Wednesday 2 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (४)…. ललिता पवार....

पुढच्या वर्षी म्हणजे २०१६च्या सोळा एप्रिलला अंबा लक्ष्मणराव सगुण उर्फ ललिता पवार ही खाष्ट म्हातारी शंभर वर्षाची झाली असती (इंदिराबाई चिटणीसांचे सिनेमे असतील तर द्या रे कुणीतरी, महा खाष्ट फणस होता तो एक). हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीचा मुकपटापासूनचा काळ त्यांनी बघितला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा 'राजा हरिश्चंद्र'मधून रुपेरी पडदा बघितला. नंतर मूकपटापासून पुढे सत्तर वर्ष ही बाई काळाच्या पडद्याआड जाण्याआधी सातशे(+) सिनेमातून पडद्यावर होती. जेंव्हा केंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा एखादा जुना जाणकार माणूस 'ललिता पवार' चा उल्लेख आहे की नाही ते आवर्जून बघेल. टेक्निक बदलेल, अभिनयाचे मापदंड बदलतील पण नैसर्गिक, उत्स्फूर्त अभिनयाला असलं काही लागू नसतं. जी काय भूमिका असेल ती म्हणजे आपणच व्यक्ती असं समजायचं आणि करायची. अशोककुमार, बलराज सहानी, ओमप्रकाश, ए.के.हंगल असे अनेक सहज अभिनय करणारे लोक इथे होऊन गेले, ललिता पवार त्यापैकीच एक. 

अशोककुमार आणि ललिता पवार यांच्यात एक साम्यं आहे, हिरो/हिरोइन पासून चरित्रं भूमिका असा त्यांचा प्रवास लक्षणीय आहे. पडद्यावरचा कलाकार वय लपवायच्या मागे असतो. देवानंदसारखा माणूस सर्जरी करून शेवटपर्यंत तरुण दिसायचा प्रयत्नं करतो तिथेच पिकलेलं म्हातारपण घेऊन अशोककुमार, ललिता पवार, सुलोचना सहज वावरतात. ख-या कलाकाराला छाप वगैरे बसण्याची भीती नसते. सोडून जाणा-या तारुण्याची भीती वाटते पण 'अभिनय' सोडून जाणार नाही हे का लक्षात येत नाही, कुणास ठाऊक. वयाच्या छत्तीसाव्व्या वर्षी 'दाग' मधे आपल्यापेक्षा फक्तं सहा वर्षांनी लहान असलेल्या दिलीपकुमारची ती आई झाली. अभिनयाची पुंजी भक्कम असेल तर माणूस इमेजची पर्वा करत नाही, हेच खरं. 




लेगी भागवत चंद्रशेखरचा बॉल कुठल्या दिशेला वळेल हे म्हणे फलंदाजाला ओळखता यायचं नाही, मुळात तुम्ही चंद्राला विचारलं असतात बॉल टाकायच्या आधी तर त्यालाही सांगता आलं नसतं. पोलिओमुळे त्याचं मनगट ऐन वेळी काय करामत करेल हे त्याच्या हातात नव्हतं. व्यंगाचा फायदा असा घेता यायला हवा. बेचाळीस साली आलेल्या 'जंग-ए-आझादी' चित्रपटाच्या शुटींगच्या दरम्यान मा.भगवान (भगवान दादा उर्फ भगवान पालव) ललिता पवारांच्या थोबाडीत मारतात असा सीन होता. ललिताबाईंच्या वास्तवतेच्या हट्टापोटी त्यांनी खरोखर तारे चमकवले. त्यात त्यांच्या चेह-याच्या डाव्या बाजूला लकवा मारला आणि डोळ्याची नस तुटली. तीनेक वर्ष ट्रीटमेंट घेऊन पण फार सुधारणा झाली नाही. तो डोळा पापणी बंद झाल्यासारखी दिसत असल्यामुळे बारीक, अर्धाच उघडा दिसायचा. खाष्टपणा, खुनशीपणा दाखवायला त्या डोळ्याचा अचूक वापर त्यांनी केलाच पण माया दाखवताना ते व्यंग कधी आड आलं नाही. 


अचानक आलेल्या या व्यंगामुळे त्यांना मुख्यं भूमिका मिळणं शक्यं नव्हतं. तरुण वयातच त्या पडद्यावर बुजुर्ग झाल्या. ते बरंच झालं म्हणा, तारूण्यं ही चटकन उताराला लागणारी गोष्टं असते तशीही, तारुण्याच्या वेगात प्रवासातला आनंद उपभोगता येत नाही पण म्हातारपण कसं पॅसेंजर गाडीसारखं असतं, संथ, रेंगाळणारं, कुठलीही घाई नसलेलं. ललिताबाईंचं पडद्यावरचं म्हातारपण असंच दीर्घ होतं. कुढत न बसता त्यांनी ते मागे टाकून रुपेरी पडद्यावर केसांचा रुपेरी रंग आपखुशीनी स्विकारला. आवडतंय तेच करणं आणि जे करतोय ते आवडणं यात फरक आहे. त्यांनी जे केलं ते आवडीनी केलं म्हणून ते निरस वाटलं नाही. राग, द्वेष, कपट, माया, प्रेम, जो रस अभिनयातून दाखवला तो उच्चं कोटीचाच दाखवला, हे आवडीनी केलं तरच येतं. 


