मला माहितीये.

आता ती रुपवान नाही. पंधरा वर्ष उघड्यावर राहिलीये. दिवसातून किमान दोनदा माझ्या लाथा खातीये. तिच्या अंगावर तिसरा माणूस बसला तेंव्हा ती शहारली असेल, आनंदली असेल. निर्जीव असली म्हणून काय झालं तिच्यात माझा जीव अडकलाय एवढं मात्रं खरं.

परत कुणी विचारलं ना 'किती देते रे?', विचारणारा पाठमोरा दिसू दे, दोन पायातून पुढचं चाक काढणार आहे.

--जयंत विद्वांस
.



No comments:

Post a Comment