Wednesday 9 September 2015

होतं असंही कधी कधी.....


होतं असंही कधी कधी..... 

मी सी.ए., आय.सी.डब्ल्यू.ए. किंवा गेलाबाजार निदान एम.कॉम.तरी झालो असतो असं मी सोडून माझ्या सगळ्या हितचिंतकांना वाटत आलेलं आहे. काही काही गोष्टी राहून जातात किंवा झाकली मूठ… असंही असेल. मी अकरावी सायन्स केलं. सहामहीला फिजिक्सला मला ३/१०० मिळाले. पाच गाळलेल्या जागा सोडवल्या होत्या फक्तं, तीन बरोबर आल्या म्हणजे खरंतर साठ टक्के होतात पण एका माणसाचा आवाज कोण ऐकणार? जोशीबाई म्हणाल्या, विद्वांस, आडनावाला काळिमा फासू नका, निदान १०५ तरी करा बेरीज वर्षाची, पुढच्या चाचणीत २८/३० पैकी. एकंच लहान धडा होता त्या चाचणीला, गाईडची चारी पानं खिशात, एवढे पडतील नाय तर काय. मग मी अकरावी कॉपी न करता पासही झालो. मग तीन वर्ष वाया गेली. मग ८९ ला बारावी कॉमर्स आणि ९२ ला बी. कॉम. असा सगळा बट्ट्याबोळ एकूण. 

एक जानेवारी ९२ ला बदलापूरला परत गेलो अभ्यासासाठी. चेतन आणि श्रीपाद आपटे हे दोन चुलतबंधू माझे दोस्तं. पुस्तकं मी पहिल्यांदा २ जानेवारीला बघितली, मग त्यांनी ती महिनाभर मला समजावली, मग पुढचे दोन महिने मी त्यांना. दोघांच्या घरी माझी बडदास्तं असायची अगदी. आमच्या दृष्टीने आमचा अभ्यास सगळा झाला, परीक्षा झाली, मी पुण्याला परत आलो. चेतन मी दोघंही एम.जी.कॉलेजला, म्हणाला मी रिझल्ट बघून तुला फोन करतो, उगाच येऊ नकोस. दोघांचा माझ्यावर प्रचंड लोभ. त्यानी स्वत:चा रिझल्ट बघायच्या आधी माझा बघितला, माझं नाव सापडेना, त्याला पास क्लास मिळाला, शिप्या एकात दांडी गुल. माझी दोन विषयात. मला त्यानी फोन करून सांगितलं. 

जाम नैराश्यं आलेलं. ऑक्टोबरचा फॉर्म भरायचा पण मूड नव्हता, बघू म्हटलं नंतर. परत तोच अभ्यास करायचा, दोन मार्कलिस्टचा ठपका आणि पास क्लास असं सगळं सारखं दिसायला लागलं. जॉब कसा मिळणार हा ही प्रश्नं होताच. माझा माझ्यावरचाच विश्वास उडाला पार. ६५ % मिळण्याची मला खात्री होती. आत्तापर्यंत कधी अंदाज चुकलेला नव्हता माझा. बदलापूरला जाऊन मार्क लिस्ट घेऊन आलो. एका विषयात २८, दुस-यात ३२ असे काहीतरी मार्क होते. सगळे विषय घेऊन परत असलं धाडस करावं असंही वाटत नव्हतं. ऑक्टोबरची डेट शिप्या कळवतो म्हणाला. एकदा तुम्ही नापास झालात की किती अभ्यास केला होतात याला किंमत शून्यं. घरी कुणी काही म्हटलं नव्हतं एवढाच दिलासा. 

तेंव्हा घरी फोनही नव्हता. चेतननी वडिलांचा नंबर मिळवला कामावरचा आणि मला अर्जंट फोन करायला सांगितला. मी ऑफिसमधून त्याला केला. 'दुपारी निघ, उद्या रिचेकिंगची लास्ट डेट आहे, सकाळी ८.०२ च्या कर्जतला भेट'. अत्यंत निराश मनानी मी दुपारच्या डेक्कननी गेलो. संध्याकाळी चेतनला भेटलो. सकाळी दोघंही आपटे माझं तिकीट काढून फलाटावर तयार होते. ८.०२ ची कर्जत म्हणजे तुफान गर्दी. कुर्ल्याला उतरलो. त्यादिवशी काहीतरी झालेलं म्हणून कुर्ला बंद होतं. कशीबशी एक ट्याक्सी हातापाया पडून तयार झाली आणि कालीनाला गेलो. तिथे गेल्यावर समजलं की ज्या विषयाचं रिचेकिंग करायचंय त्याच्या प्रश्नं पत्रिकेची झेरॉक्स जोडायला लागते. आम्ही गार. नशिबानी शिप्याचा माझा एक विषय कॉमन होता दांडी उडालेला. ते दोघं आणि मी माझ्या दुस-या विषयाची प्रश्नंपत्रिका कुणाकडे आहे ते जनगणना केल्यासारखं प्रत्येकाला अडवून विचारत होतो. शेवटी एकाकडे मिळाली पण तो द्यायला तयार नव्हता. चेतननी त्याला पटवला.

