Wednesday 2 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (३)…. अवतार किशन हंगल.....

क्रिकेटमध्ये पाचव्या सहाव्या क्रमांकावर खेळणारा माणूस म्हणजे सवतीचा पोर. एकतर खेळायला गेल्यावर कसली ना कसली जबाबदारी असते, हाताशी सगळी शेपूट साथीला उरलेली असते. एकतर त्यांना साथीच्या रोगात जवळचे नातेवाईक गेल्यासारखं एकामागून एक पटापट जाताना समोरून बघायचं नशिबात असतं किंवा तुम्हीच आधी गेलात तर शिव्या असतातच. यांचं शतक होणं फार कठीण असतं त्यामुळे रेकॉर्डबुक पण मद्दड पोराच्या प्रगतीपुस्तकं सारखं अशक्तं असतं. तीच गत चित्रपटात छोटे रोल करणारे, चरित्रं अभिनेते यांची असते. क्वांटीटी कितीही असू दे तुम्ही लोकांच्या फार लक्षात रहात नाही. पण काही लोक तरीही आपली छाप मागे सोडून जातातच.

पेशावरला काश्मिरी पंडिताच्या घरात जन्माला आलेले अवतार किशन हंगल त्यापैकी एक. आजन्मं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सभासद राहिलेला हा स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट होता म्हणून कराचीच्या तुरुंगात दोन वर्ष होता. तिथून सुटका झाल्यावर फाळणीनंतर ते मुंबईला आले. १९२९ ते ४७ हा माणूस स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता. त्यांनी बलराज सहानी आणि कैफी आझमींबरोबर इप्टामधे काम केलंय. कम्युनिझम हा सगळ्यांना जोडणारा मुख्यं दुवा. १९४९ ते ६५ म्हणजे जवळपास सोळा वर्षे हा माणूस स्टेजवर होता. बासू भट्टाचार्यच्या 'तिसरी कसम'मधे १९६६ ला पदार्पण करतानाच ते पन्नाशीचे होते. डोक्याला कायम व्यवस्थित कापलेली झालर ही त्यांची ओळखण्याची जन्मखूण होती. 

सतत दु:खी, कर्जाचे, अन्यायाचे डोंगर कोसळलेला, कसल्या न कसल्या काळजीनी चिंताग्रस्तं चेहरा म्हणजे अवतार किशन उर्फ ए.के.हंगल. कायम तुळतुळीत दाढी केलेले असायचे ते पण त्यांना अगदी सोन्यानी मढवून बीएमडब्ल्यू मधे बसून फिरवलं असतं तरी कुणीही त्यांच्या ड्रायव्हरलाच सलाम ठोकला असता इतका गरीब आणि पिचलेला चेहरा होता. २००७ ला ते आजारी पडले तेंव्हा ते ९३ वर्षाचे होते आणि मुलगा ७५. त्यांच्या एका मुलाखतीत मी वाचलं होतं, 'आम्ही दोन विधूर म्हातारे घरातच असतो, एकमेकांची विचारपूस करत'. अंगावर काटा आला. मुलं उशिरा झाली की लवकर हाताशी येत नाहीत म्हणतात, लवकर झाली आणि दोघं दीर्घायुषी  असतील तर तीच परिस्थिती म्हणा. 

'दिवार' मधले हंगल माझ्या लक्षात आहेत. शशी कपूर ज्या पाव चोरून नेणा-या मुलाला गोळी घालतो त्या मुलाचा गरीब, हताश बाप. नंतर तो भेटायला त्यांच्या घरी जातो. ते घर, तिथली एकूण परिस्थिती आणि हंगलांच्या चेह-यावर लाचारी, गरीबी आणि असहाय्यता इतकी चोपडल्यासारखी होती की शशी कपूरच्या जागी शक्ती कपूर असता तर त्यालाही गिल्टी वाटलं असतं. 'शौकीन'मधला रोल फक्तं रंगीन होता त्यांचा. रसिक, रंगेल. हंगल, अशोककुमार आणि उत्पल दत्तं (यांच्यावर पण लिहावं लागणार. हा माणूस पण तहहयात सीपीआय (मार्क्सवादी) होता आणि रंगभूमीवरून आला होता). बासू चटर्जी होते म्हणून तीन म्हाता-यांना घ्यायची रिस्क घेतली नाहीतर असे रोल वाट्याला येणं हा नशिबाचा भाग आणि आपल्याकडे प्रचंड दुर्मिळ योग.

