Thursday 10 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (६)…. त्शेरिंग डेंझोंग्पा....

'त्शेरिंग फिंन्त्सो डेंझोंग्पा', (त्सुनामीसारखा त् सायलेंट आहे का ते माहित नाही) उच्चारताना जिभेला क्रॅम्प येउन आयोडेक्स लावायची पाळी येईल अश्या अत्यंत अवघड नावा आडनावाचा हा सदुसष्ठ वर्षाचा तरुण, फिट माणूस डॅनी नावानी मला माहित आहे. मी शाळेत असताना आम्हांला दोन 'इनामदार' सर होते. एक म्हणजे स्केलेटन, ते इंग्लिश शिकवायचे आणि चुकलं की चिमटे काढायचे पोटाला (एकदम पैसे येतील म्हणून त्यांनी घरात वर्षाची रद्दी साठवली होती, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय) आणि दुसरे पी.टी.आणि इतिहास शिकवायचे, एकदम दणकट माणूस, त्यांना त्यांच्या हेअरस्टाईलमुळे 'डॅनी' म्हणायचे (अर्थात हे सगळं पार्श्वगायन, तोंडावर कोण म्हणणार, नाहीतर 'पार्श्वभाग' गायन झालं असतं). तर मुद्दा असा की तेंव्हापासून हा डॅनी कोण आहे ते बघायची मला उत्सुकता होती.  

तेंव्हा वर्षाकाठी दोनचार सिनेमे बघायला मिळायचे, एक माझ्या, एक भावाच्या वाढदिवसाला, एक होळीला ढूमकं न आणल्याच्या बदल्यात आणि एक श्यामची आई, हाथी मेरे साथी, सती अनसूया वर्गातले. मामाकडे स्क्रीन, रसरंग आणि न्हाव्याकडे फिल्मफेअर, स्टारडस्ट यामधून काय तारे तारका दिसायचे तेवढेच. पडद्यावर बघायला खूप काळ जावा लागला. डॅनीला मी पहिल्यांदा पाहिला ते बहुतेक 'धर्मात्मा'मधे, जांकुरा, मेंढ्यांची शर्यत खेळणारा. त्याची ती हेअर स्टाईल भारी होती (तो, विनोद मेहरा आणि फारुख शेख - एकदम खतरा हेअर स्टाईल). फिरोजखानला टशन देणारा. तो आला तेंव्हा ब्रूसली सारखा वाटायचा जरा. 'धर्मात्मा'मुळे त्याचा 'शोले' गेला ते बरंच झालं. अमजदचा गब्बर सरसच होता. डॅनीभाय हमको माफ करो. पण त्यालाही चुटपूट लागलीच असणार, शोले तसाही हिट झालाच असता, डॅनी कुठल्याकुठे गेला असता.

तो 'मेरे अपने' मधला पुसटसा आठवतोय मला. 'काला सोना'मधे त्याला सफरचंद फरीदा जलाल हिरोईन होती आणि 'सून सून कसमसे' गाणं पण होतं. त्याचा 'धुंद' खतरा होता. एक तर सस्पेन्स, त्यात हा विक्षिप्त आणि पांगळा, बायकोवर संशय घेणारा. त्याचं ते एकदम व्हायोलंट होणं आणि संजयखान आल्यावर लगेच सोबर होणं, भारी होतं. रोज उठून एकसारख्या डाकूच्या भूमिका करून कंटाळल्यावर त्यानी ब्रेक घेतला आणि परत येउन राजेश खन्ना आणि त्याचं प्रेमपात्रं किमला घेऊन त्यानी 'फिर वोही रात' दिग्दर्शित केला. 'हमसे बढकर कौन'मधे तो चारात एक होता. 'बुलंदी'मधे तो 'लोबो' बाप मुलाच्या डबलरोल मधे होता. एक तरुण दिसतो, वागतो आणि दुसरा बाप वाटतो आणि तसा वागतोही पडद्यावर. मिथुनपेक्षा तो दोन वर्षांनी मोठा आहे पण तो 'बॉक्सर'मधे त्याचा बाप झाला.