खूप लहान असताना मी 'सासुरवाशीण' बघीतला होता. तेंव्हा काहीही कळत नसताना सुनेला छळणा-या या बाईचा मला चेहरा पाहूनच राग आला होता. काय विषारी नजरेनी बघतात त्यात त्या आणि ते कुचकं बोलणं. त्याचा पुनार्नुभव 'रामायण' मधली कळलावी कुब्जा मंथरा बघताना आला. जी.एं.च्या कथा वाचताना जसा एक अशुभाचा फील येतो तसा त्यांच्या बोलण्यात आणि त्या बारीक झालेल्या डोळ्यात दिसायचा. शकुनी'मामा' असल्यामुळे गुफी पेंटल नाहीतर ललिता पवारांनी तो काळे कपडे, भांजे वगैरे फालतू गोष्टी न करता अजरामर केला असता. असला शकुनी मामा असता तर कुंतीच 'नको रे बाबा, या माणसाची नजर लागायला पोराबाळांना' असं  म्हणत आपली पोरं घेऊन दुसरीकडे गेली असती. 


नंतर मी 'श्री ४२०' बघितला कधीतरी. त्यातली ती खेडवळ केळेवाली मात्रं अजून लक्षात आहे. आरकेच्या आतबट्ट्याचा भाव विचारण्याच्या गमतीला ती ज्या कौतुकाने बघते ना ते बघाच. बनेल आरकेचा भाबडेपणा ठसण्यासाठी तेवढाच निष्पाप, मायाळू चेहरा गरजेचा होता. दूरदर्शनवर तेंव्हा जुने चित्रपट बघायला मिळायचे, 'अनाडी' मी तिथेच पाहिला. त्यातली ती घरमालकीण मिसेस डिसा. वसकन ओरडणारी, भाडं देण्यासाठी आरकेच्या मागे लागणारी आणि आत दडलेली माया दिसू नये याचा आटोकाट प्रयत्नं करणारी, टचकन डोळ्यात पाणी आणणारी. फणस, आतआत माया असलेला. दुर्गा खोटे प्रचंड मायाळू आणि गोड दिसायच्या पण त्या खाष्ट, कपटी नसत्या दिसू शकल्या. ललिता पवार दोन्हीकडे तेवढ्याच दणकट होत्या. 'प्रोफेसर'मधली आशिक झालेली त्यांची प्रौढा पण ग्रेसफुल होती. 'नसीब' मधली मिसेस गोम्स, 'बॉम्बे टू गोवा' मधली काशीबाई पण झकास होत्या. 

'आनंद' मधे प्रत्येकजण स्पर्धा लावल्यासारखा रडवतो. यांची मेट्रन मात्रं अशी एकंच व्यक्ती त्यात आहे जी प्रोफेशनमुळे रोग्याशी कडक वागते पण आनंदची कहाणी समजल्यावर त्यांचा बदललेला चेहरा अविस्मरणीयं. त्या रमेश देवच्या घरी जातात तेंव्हा त्यांनी डॉक्टर म्हणून रमेश देवला दिलेला रिस्पेक्ट आणि त्याच्याच बायकोला सीमाला जवळ घेण्यातली माया हा प्रचंड बुद्धीचा भाग आहे. (असाच सुंदर बौद्धिक आनंद 'आन - मेन अॅट वर्क' मधे शत्रुघ्नंनी दिलाय. इरफान खानला चौकशीसाठी आणलेलं असतं. शत्रू, सुनील शेट्टी, ओम पुरी आणि अक्षय कुमार जे सिनिअर आहेत. ते येतात तेंव्हा शत्रू खुर्चीतून उठल्यासारखं करतो. ते बाहेर जातात, परत येतात तेंव्हाही शत्रू परत उठल्यासारखं करतो. डिटेलिंग बॉस. गोष्टं छोटी असते पण लक्षात रहाते). आनंदसाठी प्रे करताना तन्मयता बघा. नंतरच्या अगले जनम तुम्हारा बेटा वगैरे डायलॉगला 'आनंद' भाव खाणार हे गृहीत आहे पण त्यातलं वैफ़ल्यं, असहायता मेट्रनच्या रडवेल्या हसण्यात बघावी. सिनेमात ती आणि 'भास्कर' बच्चन हे फक्तं असहायतेची घुसमट दाखवतात.




गणपतराव पवारांशी झालेलं त्यांचं पहिलं लग्नं पवार त्यांच्याच लहान बहिणीच्या प्रेमात पडल्यामुळे अयशस्वी झालं. नंतर मग त्यांनी प्रोड्युसर राजप्रकाश गुप्ताशी लग्नं केलं. २४ फेब्रुवारी ९८ ला त्या गेल्या. गुप्ताच्या घशाच्या सर्जरी करता सगळे जण मुंबईला होते. या औंधच्या घरात गेल्या ते दोन दिवस कुणाला कळलंच नाही. डाव्या डोळ्याची अर्धी आणि उजव्या डोळ्याची पूर्ण पापणी कायमची मिटली.

जयंत विद्वांस
 

No comments:

Post a Comment