तुम्हांला रंगभूमीवरचा अभिनय पडद्यावर बघायचाय? 'अर्जुन'मधला सनीचा बाप 'मालवणकर' बघा. घरात कजाग दुसरी बायको 'शशिकला', वयाची शेवटची गिनीचूनी वर्ष राहिलीत, पदरात सुप्रिया पाठक आहे, तिचं लग्नं व्हायचंय, सनीला नोकरी नाही. मी सांगतोय त्या प्रसंगात हंगलसाहेबांच्या चेह-यावरचे एक्स्प्रेशन्स, देहबोली, चालणं बघाच एकदा. १) सगळे जेवायला बसलेले असतात आणि शशिकला सनीला कुचकट बोलते आणि तो ताटावरून उठून निघून जातो, हंगल निमूट जेवायला सुरवात करतात तेंव्हाचा चेहरा बघा. स्क्रिप्टमधे न लिहिलेलं हा माणूस चेह-यावर दाखवून जातो. २) कामावर रिस्पेक्ट नाही. त्यांच्याच मुलाच्या वयाचा मालकाचा मुलगा त्यांना ताडताड बोलतो. हंगल ज्या लाचारीनी नि:शब्दं उभे राहिलेत ना, तोड नाही. या वयात नोकरी जाण्याची भीती त्यांच्या सर्वांगावर दिसते. ३) गोगा कपूर ढोस देऊन जाताना सुप्रिया पाठककडे ज्या नजरेने बघतो त्याच्या परिणाम आणि हतबलता हंगलांच्या चेह-यावर बघा. तो गेल्यावर सनी येतो आणि हंगल त्याला हात जोडून घर सोडून जायला सांगतात. डबडबलेले डोळे, तळतळून बोललेला तो डायलॉग '…. कमसे कम मेरी मुश्किले तो मत बढाओ'. सनी बद्दल वाटणारी बापाची टिपिकल अव्यक्तं माया. बायकोमुळे आलेली हतबलता आणि त्यामुळे होणारी कुतरओढ हे सगळं असलं बिटवीन द लाईन्स चेह-यावर दाखवायचं म्हणजे तपश्चर्या लागते.

'बावर्ची' मधला तो घरातला संध्याकाळी येताना देशीची क्वार्टर घेऊन येणारा मोठा भाऊ रामनाथही आनंदी होता, त्यात ते एकदाही रडके वाटलेले नाहीत. 'भोर आई गया अंधियारा' या गाण्यात त्यांच्या चेह-यावरचा कौटुंबिक आनंद बघा. उगाच भूमिकेत शिरले, भूमिका जगले वगैरे मोठमोठ्या गप्पा नाहीत. छोटे छोटे डिटेल्स चेह-यावर दाखवले की मोठं काम होतं. त्यांचं त्या घरातलं वयानुसार, नात्यांनुसार स्थान वगैरे स्क्रिप्टमध्ये फक्तं रेफरंससाठी लिहिलेलं असणार, ते दाखवायचं काम त्या त्या कलाकाराचं असतं.


'इतना सन्नाटा क्यू है भाई' याची सगळ्यात जास्ती मिमिक्री झाली असेल. पण मी कधीही त्या जोक्सवर हसू शकलेलो नाही. थेटरला बघा आणि मग सांगा, 'अहमद' सचिन मिनतवा-या करून नोकरीला परगावी जायला तयार झालाय,  तो ताजा आनंद इमामसाब उराशी धरून आहेत आणि त्याचा पूर्ण आस्वाद घेण्याआधीच ती बातमी येते. वाईट बातमी कशी सांगायची असा सगळ्यांना प्रश्नं, टेन्स्ड वातावरण आणि आंधळा इमाम. 'कितने आदमी थे' एवढेच तेंव्हाचे डायलॉगपण खतरा आहेत. 'इतना सन्नाटा क्यू है भाई', 'बाप के कंधेपे बेटे का जनाजा' आणि 'पुछुंगा आज खुदासे'. हेमा मालिनीच्या हाताला धरून पाय जड झाल्यासारख्या पाय-या चढणारा तो आंधळा म्हातारा अख्खा सीन खाऊन टाकतो आणि गळ्यात आवंढाही आणतो. 


त्यांना जाऊन तीन वर्ष झाली. त्यांचा अंतिम काळ फार चांगला गेला नाही. औषधोपचारासाठीही पैसे नव्हते पण अमिताभ, जया, करण जोहर, सलमान, असोसिएशन आणि सरकारनी मदत केली. आयुष्यंभर कुठल्याही वादात न अडकलेला, कुप्रसिद्धी न लाभलेला, एक कमी केसांचा, रडक्या आवाजाचा, काटकुळा पण सशक्त अभिनय करणारा, छोट्या भूमिकेतही लक्षात रहाणारा एक सज्जन माणूस कमी झाला.

जयंत विद्वांस




No comments:

Post a Comment