प्राण आणि डॅनी मधे एक साम्यं होतं, समोर कुणी का असेना त्यांना काही फरक पडायचा नाही, ते दबून जायचे नाहीत. अमिताभ बरोबर 'हम'मधला बख्तावर आणि 'अग्निपथ' मधला कांचा चीना आणि 'खुदा गवाह' मधे खुदाबक्ष पहा. एकदम टफ फाईट. तिन्ही मुकुल आनंदचे आणि त्याच्याच 'डायल एम फॉर मर्डर'च्या हिंदी आवृत्ती 'ऐतबार' मधला तो बावळा दिसणारा चलाख इन्स्पेक्टर बरुआ. शक्ती कपूर चांगल्या भूमिकेत पण व्हिलन सारखाच दिसतो, डॅनी मात्रं जिथे जसा चेहरा गरजेचा आहे तसाच. 'अंदर बाहर' मधला शेरा बघा, सतत घामेजलेला, कपाळावर मधे तिसरा डोळा असल्यासारखी आठी आणि थंड रक्ताचा. 'अंधा कानून' मधला अकबर अली, नानाच्या 'क्रांतिवीर' मधला चतुरसिंघ, सनीच्या 'इंडियन' मधला सिंघानिया तकलादू वाटत नाहीत. '१६ डिसेंबर' मधला वीर विजयसिंघ कसा भारदस्तं होता. नुकत्याच आलेल्या 'बेबी'मधला फिरोज अली खान पण सुंदर होता त्याचा. 

राजकुमार संतोषीनी त्याला 'घातक' मधला 'कात्या' आणि 'चायना गेट' मधला 'मेजर गुरुंग' या दोन सुंदर भूमिका दिल्या. त्याचा कात्या एखादा संत जसा पूर्ण सज्जन असतो तसा पूर्ण शंभर टक्के दुर्जन होता. त्याची दहशत मानसिक आहे हे छोट्या छोट्या गोष्टीतून फार छान दाखवलंय दोघांनी मिळून. 'चायना गेट' मधला आजार लपवणारा, सगळ्यांना समजून घेणारा, मितभाषी गुरुंग चांगला उभा केला होता त्यानी. मुळात डॅनी हा पोटभरू, सवंग अभिनेता नाहीये. त्यानी लता, आशा आणि रफी बरोबर गाणं म्हटलंय, त्याची नेपाळी गाणी हिट आहेत. तो लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, स्क्लप्टर आहे. त्यानी सिक्कीमच्या राजकुमारी बरोबर लग्नं केलंय.


त्याला खरंतर आर्मीत जायचं होतं. त्याला पश्चिम बंगालमधे बेस्ट कॅडेट अवार्ड मिळालंय आणि त्यानी २६ जानेवारीच्या संचालनात भाग ही घेतलाय. पुण्यात ए.एफ.एम.सी.मधे क्वालिफाय झालेला असतानाही त्यानी एफ.टी.आय.आय.ला दाखला केला. सदुसष्ठाव्या वर्षीही तो तब्येत राखून आहे याचा अर्थ सैन्यात नसेल गेला तो पण ती शिस्तं राखून आहे. म्हणून तो मोठ्या मनाचाही आहे. बिग बी शी त्याची दोस्ती आहे. एकदा त्यानी कौतुकानी सांगितलं होतं, 'यापुढे तो असेल त्या पार्टीत मी जाणार नाही कारण तो आला की मग आमच्या भोवती कुणी उरत नाही'. 

हिंदी चित्रपटात हिरोला लागणारा चेहरा त्याच्याकडे नाही पण तो गाजला, चालला, टिकला. दुसरा असा एक ओम पुरी. वयानी म्हातारा झालेला डॅनी जास्ती सरस आणि रुबाबदार दिसतो. आता एवढं चेह-याचं कौतुक राहिलं नाही हिरोला, त्याकाळी होतं. 'शमिताभ'च्या धनुषपेक्षा डॅनी कैक पटींनी देखणा आणि अभिनयसंपन्न आहे. जन्माला यायची वेळ चुकली, बाकी काय.

जयंत विद्वांस 



1 comment: