Thursday 10 September 2015

लल्याची पत्रं (२५)…. 'कितना हसीं है मौसम…'

लल्याची पत्रं (२५)…. 'कितना हसीं है मौसम…'

लल्यास,

तारुण्यात वय वाढत असतं तेंव्हा आपण आवडीनी पुढे पहात असतो, घाई असते सगळ्याची. आयुष्याची अंकलिपी पन्नाशीला आली की आपण थांबतो. पुढचा प्रवास किती आहे माहित नसतं. मग जुन्या आठवणीत आपण रमतो. आवडत्या माणसाच्या सहवासात घालवलेले चार क्षण आठवतात. तेंव्हा लक्षात न आलेलं कायकाय तरळून जातं. गोष्टी छोट्या असतात नेहमी, त्यांच्या आठवणी झाल्या की त्या मोठ्या होतात. काल 'कितना हसीं है मौसम' लागलेलं एफेमला. जुनी गाणी आपण सगळीच पाहिलेली नसतात किंवा काहीवेळेस ते चित्रपटही. पण ऐकूनच ती आपल्या नात्यातली झालेली असतात.

साठीचं झालं हे गाणं वयानी. एकोणीसशेपंचावन्नच्या 'आझाद' मधलं. तो काही आपण पाहिलेला नाही. पण त्यातली गाणी मात्रं भन्नाट होती. निर्मात्याला नौशादकडून तीस दिवसात दहा गाणी हवी होती. नौशाद म्हणाला, 'हे काय वाण्याचं दुकान आहे का? एक गाणंही मिळणार नाही महिन्यात. मग रामचंद्र चितळकर आले. सी.रामचंद्रनी पंधराएक दिवसात तुकडा पाडला गाण्यांचा. सगळी लिहिली होती राजेंद्रकृष्णंनी. यातली हे आणि पुढची ही तीन 'राधा ना बोले, ना बोले रे', 'अपलम चपलम', 'जा री जा री ओ कारी बदरिया' कधीही ऐकावीत. तोड नाही. 'जा री जा री' वर परत लिहीन तुला कधी. त्यात माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे दोन्ही 'ग' आहेत, थोडी चाल बदलली की कानाला काय गोड लागते बघ. 


तलत हे गाणं म्हणणार होता. काहीतरी अडचणीमुळे तो पोचू शकला नाही. रेकोर्डिंग तर उरकायचं होतं. मग सी.रामचंद्रनीच ते म्हटलं. तलतचा भास व्हावा असंच म्हटलंय ते. तेवीशीची मीनाकुमारी आणि तेहेतीशीचा युसुफखान सरवरखान पठाण बिनरंगाच्या पडद्यावर काय गोड दिसतात बघ. राजेंद्रकृष्णंनी लिहिलंय पण एकदम मस्तं, साधं, सरळ, सोप्पं. गुलझार 'तेरे बिना जिंदगीसे' मधे म्हणाला होता 'तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं'. कोण बरोबर आहे ना सफर मधे (सफर आणि Suffer दोन्ही) त्यावर ठरतं बघ प्रवास कसा होतो ते. पायाला बोचणारे दगड पण मग जाणवेनासे होतात. खडकावर पण हिरवळ दिसते. सोबत कोण आहे यावर ते ठरतं. 

गाण्यात जंगल शब्दं लिहू आपण? यात आहे आणि कानाला तो खटकत नाही. पहिल्या कडव्यात 'साथी हाथ बढाना' चाच अर्थ आहे. प्रेमीक जिथे उभे तोच स्वर्ग. दुस-या कडव्यातला सूचकपणा जाम गोड आहे बघ. प्रेमाचा उल्लेख केला म्हणजेच ते असतं असं नाही. वो महसूस करनेकी बात है! दोघंही आडून आडून बोलत असतात, काय म्हणतोय, अभिप्रेत काय दोघांनाही माहित असतं. ते डोळस चाचपडणं मोठं गंमतीशीर होतं. प्रेमाचा रंग मोठा मजेशीर असतो. सगळ्या चराचरावर तो झटक्यात पसरतो. युगल त्या रंगात न्हाऊन निघालेलं असतंच पण त्यांना सभोवताल पण तसाच दिसतो. फील गुड फ्याक्टर. 
आपण असे मुक्तं फिरलोय कधी? अनेक अडचणी, व्याप, चिंता, काळज्या, जबाबदा-या सतत सोबतीला असतात. अशी गाणी ऐकली की काय काय हरवलं, काय काय करायचं राहून गेलं ते कळतं. गेलेला काळ काही परत आणू शकत नाही आपण निदान तो या गाण्यातून अनुभवू शकतो. सतत कुढत बसण्यात काही अर्थ नसतो बघ. तू तुला मीना समज, मी दिलीप समजतो. आवाज फाटतोच माझा त्यामुळे तलतचा फील येईलच, तू म्हटलंच पाहिजे असं काही नाही, तू माझ्याकडे बघत राहिलीस की तुझ्या ओळी मला ऐकू येतीलच. चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय. :)  

जयंत विद्वांस 
कितना हसीन है मौसम, कितना हसीन सफ़र है
साथी है खुबसूरत, ये मौसम को भी खबर है

मिलती नहीं है मंज़िल, राही जो हो अकेला
दो हो तो फिर जहाँ भी, चाहे लगा लो मेला
दिल मिल गये तो फिर क्या, जंगल भी एक घर है

ना जाने ये हवायें, क्या कहना चाहती हैं 
पंछी तेरी सदायें, क्या कहना चाहती हैं 
कुछ तो है आज जिस का, हर चीज़ पर असर है

कुदरत ये कह रही है, आ दिल से दिल मिला ले
उल्फ़त से आग ले कर, दिल का दिया जला ले
सच्ची अगर लगन है, फिर किस का तुझको डर है
(आझाद, १९५५, लता, सी.रामचंद्र, राजेंद्रकृष्णं, सी.रामचंद्र) 
 
 
 

No comments:

Post a Comment