Saturday 5 September 2015

वन्स अपॉन अ टाईम (२२).....

वन्स अपॉन अ टाईम (२२).....

वॉर्न वर लिहिताना मी 'लेगस्पिन गोलंदाजी खेळणं म्हणजे 'अग्नीसाक्षी' मधल्या विक्षिप्त नाना पाटेकरसारख्या माणसाशी लग्नं करण्यासारखं आहे. कधी मूड बदलेल सांगता येत नाही', असं म्हटलं होतं. मुरलीबद्दल वेगळं काय म्हणणार अजून. त्याचे आकडे बघितले की चक्कर येते. नविन खेळाडूनी त्याला पाहिला नसेल तर आधी या धक्क्यातून सावरावं मग तो रिटायर्ड झालाय याचा आनंद मानावा. अनुक्रमे टेस्ट, वनडे ४४,०३९+१८,८११ चेंडू (एकूण ६२,८५०) टाकलेत आणि ८००+५३४ (एकूण १३३४) विकेट घेतल्या आहेत. नेट, फर्स्टक्लास, कौंटी मधे आणि उगवत्या काळात काय टाकले असतील ते वेगळेच. अनुक्रमे टेस्ट, वनडे मधे पाच विकेट/इनिंग ६७ आणि १० वेळा आणि दहा विकेट/टेस्ट २२ वेळा, बेस्ट बॉलिंग अनुक्रमे ९/५१ आणि ७/३०.

रिचर्ड ह्याडलीला जागेवरून हटवायला कपिलला 'बूस्ट-इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी लागलं होतं'. तेंव्हा वाटायचं रनात गावसकर आणि बळीत कपिल, आपलीच माणसं आहेत. पुढे बॉर्डर आला आणि नंतर तर रांगच लागली. खांद्याच्या दुखापतीमुळे मुरली खेळत नव्हता म्हणून त्यानी मागे टाकलेल्या वॉर्ननी (७०८+ २९३ - टेस्ट+वनडे) काही काळ परत आघाडी घेतली. मुरलीनी परत आल्यावर टाकी लावून गिरणी परत एकदा चालू केली. गहू, गव्हावर बाजरी, भाजणी, पिठीचा तांदूळ जे काय येईल ते भरडत सुटला. माणूस अतिशय सज्जन, मितभाषी, बघा ना साधं उदाहरण आहे, लक्षात ठेवायला सोप्पं पडावं म्हणून त्यानी आपल्या विरुद्धच्या त्याच्या शेवटच्या टेस्टमधे शेवटच्या चेंडूवर राउंड फिगर आठशे विकेट (प्रग्यान ओझा) पूर्ण केल्या आणि थांबला एकदाचा. उगाच ते ७९३, ७८७, ८१७ असले अवघड आकडे नाहीत. सहा विकेट/टेस्ट काय खायचं काम नाहीये.


त्याचा हात जन्मत:च वाकडा होता, डिलिव्हरी लिगल ठरवायला आयसीसीनी हाताच्या कोपराचा १५ अंशापर्यंतचा कोन मान्यं केलाय, एक अंश मुरलीपेक्षा जास्ती. त्याचा 'दुसरा' नंतर झेरॉक्स काढून सगळे टाकू लागले, सकलेननी आधी शोध लावला खरंतर पण भन्नाट वापरला मुरलीनी, मग सगळेच ऑफस्पिनवर विश्वास ठेवण्यापेक्षा 'दुसरा' टाकू लागले. मुरलीनंतर घातक 'दुसरा' म्हणजे सुनील नारायण. मुरलीचा चेंडू राग आलेल्या मुलीसारखा 'जा, तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही माझी' असं म्हणत ती करते तसा रोड क्रॉस केल्यासारखा वळायचा. आपल्याकडे एक पद्धत आहे, कुणाचा मोठेपणा मान्यं करायचा नाही. वॉर्न, मुरली आपल्याकडे फार चालले नाहीत कारण आपण पहिल्यापासून गल्लीबोळात स्पिन खेळत आलोय, असं म्हणायचं आणि पाठ थोपटून घ्यायची. मुरलीनी सगळ्यात जास्ती विकेट इंग्लंड विरुद्ध घेतल्यात (११२/१६ टेस्ट) आणि नंतर आपल्याविरुद्ध (१०५/२२ टेस्ट - पाच विकेट सात वेळा आणि डावात दहा, दोन वेळा) पण कौतुक म्हणून करायचं नाही मोकळेपणानी. 

कमी बोलणारा मुरली डोळ्यातून मात्रं आग ओकतो. चेंडू टाकताना त्याचे ते इंका की कुठल्यातरी संस्कृतीतल्या चित्रात कवड्या किंवा पांढरे खडे लावलेले मोट्ठे डोळे असतात ना तसे एक्स्पांड झालेले पांढरे शुभ्रं डोळे भीतीदायक वाटतात. त्याच्या चेंडूवर मिस्फिल्ड झाल्यावर त्याच्या चेह-यावरचा राग बघणीय असायचा कारण तो ही जीव तोडून फिल्डिंग करायचा पण अपील फेटाळलंय म्हणून तो कधी चिडला नाही, उगाच चर्चा, ड्रामा, धावून जाणे, काहीतरी अर्वाच्यं बोलणे, आउट झाल्यावर असुरी आनंद व्यक्तं करणे, फलंदाजाच्या कडेने जाऊन मुद्दाम काहीतरी पुटपुटणे, प्याव्हेलीयनकडे बोट दाखवत तुच्छता दाखवणे, हे कधीही दिसलं नाही. त्याचा त्याच्या बोटांवर विश्वास होता. एक अतिशय सज्जन माणूस. फलंदाजी करताना जे काय हसायचा आणि बघणा-यांना आणि गोलंदाजाला तो हसवायचा तेवढाच, बाकी सतत गंभीर, विचारमग्नं चेहरा. आयपीएलच्या शामियान्यात तो संघात नसला तरी फालतूपणा करताना कधी दिसला नाही. घरात वयस्कर मोठी माणसं असावीत, मुलांवर न ठरवता संस्कार होतात. मुरली, संगकारा, माहेला, आपले द्रविड, लक्ष्मण, सचिन सारखी माणसं तशी असतात ड्रेसिंग रूम मधे. न बोलता पुढच्या पिढीला संस्कारित करणारी

सिंहली तमिळ संघर्ष वर्षानुवर्षे चालू होता लंकेत. पण उपरा, स्थलांतरीत मूळ भारतीय वंशाचा तमिळ मुरली मात्र लंकेसाठी त्या सगळ्या पलीकडे आहे. त्याची बायकोही इथलीच आहे. त्याला भारतात यायला व्हिसा लागत नाही, त्याच्याकडे भारताची ओव्हरसीज सिटीझनशिप आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीला अवैध ठरवून त्याला पार हैराण केला होता. महाभारतात अर्जुनाच्या मागे पाठीराखा म्हणून कृष्णं उभा राहिला होता. मुरलीधर म्हणजे श्रीकृष्ण पण त्याच्या मागे कृष्णासारखा उभा राहिला तो खमक्या अर्जुना रणतुंगा आणि अख्खी लंका, कोण कुठले ऋण कसे फेडून घेईल सांगता येत नाही, हेच खरं.


जयंत विद्वांस     

  

No comments:

Post a Comment