Saturday 5 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (५)…. फरिदा जलाल....

आनंदी माणसं स्थूल असतात की स्थूल माणसं आनंदी दिसतात? प्रत्येकाची एखादा चेहरा आवडण्यासाठीची वेगवेगळी कारणं असतात. पोर काळंकुट्ट, दिसायला वेडंबिद्र का असेना आईला प्राणप्रियं असतं. काही चेहरे आपल्याला सौंदर्यामुळे, रंगामुळे, रेखीवपणामुळे, एखाद्या जीवघेण्या जागी असलेल्या तीळामुळे अशा अनेकविध कारणांनी आवडतात. काही चेहरे पाहिले की का पाहिले असं वाटतं. काहींच्या चेह-यावर पृथ्वीचा आजचा शेवटचा दिवस असा भाव असतो तर काहींच्या चेह-यावर सतत गंभीर, वैराग्यं असतं. काहींचे चेहरे मात्रं पहाटेच्या दवात भिजलेल्या प्राजक्तासारखे टवटवीत असतात. आनंद ओसंडून वहात असतो, तुमच्या सगळ्या काळज्या क्षणभर विसरायला लावणारा चेहरा असतो. फरिदा जलाल तशी आहे, अत्यंत गोड चेह-याची ही बाई सहासष्ठ वर्षाची आहे आत्ता. 



 
बघणा-याच्या मनात कुठलीही वाईट, लैंगिक भावना येऊ शकत नाही असा चेहरा दुर्मिळ असतो. जे लोभस चेहरे मला आजवर खूप आवडलेत त्यात 'तदबीरसे बिगडी हुई' म्हणणारी गीता बाली, ममता कुलकर्णी (बाकी भूमिका सोडा तिच्या, पण ओथंबलेल्या गालाची ममता गोड चेह-याची होती), फरिदा आणि जुही चावला. शेवटच्या दोन मला त्यांच्या सौंदर्यापेक्षा अफाट सेन्स ऑफ ह्यूमर आणि आनंदी चेहरा यासाठी जीव ओवाळून टाकाव्यात एवढ्या आवडतात. आपण पडद्यावरच्या अभिनेत्रींशी मनातल्या मनात काय काय नाती जोडत असतो. बहिण म्हणून मात्रं मला फरिदाच येते डोळ्यांसमोर. गोब-या गालाची, साईच्या मायाळू चेह-याची आणि हसरी. तिच्या या अशा चेह-यामुळेच ती बरेचदा बहिण झाली असेल का पडद्यावर? 


राजेश खन्ना आणि ती फायनलला आले होते फिल्मफेअरच्या स्पर्धेत आणि विनोद मेहरा दुसरा. पुढे तिनी खन्ना बरोबर आराधना केला. भोपळ्यासारखी फरिदा बागोमें बहार है म्हणताना पण ती फक्तं वयात आलेली लहान मुलगीच वाटते मला. कितीही निर्दयी, पाताळयंत्री माणसाला तिला फसवायचं म्हटलं तर दु:खं होईल अशी. दिलीपकुमार, संजीवकुमार ते अमिताभ सगळ्यांची बहिण झाली ती. मजबूर मधली चाकाच्या खुर्चीत बसलेली अपंग फरिदा. 'नही मैं नही देख सकता तुझे रोते हुए' हे तर मी तिच्या चेह-याकडे बघूनच लिहीलं असतं. 'जीवनरेखा' सिनेमात हिरोचं काम करणा-या तबरेज बर्मावरच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी तिनी लग्नं केलं. ती आणि मधुबाला यांच्याबद्दल कुणी वाईट लिहिलेलं मी आजपावेतो वाचलेलं नाही. अतिशय स्वच्छ प्रतिमा, कुठलीही भिकारडी विधानं नाहीत, सगळं कसं आब राखून.
 

​'काला सोना' मधलं 'सुन सुन कसमसे' आठवतंय, आधीच गोबरे असलेले गाल ती फुरंगटवून मोठे करते आणि अजून छान दिसते. 'खुशबू' मधलं तिचं 'बेचारा दिल क्या करे' माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. काय कौतुकाने बघते ती हेमामालिनी कडे, संपूर्ण गाण्यात तिच्या चेह-यावर दिसणारा तो अवखळपणा, चेष्टेचा सूर आणि ते हमिंगच्या वेळेस दिसणारं गोड रूप, हा अभिनय नव्हे, ते सगळं अत्यंत नैसर्गिक, आतून आलेलं आहे. ७१ ला 'पारस' साठी आणि ९४ ला 'दिलवाले दुल्हनिया…' साठी तिला फिल्मफेअर मिळालं होता. चोवीस वर्ष गोडवा टिकवून ठेवणं ही साधी गोष्टं नाही. सनीच्या 'सलाखे' मधे ती त्याची आई आहे. अनुपम खेर गेल्यावर तिचा तो त्रागा दाखवणारा सीन बघा, सुन्न करते ती. सनीच्याच 'जिद्दी' मधे तिचा दवाखान्यातला सीन बघा, सतत बडबड करणारी ती रविनाची आई, एका क्षणी असा चेहरा बदलते की जीव जातो. 


'क्रांतीवीर'मधे ती नानाला भेटायला जेलमधे येते तो सीन, डिंपलकडे काय प्रेमाने बघते ती, हार्मलेस सासू. यात तिच्या पोटी नाना आणि 'अंधा कानून'मधे सुलोचानाच्या पोटी रजनीकांत - दोघंही वडिलांवर गेले असावेत असा समज मी करून घेतलाय दोन्ही वेळेस. 'बॉबी' मधे ती 'मंद' दाखवलीये जिच्याशी ऋषी कपूरचं लग्नं ठरवतात, काय निरागस दिसते ती. 'धर्मात्मा' मधली मोना. मार खाऊन पण नव-यासाठी फिरोजखानला हात जोडणारी, इम्तियाझ 'कुंदन' तिला मारतो त्यामुळे ती 'कुंदनको बख्श दो' शपथ वगैरे तुटते याचा लहानपणी बघताना खूप आनंद झालेला मला. लहानपण मोठं गमतीशीर असतं. फरिदा जलाल ही जलाल आगाची बायको आणि तो विनोदवीर आगाचा मुलगा हा योग्यं समज आणि जलाल आगाची बायको हा गैरसमज हे नंतर समजलं.  


ती सोनी वर 'स्टार यार कलाकार' ग्रेसफुली करायची. तिचा वावर सुद्धा प्रसन्नं होता. 'देख भाई देख' मधे तिचा सेन्स ऑफ ह्यूमर बघावा. पुढे होणा-या विनोदाचा अंदाज तिच्या मिश्किल चेह-यावर आधी येतो ना तो स्वभावात लागतो, अभिनय नव्हे तो. ती, देवेन वर्मा आणि जुही अतिशय निरागस, विनोदावर स्वत:च धो धो न हसता मस्तं कॉमेडी करायचे. तिचा 'मम्मो' काही मी पाहिलेला नाही, त्यात तिचा लीड रोल होता आणि ज्यासाठी तिला क्रिटिक अवार्ड मिळालं होतं. 

तुझा चेहरा बघून आम्हांला आनंद होतो हे आमचं आणि आमचा तू बघत नाहीस हे तुझं भाग्यं.  देव करो आणि तुझा चेहरा शेवटच्या क्षणापर्यंत असाच हसरा राहो.

जयंत विद्वांस   



No comments:

Post a Comment