Saturday 19 September 2015

मोकळा…

मोकळा…

आउट ऑफ द वे जाऊन मदत करणे, एखाद्याला सहकार्य करणे ही गोष्टं वाईट नाही. पण काहीवेळा त्याचे होणारे परिणाम मात्रं फार भीषण असतात. आपण केलेली मदत ही फक्तं आपल्या आणि ज्याला केलीये त्याच्या दृष्टीतून नैतिक ठरते, बाकीच्यांना तुम्ही जेवढं जोरात ओरडून सांगाल तेवढं ते खोटं ठरतं. एखादी घटना अशी घडते की आयुष्याचा अर्थच बदलून जातो. उरलेल्या आयुष्यात एक सल, क्वचित डाग घेऊन जगणंसुद्धा नशिबी येतं. इलेक्ट्रोनिक मिडिया जसं अतिरंजित बातम्या देऊन एखाद्याला आयुष्यातून उठवतात तसं काहीवेळेस होतं. मी सांगणार आहे ते कधीच घडून गेलंय. तीसेक वर्ष निश्चित झाली. जुनं का उकरायचं खरंतर, पण गरजेचं आहे, कुणाच्या तरी बाबतीत असं घडू नये म्हणून. 

माझी मैत्रीण होती एक. एका हिलस्टेशनला तिचे बाबा म्यानेजर होते राष्ट्रीयकृत बँकेत पस्तीस वर्षापूर्वी. तेंव्हा काय गर्दी असणार बँकेत तिथे. सगळा गाव ओळखीचा होता. तीन मुली, घरात चारचाकी, पुण्यात प्लॉट. सगळं कसं छान चाललं होतं. माणूस सज्जन, कुटुंबवत्सल. पस्तीस वर्षापूर्वी बँकेत व्यवहार फार नसायचे, सेव्हिंग खातीच जास्ती. तर त्यांचा एक मित्रं होता गावात. तो ही प्रामाणिक. त्याला पैसे लागत होते अर्जंट. त्यानी लोन मागितलं. सगळी प्रोसेस व्हायला पंधरा वीस दिवस जाणार. पैसे तर लगेच हवे होते. गोल्डलोन हाच एकमेव मार्ग होता लगेच पैसे मिळण्याचा. बँकेचा सोनार असतोच, तो ही गावातलाच ओळखीचा होता. 

बरं त्या माणसाला हे पैसे महिन्याभराकरताच हवे होते. सगळंच त्रांगडं. तेंव्हा सोन्याचा भाव तो काय आणि मिळणार किती. त्यानी आणलेल्या सोन्यात मिळणारी रक्कम पुरेशी नव्हती तेंव्हा 'दोन खोटे दागिने त्यात घालूयात, मी पंधरा दिवसात सगळे पैसे भरणार आहेच नाहीतरी' असं तो म्हणाला. बरं, तो भरणार आहे ही खात्रीही होती. जीवावर उदार होऊन यांनी संमती दिली. लोन दिलं. पैसे दिले. हे सगळं शनिवारी घडलं आणि सोमवारी दुपारी पुण्याहून एच.ओ.चे लोक हजर झाले. कुणी सांगितलं, काय नेमकं घडलं शेवटपर्यंत कळलं नाही. खबर पक्की होती. त्यांनी लोनखाती चेकिंगला घेतली. यांनी स्वत:हून शनिवारची स्टोरी सांगितली. बँकेने निलंबन केलं ऑन द स्पॉट. एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. 

गावात वट होती. सगळे ओळखायचे. पसरायला वेळ लागला नाही. 'दिवार'च्या सत्त्येन कप्पू सारखं जगणं मुश्कील झालं. राजीनामा दिला. पुण्यात सगळे आले, नोकरी नाही, गाडी विकली. प्लॉट होता त्यावर जमा पुंजी, पी.एफ.यातून घर तेवढं बांधलं. तीन मुलींची शिक्षणं, लग्नं, सगळंच अवघड. सगळ्या शिकल्या, लग्नं झाली. दोन बी.कॉम, एक एम.कॉम.झाली, नोकरी करून स्वत:ची लग्नं केली त्यांनी. मला खाज फार, माणसं वाचायची. ते तेंव्हा डेक्कनला एका हॉटेलात क्याशियरचं काम करायचे. मी त्यांच्या घरीही जाऊन आलो होतो. ते फार बोलायचे नाहीत. मला इतिहास काही माहित नव्हता. त्यांच्याकडे बघितल्यावर मला वाटलं, हा माणूस 'क्याशियर' लेव्हलचा वाटत नाही. तेंव्हा ती म्हणाली, 'हे असं असं झालेलं, कुठेही जॉबला गेले की बँक का सोडली? याला उत्तर नव्हतं. खोटं सांगितलं तर अजूनच बदनामी, कुठल्या बँकेत जाणं शक्यंच नव्हतं जॉबसाठी. त्यामुळे आधीचं काहीही आम्ही सांगत नाही. अनेक जॉब झाले. इथे बरीच वर्षे आहेत आता. त्या माणसानी ते लोन लगेच फेडलं पण त्याचे हप्ते आम्ही अजून भरतोय'.   

नंतर तुम्ही आता काहीही बोला, अक्कल पाजळा, त्यांचं काय चुकलं, त्यांनी काय करायला हवं होतं, उपयोग शून्यं. घडलं ते घडलं. सदहेतूनी केलेल्या गोष्टीचं फळ त्यांना मिळालं नाही एवढंच खरं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना समजून घेतलं आणि दोष दिला नाही हा नशिबाचा भाग. हल्ली हजारो कोटीच्या बँका बुडवून झाल्या की पेपरात नाव येतं हल्ली, फलाणा माणूस कसा आणि किती काळ फरार आहे, ही बातमी असते. पस्तीस वर्षापूर्वी असं काही नव्हतं यात त्यांचा काही दोष नाही. 

काय वाटत असेल त्यांना नेमकं. मला वाटतं, एकदा त्यांना कुणीतरी मुद्दाम विचारावं, कुरापत काढल्यासारखं. असे चिडतील की सगळं ओकतील, शिव्या देतील, रडतील. होऊन जाऊ दे एकदा. माणूस मोकळा होईल. अचानक गप्पं झालेला, स्वत:वर चिडलेला माणूस एकदा मोकळा झालाच पाहिजे. काय म्हणता?

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment