Saturday 12 September 2015

नाना मराठे.....

नाना मराठे.....

हल्ली पहिल्यासारखं दिवसदिवस टी.व्ही.समोर बसून क्रिकेट फार बघितलं जात नाही तरीही शक्यतो हायलाईट बघतोच मी. जवळपास प्रत्येकानी त्याच्या शाळकरी, कॉलेज वयात ते खेळलेलं असतं, पाहिलेलं असतं. जुन्या टेस्टमॅचची रटाळ असली तरी ती मजा गेली आता. आता घरात एकट्यानी ४८" टी.व्ही.वर मॅच बघताना काहीतरी हरवलंय असं वाटतं. चाळीतल्या घरात किमान दहा बारा पोरं असायचो वनडे बघायला. हळूहळू मांड्या घालून बसलेला एकेक पसरायला सुरवात व्हायची आणि ती दहा बाय दहाची खोली फुल व्हायची. अशा अनेक वनडे, वर्ल्ड कप माझ्या लक्षात आहे. माझं कुचकं, विनोदी, उपहासात्मक समालोचन फुकट चालू असायचं. विंबल्डन, फ्रेंच, डेव्हीस कप पण हल्ली बघितल्या जात नाहीत. वयं वाढत जातात, नविन खेळाडू येतात, चमकतात, लवकर अस्तंगत होतात त्यामुळे नाळ पटकन जुळत नाही. परवा लंकेची टेस्ट बघत होतो आणि इशांत शर्माच्या मस्तीवर पटकन तोंडातून शिवी गेली आणि नाना आठवले. 

नाना मराठे, एकदम रत्नागिरीच्या मधल्या आळीला शोभेल असा ओरिजिनल खवचट माणूस, त्यांचं नाव आजतागायत मला माहित नाही. त्यांची मुलं त्यांना नाना म्हणायची म्हणून आम्हीच असं नाही सगळीच त्यांना नाना म्हणायची, अगदी मराठे काकूसुद्धा. नाना म्हणजे दिसायला अगदी गरीब माणूस, अर्थात फक्तं तोंड उघडेपर्यंत. तसे नाना बुटकेच दिसायचे, साडेपाच फुटाच्या आसपासची उंची होती खरंतर पण तसे ते गुटगुटीत असल्यामुळे बुटके वाटायचे. लख्खं गोरा रंग, दाट पण पांढरे झालेले केस तेल लावून राजा गोसावीसारखे सगळे मागे वळवलेले, भिवया सुद्धा पांढ-या शुभ्रं अगदी, त्याच्या मधे शेंदूर लावलेला टिकलीएवढा , ओठाच्या मधोमध हिटलरसारखा पांढ-या रंगात रंगवल्यासारखा जाड चौकोन आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी ओठावर ओठ संपतात तिथपर्यंत पायपीन लावल्यासारखी दोन मिलीमीटर जाडीची मिशीची रेष. तोंडात सतत अर्ध पान, त्याला अर्धबोट चुना, काताचा बारीक तुकडा आणि सुगंधी तंबाखूची चवीला मीठ टाकतात तेवढी चिमूट याची पुरचुंडी दर अर्ध्या पाऊण तासाला सरकवलेली असायची. एखाद्याचा बारीक तुकडे करून समूळ नाश करावा तशी अडकित्त्यात रोठा सुपारी बारीक करायचं काम सतत चालू असायचं. बघता बघता रममाण झाले की तोवर पान संपलेलं असायचं, मग तोंडात काही नाही लक्षात आलं की सुपारीचा ऐवज तोंडात जायचा. पान आणि सुपारी एकावेळी तोंडात हा योग क्वचित जुळायचा. रिटायर्ड नाना दाढी मात्रं रोज सकाळी करायचे. पन्नाशीतच त्यांनी मिलिटरी अकाउंट्स मधून व्हालंटरी घेतली होती. गावाकडे त्यांचे उत्पन्नही होते. एकूण माणूस सुखवस्तू होता. 

आम्ही कॉलनीत क्रिकेट खेळायला जायचो तेंव्हा. ग्राउंडसमोरच त्यांचा बंगला होता. त्यांच्या मुलगा मनोजपण आमच्यात असायचा. जाळीला धरून ते बघत उभे रहायचे किंवा मग बंगल्याच्या बाहेर खुर्ची टाकून बघत बसायचे, बोलायचे मात्रं काहीही नाहीत कधी कुणाला. पाणी प्यायला त्यांच्या बागेतल्या नळावर आम्ही जायचो किंवा खेळल्यावर गप्पा ठोकायला त्यांच्या कंपाउन्डला रेलून उभे रहायचो. एकदा असेच एका शनिवारी संध्याकाळी खेळून आम्ही गप्पा ठोकत उभे होतो. माझा त्यांचा फार परिचय नव्हता त्यामुळे मनोज आहे का? नसला तर कधी येणार आहे, इतकंच बोलणं व्हायचं. कॉलनीतली बाकीची मुलं त्यांच्या परिचयाची होती, मी कॉलनीतला नव्हतो. दुस-या दिवशी वनडे होती. मला म्हणाले, तू पण ये रे उद्या बघायला. मी हो म्हटलं आणि निघालो. रव्या म्हणाला, 'तू अण्णांकडे आला आहेस का कधी म्याच बघायला?' 'नाही, का रे?' 'येच मग उद्या, एकदा आलास की कळेल'. मी उत्सुकतेपोटी गेलो टायमात दुस-या दिवशी. 

त्यानंतर असंख्यं वन डे, टेस्टचे रविवार , विम्बल्डन, फ्रेंच मी नानांकडे बघितल्या. एकपात्री प्रयोग असायचा तो सगळा. नानांच्या शिव्या या खेळावरच्या अतीव प्रेमापोटी यायच्या, त्यात कुणालाच काही गैर, अश्लील वाटायचं नाही. नानांची त्यावेळची शारीरिक स्थिती, तो अभिनय हा शब्दात मांडणं अशक्यं आहे, तो अनुभवायलाच हवा. विंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीमवर त्यांचा भारी जीव. आपल्याविरुद्ध सामना असेल तरी ते त्यांच्या बाजूनी असायचे. तेंव्हा फार राग यायचा. पण नाना उलगडून सांगायचे मग पटत गेलं. 'आपले साले ठरवून येतात, त्यांचे बघ, मजा घेतात, फालतूची शोगिरी नाही, प्रोफेशनल रे सगळे. आपल्याला खूप वर्ष लागतील ती लेव्हल यायला. देवानी काय विभागवार माणसं जन्माला घातलीत का? खेळात कसला आलाय विभाग? जो चांगला खेळतो तो आत एवढाच नियम त्यांच्याकडे. पंकज रॉय खेळला म्हणून प्रणब रॉय खेळला. भोसडीच्याला खेळता येत होतं?' नाना एकदा सुटले की सुटले. मग फक्तं ते काय बोलतात ते ऐकायचं, पोटतिडकीने बोलायचे. रवि शास्त्री, आशिष कपूर, निखिल चोप्रा, विजय भारद्वाज, सार्देंदू मुखर्जी वगैरे त्यांचे मागच्या जन्मीचे शत्रू. 

त्यांना रवि शास्त्री हे तोंडीलावणं होतं. 'नशिब लागतं रे. तो येड*वा श्रीकांत, चार फोर मारल्या की आउट होणार. मोफत विकेट. आपली अवस्था १/४५, ३/६२, ४/८७ अशी होणारच तो असला की. हा चू*मारीचा खाली येणार, निवांत पन्नास काढणार, एखाद दोन विकेट घेणार, झाला सामनावीर. च्याम्पियन ऑफ द च्याम्पियंस, ऑडी. याची लायकी तरी आहे का रे?' रनरेट वाढू लागला, चेंडू लेगच्या बाहेर टाकायला लागला, शॉर्ट पिच टाकला की त्यांना स्फुरण चढायचं. 'अरे बाळ श्रीनाथ (किंवा चेतन शर्मा/प्रसाद/जो कुणी असेल तो) , आपल्या पिचवर चेंडू उडतो का कमरेच्यावर? आपला स्पीड काय, पिच काय, कितवी ओव्हर टाकतोय आपण, सांगा रे कुणी याला. कप्तानानी फिल्डिंग काय आपली आ* घालायला लावलीय का ऑफला?' आम्ही सगळे हसायचो फक्तं. मजा असायची. सामना काट्यावर आला की नाना टी.व्ही. जवळच्या टेबलाला रेलून उभे राहायचे, उजवा पाय डाव्या गुडघ्यावर त्रिकोण करून. एखादी हुकलेली सिंगल, न पळालेली थर्ड, सुटलेला लॉली असं काही झालं की तो उजवा पाय सुटायचा आणि त्या गुन्हेगाराच्या **त जायचा लगेच. अशा मोक्याच्या वेळी टी.व्ही. समोरून कुणी गेलं की नाना त्याला भ*व्या, काय चड्डीत झालीये का? थांब की दोन मिनिट', काकूंनी जेवायला हाक मारली की, 'तुम्ही गिळून घ्या भूक लागली असेल तर' असं म्हणायचे. 

लंच टाईम झाला की आम्ही पटापट घरी जाऊन जेऊन यायचो. मग नाना झालेल्या सामन्याची चिरफाड करायचे आणि पुढे काय होईल त्याची भविष्यंवाणी. मी विश्वनाथचा न बघितलेला स्क्वेअरकट त्यांच्या बोलण्यातून पाहिलाय. दोन पोरांना उभे करून नाना दोन गली लावायचे, मग त्यांना बायसेक्ट करणारा तो अजरामर स्क्वेअरकट कसा जायचा, ते फिल्डर *त्यासारखे कसे एकमेकांकडे बघायचे याचं वर्णन. गावसकर, कपिल, विश्वनाथ, जुने आम्ही न पाहिलेले नायडू, शिवलकर, रमाकांत देसाई, मर्चंट, बोर्डे, उम्रीगर आणि अनंत लोकांची उजळणी व्हायची. विंडीज गोलंदाज म्हणजे त्यांना अतिप्रिय. 'अरे, शरीरयष्टी हे कारण आपल्या लोकांना, लिली, थोमसन, पास्को, ह्याडली, इम्रान, अक्रम टाकायचेच ना, त्यांना नाही कुठे आडवी आली शरीरयष्टी ती. आपण मुळातच सहिष्णू. मैदानात यायच्या आधीच शेपूट दोन पायात ओढून पार पुढे पोटापर्यंत घेतलेलं. फास्ट बॉलिंग ही वृत्ती असते रे, तिथे सभ्यपणा काय *डीत घालायचाय? अरे, शिव्या नको देउस पण साला नजरेने तर खुन्नस देशील की नाही?' आम्ही सगळे टी.व्ही.सोडून नानांकडे बघायचो फक्तं. प्रत्येक वेळची कहाणी वेगळी, किती सांगणार?

बेकरनी केव्हिन करनला हरवून जिंकलेलं पहिलं विंबल्डन तिथे बघितलं होतं. मी बोलण्यात पटाईत त्यामुळे नाना मला आवर्जून बोलवायचे. 'सगोत्री आपण, कपी गोत्रं आपलं, माकडचाळे जास्ती आपले, एका कुळातले सहाजणच आपण, मराठे, विद्वांस, रटाटे, घैसास, चक्रदेव आणि शारंगपाणी. मजा येते तू असलास की. वग झाला पाहिजे रे, इकडून एक बोलला की समोरून तोडीस तोड आलं पाहिजे, तर मजा. तू येत जा रे बघायला'. आपण ९३ ला फ्रांसला डेव्हीसकपमधे त्यांच्याकडे जाऊन हरवलं होतं. मी गेलो होतो. रात्री काय तरी अडीच एक वाजले असतील. रमेश कृष्णन-गिल्बर्टचा सामना अंधार पडला म्हणून पाचव्या सेटला ४-४ असताना थांबवला होता. दुस-या दिवशी त्यानी तो सहज जिंकला. नानांच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणाले 'देशासाठी खेळतात रे हे लोक. काल त्या पेसनी घुमवला बॉश्चला म्हणून या सामन्याला महत्वं रे. साला असं पाहिलं की वाटतं, सुन्या, कपिल, कृष्णन, पेस यांच्या घरी जावं आणि यांचे हात पाय चेपून द्यावेत. खेळावर, खेळाडूंवर प्रेम करणारे नाना मला चौकापर्यंत सोडायला आले होते. 

बेकर, पेस, कृष्णन, अमृतराज, बोर्ग, मेकेनरो (आणि इतर अनेक), आपले काही आणि ऑस्ट्रेलिया, विंडीजचे खेळाडू यांच्याबद्दल बोलताना नाना भान विसरून बोलायचे. नोक-या लागल्या, त्यामुळे भेटी कमी झाल्या. अधूनमधून टेनिस, क्रिकेट बघतो. पण त्यात आता ती मजा नाही. नानाही आता ऐंशीच्या घरात असतील. टी ट्वेंटी नानांबरोबर बघायला हवीये एकदा. एक तर ते बघत नसतील किंवा यथेच्छ शिव्या देतील मला आणि खेळणा-यांनापण. सगोत्री असलो काय नसलो काय ते महत्वाचं नाही, क्रिकेटची आवड हे समानगोत्रं आहे हे नक्की. ती सर येणार नाही कदाचित पण म्हातारपणी नानांसारखा दरबार भरवून क्रिकेट बघेन असं म्हणतोय. 

भेट न झाल्याची चुटपूट लागायला नको म्हणून एकदा भेटून येईन म्हणतोय. 'परवाची म्याच पाहिलीस? हिजडयासारखे केस वाढवलेत ते काप म्हणावं आधी त्या शर्माला. सांगा रे त्याला कुणीतरी, थंड डोळ्यातून दहशत पाहिजे म्हणाव होल्डिंगसारखी, तो मार खाणार बघ एक दिवस' अशा वाक्यानी ओळखीची खूण पटेल आणि मग हरवलेल्या दिवसांची साचलेली आठवण डोळ्यातून हसता हसता बाहेर येईल.  

जयंत विद्वांस   




  

No comments:

Post a Comment