Thursday 3 September 2015

वन्स अपॉन अ टाईम (२१).....

वन्स अपॉन अ टाईम (२१).....

लेगस्पिन गोलंदाजी खेळणं म्हणजे 'अग्नीसाक्षी' मधल्या विक्षिप्त नाना पाटेकरसारख्या माणसाशी लग्नं करण्यासारखं आहे. कधी मूड बदलेल सांगता येत नाही. अतिशय अवघड कला आहे ती. गोलंदाज उदारमतवादी हवा. रन्स गेले तरी चेहरा पाडणारा नको. एकतर फुलटॉस, शॉर्टपिच पडला की धुतलं जाण्याची भीती कायम टांगलेली असते. कुठलीही गोष्टं सरळ म्हणून करायची नाही असा स्वभाव हवा लेगस्पिन किंवा चायनामन टाकायचा असेल तर. मी सुभाष गुप्ते, रिची बेनॉ पाहिलेले नाहीत पण मी आपला चंद्रा, कुंबळे, हिरवाणी, एल.शिवरामकृष्णन, अमित मिश्रा, साईराज बहुतुले, पियुष चावला, करण शर्मा बघितलेत (क्रम लायकीप्रमाणे), पाकचा अब्दुल कादिर, मुश्ताक, झिम्बाब्वेचा पॉल स्ट्रॅन्ग, इंग्लंडचा इयान सॉल्सबरी आणि ऑस्ट्रेलियाचा स्टुअर्ट मॅकगिल आणि शेन वॉर्न बघितलाय. वॉर्न म्हणजे दहशत. 

पहिल्यांदा तो जेंव्हा भारतात आला तेंव्हा जास्ती बोदल्या होता. भारतात आणि ऑस्ट्रेलियात सिद्धूनी आणि रवि शास्त्रीनी त्याला आयुष्यातून उठवायचं ठरवल्यासारखं तुफान ठोकलं होतं. शास्त्रीसुद्धा पुढे येउन ठोकत होता याचा अर्थ वॉर्न भिकार गोलंदाजी करत होता एवढाच आहे. नंतर सुधारित वॉर्नला तोंड द्यायची वेळ रवि शास्त्रीला आली नाही हे त्याचं नशिब. वॉर्नचा चेंडू फुरशासारखा कधी वळेल ते सांगता यायचं नाही. स्लोमोशन मधे त्याच्या चेंडूवरची रिव्होल्युशंस बघा. मार्शलची दहशत वेगावर होती तशी वॉर्नची दहशत टप्पा, फिरक, वेगातील फरक आणि चिडलेला रानडुक्कर जसा हल्ल्याकरता झटकन वळतो तसा वळणारा चेंडू यामुळे होती. आपल्या फिरकी गोलंदाजीला उपयुक्त भुसभुशीत आखाड्यामधे राजेश चौहान, आशिष कपूरचा चेंडू क्वचित वळायचा इतके आपण दरिद्री. वॉर्नला असलं काही लागायचं नाही.

वॉर्न म्हणजे बुद्धिबळ. एखादी लूज डिलिव्हरी, एखादा फुलटॉस, एक थोडा बाहेर जाणारा, मधेच खतरा टॉपस्पिन, गुगली नाहीतर मग फ्लिपर, एवढ्या सगळ्यातून कुणी बचावलाच तर पंचेचाळीस डिग्रीत वळणारा लेगस्पिन आहेच. तुम्ही वेगवान गोलंदाजावर बाउंसरचं बंधन आणता मग वॉर्न दिसला नव्हता का तुम्हांला. मानसिक छळ कसा काय चालवून घेता तुम्ही? माईक गॅटिंगला बोल्ड काढणारा बॉल ऑफ द सेंच्युरी यू ट्यूबला आहेच. भानामती झाल्यासारखा बघतो तो पीचकडे. केवळ अविश्वसनीय. त्यापेक्षा पाकच्या बासित अलीला त्यानी लेगच्या बाहेर टाकलेला चेंडूपण बघा, आहे यू ट्यूबला. तटवण्यासाठी त्यानी पाय बाहेर काढला, एल.बी.ची भीती नव्हती इतका चेंडू बाहेर होता. गर्दीत कुणाचा धक्का लागू नये म्हणून मुलगी जशी परफेक्ट अंग चोरून वाट काढत जाते ना तसा त्याचा चेंडू दोन्ही पायाच्या मधून स्टंपवर गेलाय.

विंचित्रं स्टान्सचा चंदरपॉल खेळत होता. पिचच्या मर्यादा रेषेच्या एखाद दोन इंच आत चेंडू पडला, परत एकदा एल.बी.ची भीती नव्हती, चिवट चंदरपॉलनी पाय बाहेर काढला. गोलंदाजाच्या पाऊलखुणा घातक बघा फार. त्या भुसभुशीत जागेवरचा एखादा खडा काय टोचला असेल म्हणतो मी, एवढं चिडायचं? अगदी अपमान जिव्हारी लागल्यासारखा चेंडू स्टंपच्या खांद्यावर मान ठेवायला गेला. चंदरपॉलला त्याचं सांत्वन करायची संधीच मिळाली नाही. 'सिंघम' मधला तो जयकांत शिकरे म्हणतो ना 'चीटिंग करते हो' तसं म्हणताना मला गॅटिंग, बासित अली आणि चंदरपॉलडोळ्यापुढे येतात. 

९६च्या वर्ल्डकपचा सामना आठवतोय मला. जिंकायला २५९ करायच्या होत्या. तेंडूलकर ९० करुन माहेरी गेलेला. ५/१४७ वरून मांजरेकर आणि मोंगीयानी २०१ गाठलेला. वॉर्नची लास्ट ओव्हर. तेवढी खेळली की बेडा पार. वॉर्न संपल्यामुळे आपल्याला जास्ती संधी होती. मांजरेकर जस्ट त्याला सांगून पण आलेला बहुतेक, '**घाल्या, एवढे दोन बॉल खेळ नीट फक्तं, मग आपण जातोय तरून'. आमचे काका म्हणायचे, 'याला दवाखान्यात जाऊन पेशंट कसा आहे ते बघून ये असं सांगू नये, हमखास हा येताना रडतच येणार मेल्याची बातमी घेऊन'. चौथ्या की पाचव्या बॉलला मोंगीया गचकला. परगावी जायचं असल्यामुळे बारावा तेरावा एकाच दिवशी उरकल्यासारखे बाकीचे लोक पटापट आवरून बसमधे येउन बसले. दोन ओव्हर राखून सोळा धावांनी आपण सामना हरलो. वॉर्न एक्का होता. 

हल्ली रनरेटची काळजी करून फ्लॅट टाकणारे कर्जबाजारी लेगी बघितले की डोळे मिटून घेतो मी. वॉर्नचा लेगस्पिन, कोर्टनीचा लेगकटर, अक्रम वकारचा स्विंग सगळ्यांना कसा जमले म्हणा, डोळे मिटले की दिसतो, बघायचा फक्तं आठवणीत आता.  

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment