Thursday 17 September 2015

चारोळी.....

चारोळी.....
 
चंगोंनी नावारूपाला आणली ती नाहीये म्हणत मी. आता अस्तंगत झाली ती खायची चारोळी म्हणतोय. खूप गोष्टी, खाद्यपदार्थ कालबाह्य झाले. आपण नव्याशी जुळवून घेता घेता खूप काही मागे सोडून आलो. 'मधली वेळ' 'काहीतरी खायला दे' हा प्रकार आता उरलाच नाही. मुलं शाळकरी असतानाच नोकरी केल्यासारखी बिझी झाली. घरातून मोठी माणसं नाहीशी झाली किंवा बाहेर काढली आणि ह्या गोष्टी संपल्या. सत्तूचं पीठ नाही, पापडाचा डांगर नाही, नुसत्या उकळलेल्या जि-याच्या पाण्यात पाव बुडवून खाऊन बघा, काय गोड लागतो ते, माझी आज्जी तेलात चार लसणी टाकून मोहरी घालायची फक्तं, अफाट चव लागायची, गुळावर लिंबू पिळून द्यायची पोळी भाकरी बरोबर खायला. टाकाऊतून टिकाऊ करावं तसं ह्या घरातल्या आज्ज्या मायेचं तूप सोडून ताटात, जातायेता हातावर सोनं ठेवायच्या. हरवलेल्या पदार्थांची यादी खूप मोठी होईल लिहित बसलं तर.

काल एकीशी बोलता बोलता मी म्हटलं 'उपमा साधी असली तरी चालेल पण ती गरिबाघरच्या सणासुदीला केलेल्या श्रीखंडातल्या चारोळीसारखी हवी, अचानक दाताखाली येणारी, चव वाढवणारी'. ती म्हणाली, 'अरेच्चा मी विसरूनच गेले होते चारोळी!  फार दिवसात नाही खाल्ली. लहानपणी परवडत नसे म्हणून आणत नसू. पण ती लक्षातहि नव्हती. अश्या कितीतरी गोष्टी सुटत जातात'. मला काय, काहीतरी खरडायला कारणंच हवं. खरंय, आपण एखादी गोष्टं विसरून गेलोय हे ही आपण विसरून जातो, इतकं वेगात जगतोय आपण. चारोळी म्हणजे खरंतर काही महागडा प्रकार नाहीये फार आत्ता तरी पण होता एकेकाळी. चिमटीत धरण्याएवढी चारोळी. आई लहान कागदाच्या पुडीत ठेवायची जपून. कधी खवट पण व्हायच्या विसरल्यानी. पण चक्का आणला की चारोळी कुठे ठेवली आहे हे तिला बरोबर लक्षात असायचं.

तेंव्हा घरी श्रीखंड यायचं नाही, चितळेकडून रांगेत कष्ट केलेला चक्का यायचा किंवा घरी लावला जायचा. पंचात लावलेल्या चक्क्यातून ठिबकणा-या पाण्यात बोट बुडवून कुणी बघत नाही ते बघून बोट तोंडात घालायचं, नाहीतर ते शब्दात सांगता येणार नाही असा मऊ बांधलेला ऐवज दाबून बघायचा. त्याचा ओशटपणा आणि ती चव शब्दात कशी सांगणार. त्या कापडाला लागून जे वाया जातंय थोडं फार त्याचंही दु:खं व्हायचं. पुरणाच्या यंत्रातून तो साखर घातलेला चक्का काढायचा. नंतर भांडं स्वच्छ असल्यासारखं वाटेपर्यंत ते चाटायचं काम मी करणार या बोलीवर ते काम करायचो. खालच्या भांड्यात पडलेला तो फुगीर चक्का साखर घालून श्रीखंड झालेला असायचा. कालची कु.आज सौ.झाली की वेगळी दिसते तसं. मग वाटीत भिजवलेल्या चारोळ्या पेरल्या जायच्या. तो पर्यंत वाटी कुठे असायची ते आईलाच माहित.

आता आम्रखंड येतं घरी अजिबात गुठळी, चारोळी नसलेलं. सपाट रस्त्यावरून केलेला निरस प्रवास तो. रस्त्यात काय आयुष्यात काय, चढ, उतार, वळणं पाहिजेत तर मजा असते. तेंव्हा क्वचित मिळायचं म्हणून अप्रूप होतं, ओढ होती, चव होती. अतिपरिचयातअवज्ञा, माणसाची काय, वस्तूची काय, पदार्थांची काय. अती केलं आणि मजा घालवून बसलोय आपण सगळी. आता काय घरी जाताजाता अर्धा किलो चारोळी विकत घ्यायचीसुद्धा ऐपत आहे पण तो पंचा आणि आज्जी कुठून आणू?

जयंत विद्वांस 





No comments:

Post a Comment