सगळी दुकानं बंद. एकानी सांगितलं समोरच्या बिल्डींगमधे तिस-या मजल्यावर मिळतायेत. संपूर्ण तीन जिने रांग होती. त्यात मधे लाईट गेली पण आली दहा मिनिटात. प्रत्येकाला वाटायचं माझी झेरॉक्स झाल्यावर गेली तरी चालेल लाईट. एकदाची झेरॉक्स घेऊन आलो परत. त्या मुलाचा जीवही भांड्यात पडला. फॉर्म घेऊन आत गेलो तर माझे दोन विषय नेमके दोन वेगळ्या विंडोत. मग एका ठिकाणी मी आणि शिप्या, एका रांगेत चेतन उभा राहिला. टायमिंग संपायला दहा मिनिट बाकी. माझा अर्ज दिला आणि पलीकडे गेलो कारण त्या फॉर्मवर विद्यार्थ्याची सही लागायची. मागची सगळी पोरं बोंबा मारायला लागली. चेतननी सगळ्यांना झोपवलं. 'तो पुण्याहून आलाय, मी त्याच्या जागी उभा आहे न रांगेत, तो मधे घुसलेला नाहीये'. फॉर्म भरून आलो एकदाचे परत. मला कसलीही आशा नव्हती. शिप्या म्हणाला, आधी ये दोन महिने परत करू अभ्यास. हो म्हणून आलो परत पुण्याला. 

रिचेकिंगचा रिझल्ट बघायची सुद्धा मला इच्छा नव्हती. चेतननीच पाहिला. शिप्या फेलंच होता आणि मी दोन्ही विषयात पास. म्हटलं ना, होतं असंही कधी कधी. आत्यंतिक आनंदात त्यानी मला फोन केला. एकात ४२ आणि एकात काहीतरी ४५ असे मार्क होते. काय भुताटकी झाली माहित नाही. दोन महिन्यांनी जाऊन मी रिझल्ट घेऊन आलो. एकूण सेकंड क्लास होता. सुधारित मार्कलिस्ट मी पाचसहा वर्षापूर्वी आणली, न जाणो तुम्ही नापासच आहात असं सांगितलं तर, इतका मला धसका बसला होता. गंमतीचा भाग म्हणजे आता पर्यंतच्या तीन नोक-यात मला एकदाही मार्कलिस्ट दाखवावी लागलेली नाही. मी रिचेकिंगचा फॉर्म भरणार नव्हतोच. चेतन आणि शिप्या कारणीभूत. तसा मी फार काही बालपणीचा मित्रं नव्हतो त्यांचा पण दोघांचा प्रचंड लोभ माझ्यावर. त्यापोटी त्यांनी केलं. चेतन मला डेट सांगून मोकळा झाला असता तरी चाललं असतं, त्याला यायची काही गरजही नव्हती. पण मी नापास होतोच कसा असा त्याचा प्रश्नं, इतकं प्रेम. 

तेवीस वर्ष झाली हा हा म्हणता. कोण कुणासाठी प्रेमापोटी काय करेल ते सांगता येत नाही. चेतन आणि शिप्या, दोघांचा मी तहहयात ऋणी आहे. माझ्यावर नापासाचा बट्टा तुमच्यामुळे लागला नाही यापेक्षाही मी खरंच अभ्यास केला होता या माझ्या म्हणण्याला तुम्ही हातभार लावलात. एकदा बदलापूरला जावून भेटायला हवं दोघांना. 'माद***, आला बघ, कुठे होतास रे भें** इतके दिवस' असं म्हणणा-यांपैकी चेतन एक आहे. 

जयंत विद्वांस




No comments:

Post a Comment