Thursday 17 September 2015

वृत्ती.....

वृत्ती..... 

पिळवणूक करणे, कमीत कमी पैशात राबवून घेणे, पैसे बुडवणे हा अचिव्ह्मेंटचा भाग असावा, असं माझं मत आहे. ९१/९२ च्या दोन दिवाळीला आलेले अनुभव माझ्या लक्षात आहेत. 

९१ ला ५००/महिना पगारावर कामाला होतो. शिकाऊ म्हणजे गुलामच. दिवाळी होती. टायटनचं नविन शोरूम झालेलं भांडारकर रोडला. वडिलांना घड्याळ घेऊयात असा विचार. बघून आलो, १०५०/- ला होतं आवडलेलं. महिन्याचा पगार आणि अंदाजे ३००-५०० बोनस मिळेलच अशी आशा. माझे वडील त्यांच्याकडे चाळीस वर्षे होते आणि मी तेंव्हाचे पंधरा लाख वसूल करून दिले होते, दोन टक्के ठरलेले (३००००/- तेंव्हा मिळाले असते तर?) तरीही माझी अपेक्षा फक्तं पाचशे रुपयाची होती. शरद पवार संरक्षणमंत्री झाले म्हणून एसेम डायकेमनी त्यांच्या कुरकुंभजवळच्या कारखान्यात पार्टी दिलेली त्यासाठी दिवाळीत सुट्टी पण मिळाली नव्हती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मी पगार आणि अधिक पाचशे कारण सांगून घेतले. वडिलांना घड्याळ दिलं. दिवाळीनंतर त्यांनी विचारलं, 'अरे, तुझे ते पाचशे कसे कट करायचेत? तू डिसेंबर पर्यंतच आहेस ना?'. म्हटलं, 'बोनस नाही का काही?' 'अरे, तू पर्मनंट नाहीस ना त्यामुळे देता येत नाही'. मी लगेच त्या महिन्याच्या पगारात परत देऊन टाकले. बुडवायला कुणी शिकवलंच नाही, काय करणार. 

बी.कॉम परीक्षा देऊन आलो त्यांनी मला हक्कानी एप्रिलला परत बोलावून घेतलं (पगार ८००), वडील जा म्हणाले, गेलो. भाऊ तेंव्हा एका कंपनीत होता संगमब्रिज जवळ. तिथे फॉक्सबेसमधे स्टोअरचं डाटा फीडिंगचं काम होतं. मला म्हणाला, करशील का? पुढे मागे घेतील इथे. हो म्हटलं. सहाला डेक्कन वरून संगमब्रिज. साडेसहा ते साधारण साडेआठ. तिथून सायकल मारत घरी यायला नऊ. एकतर ऑफिसमधे सेकंड फ्लोअरला आणि खाली फ्लोरला पण कुणी नसायचं, भीती वाटायची भूतासारखं काम करायला. सोळा अठरा आकडी नंबर आणि इतर माहिती बिनचूक भरायची असायची पार्टसची. त्यांना ते खूप घाईचं होतं. मी उरापोटावरून दोनेक महिने सगळं काम बिनचूक केलं. त्यांचं दिवसात व्हायचं तेवढं मी दोन तासात करायचो. पैशाचं काही बोलायला तयार नाही माणूस. बरं त्यांची माझी भेट व्हायची नाही, फाईल्स काढून ठेवून ते पाचला जायचे. 

दिवाळी होती. शेवटी मी जमत नाहीये सांगितलं. त्यांनी निरोप दिला, रविवारी घरी ये, पैसे घेऊन जा तुझे. आमचा अंदाज ३-४००० तरी मिळावेत, खरंतर काम त्याच्या दुप्पट केलेलं असूनही. आम्ही दोघं खुशीत गेलो, चहापाणी झालं. 'तुझं आहे बरं का माझ्या लक्षात, तुझा स्पीड भन्नाट आहे आणि कामही अचूक आहे, बोलून ठेवलंय मी, मला समजलं की सांगतो तुला' असं अत्तर माझ्या मनगटावर लावून झालं, मी ही दुस-या हातावर चोळून दोन्ही नाकपुड्या भरून घेतल्या. उठताना त्यांनी पाकीट दिलं. समोर फोडायला नको, वाईट दिसतं असली शिकवण आड आली. पाकीट बारीक लागत होतं जाडीला. तेंव्हा पाचशेची नोट नवीन होती, अप्रूप होतं. गेला बाजार सहा तरी नोटा असाव्यात असं वाटलं. जीन्स, टी शर्ट, शूज तरळून गेले डोळ्यासमोर. घरी आलो. करकरीत पाच नोटा होत्या, फक्तं एक शून्यं खोडलेल्या. अडीचशे रुपये परत त्या भिका-याला देऊन येणार होतो पण सभ्यपणा आड आला. 

दिवस काही रहात नाहीत कुणाचे तसेच. पण माझ्यात एक वाईट गुण आला. मला घासाघीस करता येत नाही. कुणाच्याही कामाचे पैसे कमी करता येत नाहीत, बुडवता येत नाहीत. सणासुदीला केलेल्या कामाचे तर नाहीतच. आपल्याला आलेला अनुभव खरंतर दुस-याला द्यावा पण मी तो माझ्यापुरताच मर्यादित ठेवला, वापरला नाही. 

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment