Wednesday 2 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (१)…. इफ़्तिखार खान.....

कोणताही माणूस जन्माला येताना काही विशिष्ट छाप चेह-यावर घेऊन जन्माला येत नाही. आयुष्यं पुढे जात राहिलं की एकेक मुखवटे, चेहरे, छाप आपल्या चेह-याला चिकटतात. आशा काळे, अलका कुबल म्हणजे सोज्वळ चेहरा, शक्ती कपूर, सुधीर म्हणजे राहू केतू, ए.के.हंगल म्हणजे बॉर्न म्हातारा तसाच इफ़्तिखार जन्मानीच पोलिस इन्स्पेक्टर होता. वाळक्या अंगाचा इफ़्तिखार १९३८ तो १९९२ एवढ्या प्रचंड कालावधीत चारशेच्यावर चित्रपटात झळकला. चरित्रं अभिनेत्याला तशी दुय्यम वागणूक असते कारण त्यांच्यावाचून फार कुणाचं अडत नाही. बदली कामगार लगेच हजर असतो. तरीही स्वत:च्या व्यक्तिमत्वानी या मोहमयी फिल्म इंडस्ट्रीमधे स्वत:चा आब राखणारी फार कमी माणसं मला दिसली. अशोक कुमार, बलराज सहानी, प्राण, अमरीश पुरी, ए.के.हंगल, इफ़्तिखार आणि इतर काही मोजकी मंडळी. 'ताजमहाल' मधे नुरजहांचं काम केलेल्या रुपगर्विता वीणाचा हा तेवढाच देखणा भाऊ. 


राजकुमार उर्फ भूषण पंडित, इफ़्तिखार खान, प्राण सिकंद, अमरीश पुरी, ए.के.हंगल यांनी आपलं कुटुंब किंवा त्याबद्दलची माहिती फार पब्लिक होऊ दिली नाही. लोकांना उत्सुकता होती त्यापोटी आब राहिला, माणसं वचकून राहिली. कौटुंबिक जीवन आणि पडद्यावरचं जीवन या दोन्हीत पडदा टाकून वेगळं ठेवणं फार अवघड असतं कारण प्रसिद्धीची हौस मोठी आणि अटाळणीय असते. इफ़्तिखारचे दहा चित्रपट पटकन सांगा असं कुणी विचारलं तर मला सांगता येणार नाहीत कारण एकतर त्याचा रोल फार मोठा नसायचा. जज, इन्स्पेक्टर, कमिशनर, बाप, वकील असे भारदस्तं रोल्स असायचे. नझीर हुसेन एक तसा कायम हिरोइनचा रडणारा बाप असायचा. पण इफ़्तिखारचा बाप गरीब असो, श्रीमंत असो, इन्स्पेक्टर असो, कमिशनर असो, लाचार, कर्जबाजारी चेह-याचा, क्लूलेस, बावळट मात्रं कधीच दिसायचा नाही. 


भरभक्कम शरीरयष्टी नाही, संवादफेकीसाठी लागणारा दमदार आवाज नाही, फार मोठे रोल्स नाहीत तरीही तो लक्षात आहे माझ्या. तो कधीही सहाय्यक गुंड वगैरे नव्हता माझ्या पाहण्यात तरी. एक खानदानी तहजीब त्याच्या बोलण्या वागण्यात दिसायची. बोटात सिगरेट, पाईप, सिगार जे काय असेल ते शोभून दिसायचं त्याला. तुम्ही तहहयात इन्स्पेक्टर, अनिता राजचा बाप जगदीशराज बघा, बढतीच नाही कधी, कायम अनेक केस अनसॉलव्ह्ड असलेला, बदली न झालेला इन्स्पेक्टर दिसतो तो. 'खिलाडी'चा ओरिजिनल 'खेल खेल में' मधला ऋषीकपूरवर लक्ष ठेवणारा इफ़्तिखार आठवा. फक्तं उपस्थितीनी तो गूढपणा वाढवतो. त्याचा 'इत्तेफाक'मधला इन्स्पेक्टर पण माझ्या लक्षात आहे.   



अमिताभबरोबर त्याचे बरेच सिनेमे आहेत. जंजीर मधला अजितच्या जीवावर उठलेल्या अमिताभला आवर घालणारा कमिशनर. शोले मधला ठाकूर संजीवकुमारचा व्याही खुराणा, पहिल्यांदाच आलेल्या संजीवकुमार आणि रामलालचं स्वागत आठवा, ठाकूरच्या नोकराची रामलालची चौकशी सुद्धा किती मर्यादशील आहे, भले डायरेक्टरनी सांगितलं असेल पण जमायला पाहिजे ना तो श्रीमंतीचा, खानदानीपणाचा आब. जया भादुरीच्या पुढच्या आयुष्याचं काय करायचं या विषयावर बोलायला संजीवकुमार त्याच्या घरी येतो. तो किती संयत बोललाय, उगाच अश्रुपात नाही, ते त्याला शोभलंही नसतं. विरक्तं झालेला बाप, मुलगी आता आपली नाही, ठाकूरची सून आहे, तिच्या आयुष्यात फार हस्तक्षेप नाही करायचा हे सगळं मला तरी दिसलं इफ़्तिखारच्या चेह-यावर.  


दिवारमधे 'जयचंद' सुधीरला पैसे उचलून द्यायला लावणारा, लहान मुलातला स्पार्क ओळखणारा द्रष्टा 'दावर', अमिताभला 'खुर्ची' दिल्यावर जाताना आठवण करून देत सुधीरला अवाक करणारा स्मित करत जाणारा 'दावर', सामंतकडचे पैसे पण विजयकडेच ठेव म्हणणारा मोठ्या मनाचा दावर, मदन पुरीच्या उथळ 'सामंत' (हे त्या पात्राबद्दल म्हटलंय, मदन पुरीबद्दल नाही) पुढे त्याचा मितभाषी, धूर्त दावर उठून दिसतो त्यामुळे. सत्ता, साम्राज्यं सहज हस्तांतरीत करणं सोपं काम नसतं, दावरचं मोठं मन इफ़्तिखारच्या चेह-यावर बघावं. 


डॉन मधला घरचे खाकी ड्रेस आणून कर्जबाजारी नरिमन इराणीचा वेळ आणि खर्च कमी करणारा डीएसपी डिसिल्व्हा बघा, कोपरापर्यंत दुमडलेल्या बाह्या, बोटात सिगरेट आणि चेह-यावर पोक्तं थंडपणा. प्राणच्या पिस्तुलाला तो घाबरत नाही, शांतपणाने तो त्याला जमिनीवर आणतो. डॉन किंवा इतर चित्रपटात त्याच्या ब-याचश्या सिग्रेटी न ओढताच संपल्या असतील याचं मला अतीव दु:खं आहे. स्वत:च्या हिमतीवर डॉनला रिप्लेस करायचा प्लान आखणारा, फाईलमधला एफआयआर फाडणारा, हेलनच्या मदतीनी डॉनला पकडायला गेलेला, पॅनिक न होता डॉनला समजावणारा, आरशात त्याच्या चेह-यावरून त्याच्या दुखापतीचा अंदाज घेणारा पेशंस असलेला डिसिल्व्हा. 




काळ बदलला, सिनेमे बदलले, त्यातले पोलिस, इन्स्पेक्टर, कमिशनर सुद्धा बदलले. 'आखरी रास्ता' मधला ओम शिवपुरीचा डीजीपी, कोट घालणारा 'घायल' मधला ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, 'सत्या' मधला परेश रावलचा कमिशनर शुक्ला, 'त्रिदेव' मधला अनुपम खेर, 'गंगाजल'मधला अजय देवगणचा एसपी अमितकुमार, 'आन - मेन अॅट वर्क'चा अक्षयकुमारचा एसपी हरी ओम पटनाईक हे सगळे चकाचक पोलिसवाले झाले. खाकी कपड्यातला हडकुळा, जीप मधून फिरणारा, थंड डोक्याचा, आपल्यातला वाटणारा, सहृदयी पुलिसवाला एकंच - इफ़्तिखार खान.  

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment