Monday 14 September 2015

आत्मंज्ञान....

शहाण्णवपर्यंत दोन तीन प्रेमभंग झाले होते (नंतर मी हिशोब ठेवणं सोडून दिलं). दाढी मी वाढवायचोच आधीपासून, त्यात वजन पन्नास किलो, चेहरा कायम प्रेमभंगी दिसायचाच त्यामुळे फार प्रयत्नं करावे लागले नाहीत दु:खाचा मेकप करायला. पण काहीतरी मिसिंग आहे असं वाटायचंच. एके दिवशी जाणीव झाली, अरे, आपण कविता नाही लिहिलेली अजून एकही. युरेका, युरेका ओरडत मी कपड्यांसकट घरातल्या घरात पळालो.

मग एक छान रजिस्टर विकत आणलं. पहिल्या पानावर अर्पणपत्रिका वगैरे लिहीली. मग दु:खं राष्ट्रीय पातळीवर असावं म्हणून हिंदी कविता कम गाणी लिहायला सुरवात केली. काय सांगावं उद्या कुठे तारे चमकले (नशिबाचे म्हणतोय) आणि फिल्मला सिच्युएशन प्रमाणे गाणी लागली तर आपल्याकडे तयार नाहीत असं नको. वेगवेगळ्या सिच्युएशनवर झारा घेउन बुंदी पाडावी तशा कविता लिहून काढल्या. म्हटलं मराठीतून मागणी आली तर? काय एकेक व्याप न डोक्याला. मग ती ही पन्नासेक मातृभाषेतली बुंदी पाडून ठेवली.

कालांतरानी दु:खं डायल्युट झालं. मग लग्नं झालं. मग मागची दु:खं काहीच नाहीत हे लक्षात आलं. वही अडगळीत गेली. एफबी म्हणजे काय हे मला खूप उशिरा समजलं. अकाउंट काढल्यावर पहिले साताठ महिने मला पोस्ट, स्टेटस, ग्रूप्स, चॅटिंग काहीही माहित नव्हतं. स्लो लर्नर असल्यामुळे इतर अनेक गोष्टींप्रमाणे हे शिकायला खूप वेळ गेला. एकानी मराठी टायपिंग कसं करायचं ते सांगितलं. मग मी हळूहळू कविता पोस्टायला लागलो. अर्थात मुक्तंछंद जास्ती. लई भारी वाटायला लागलं कुणी कॉमेंट केली की.

वृत्त, मात्रा हा हिशोब कधी कळला नाही आणि मी ही गंभीरपणाने त्याचा कधी अभ्यास केला नाही. पण नंदुशेठ आणि त्यांच्या सहका-यांच्या गझला, शार्दुल, स्वामीजींच्या कविता वाचत होतो. आणि महाराजा काय सांगू, एके दिवशी एफबीच्या बोधीवृक्षाखाली बसलेलो असताना मला आत्मंज्ञान प्राप्तं झालं. यांच्या हापूसच्या स्टॉलशेजारी मी रायवळ आंब्याची टोपली घेउन उकिडवा बसलोय असा फील आला आणि एका सुदिनी मी कविता लिहिणं बंद केलं.

आपल्याला काय येतं यापेक्षा काय येत नाही हे कळलं की माणूस सुखी होतो म्हणजे जे थोडंफार जमतंय त्यात सुधारणा करण्यात बुद्धी खर्च होते आणि यश मिळण्याची थोडीफार खात्री असते. मी गद्य बरं लिहितो (पद्यापेक्षा - आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत) हे माझ्या लक्षात आलं. कुणी आणून देण्यापेक्षा ते बरं, नाही का?

म्हणून मी काय म्हणतो, आपल्याला चहा करता येत असेल ना तर फक्तं त्याचीच टपरी टाकावी उगाच चारपाच आयटमचं मेनूकार्ड छापण्यात अर्थ नाही, आहे तो ही धंदा बुडणार हे निश्चित.

--जयंत विद्वांस 


No comments:

Post a Comment