Thursday 17 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (८)…. ओमप्रकाश....

सत्तर एमएम चे आप्तं (८)…. ओमप्रकाश....

बक्षी ओमप्रकाश छिब्बर. काश्मीरमधे जन्माला आलेल्या या माणसाची जन्मतारीख मोठी मजेशीर आहे. १९/१२/१९१९, तीन वेळा एकोणीस. १९३७ साली हा माणूस महिना पंचवीस रुपये पगारावर रेडीओवर कामाला होता आणि त्यावेळच्या लाहोर पंजाबात फेमस होता. खरंतर अत्यंत रडवेल्या आवाजात बोलणारा हा माणूस ब-याच जणांना आवडत नाही. मला आवडतो. तो त्याच्या बोलण्याची शैली न बदलता हसवतोही आणि रडवतोही. त्याचे जुने सिनेमे फार पाहिलेले नाहीत मी पण पाहिलेल्या मोजक्याच सिनेमात तो आवडला ही निश्चित. सगळ्यात पहिला मला तो दिसला 'गोपी'मधे. शाळेत तेंव्हा वर्षातून एक सिनेमा दाखवायचे त्यात झालेला. त्यात तो दिलीपकुमारचा मोठा भाऊ होता आणि मग 'परवाना' मध्ये दिसला, अमिताभ ज्याचा खून करतो तो अशोक वर्मा (तोच प्लान 'जॉनी गद्दार'मधे पण होता).

काळाचा महिमा असतो, 'परवाना' आला तेंव्हा नविन निश्चलनी अल्फाबेटीकली नामावली द्यायला विरोध केला होता कारण अमिताभचं नाव पहिलं आलं असतं. 'मंगला'ला रिरन मधे पाहिला मी तेंव्हा नविन निश्चल कोप-यात निश्चल होता आणि व्हिलन अमिताभ पोस्टर व्यापून. पुण्यात श्रीकृष्ण, विजयानंद ही थेटरं काही 'विशिष्ट' चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत पण मी श्रीकृष्णला आई आणि विजूमामा बरोबर 'पडोसन' आणि शाळेतर्फे रांग करून जावून विजयानंदला 'शामची आई' बघितलाय. आता ती प्रथा बंद झाली. अर्थात थेटरात कुठला सिनेमा दाखवायला न्यायचं हा प्रश्नंच आहे म्हणा तसाही. त्यानंतर 'पडोसन' अनंत वेळा बघितला. मुद्गल फिरवणारा, लग्नाला तयार असणारा सुनिलदत्तचा रंगेल मामा. त्याची स्वत:ची अशी एक बोलण्याची ढब होती. रडके संवाद म्हणताना ती जास्ती जाणवायची. पण तो ए.के.हंगल सारखा गरीब, रडवेला चेह-याचा नव्हता.  

'चुपके चुपके' मधला तो संशयी, मिश्किल म्हातारा मस्तंच होता. शर्मिला गाणं म्हणत पडद्याआड काय करतीये नेमकं, ते बघायला तो उठतो, त्यातली सहजता, टायमिंग अफाट होतं. याच्यासारखाच डेव्हिड अब्राहम चेउलकर एक मस्तं पिकलेला, हसतमुख म्हातारा होता. अमिताभ बरोबर सिनेमात जे लोक सतत दिसायचे त्यात एक प्राण, इफ्तिखार, अमजद आणि ओमप्रकाश होता. लहानपणी शाळेत 'जंजीर' पाहिलेला तेंव्हा लक्षात राहिला होता तो बच्चनच्या स्वप्नातला घोडा आणि सतत बाटली हातात घेऊन फोन करणारा, दाढी वाढवलेला आणि रडक्या आवाजात बोलणारा डिसिल्व्हा. अमिताभ त्याला नाही म्हणतो त्यावेळेला खूप आशा धरलेली असताना झालेला अपेक्षाभंग आणि त्यामुळे त्याची बोलण्यात आलेली तळतळ अनुभवण्यासारखी आहे. त्यातला फोलपणा जाणवल्यावर तो अमिताभची माफी मागतो. तो हो म्हणाल्यावर त्याचा रडका आनंदी चेहरा बघा. बच्चनला त्यानी टफ दिलीये.

'प्यार किये जा' चा रामलाल आणि त्याचा तो अतरंगी मुलगा मेहमूद त्याला स्टोरी सांगतो तो सीन मेहमूद एवढाच ओमप्रकाशचा पण आहे. मेहमूदच्या बोलण्याप्रमाणे त्याच्या चेह-यावर झरझर बदलत जाणारे भाव तो असे दाखवतो की सगळं क्रेडीट मेहमूदला आपोआप मिळतं (त्यांच्यापुढे शरद तळवलकर आणि लक्ष्या, बात कुछ जमी नही). सुखी संसारातल्या बायकोसारखे असतात हे नट, क्रेडीट न मिळणारे. तरीपण हे लोक सीन खातात ते महत्वाचं. डेझी इराणीसारखे बालकलाकार, प्राण, ओमप्रकाशसारखे लोक पटकथेत लुडबुड न करता, स्वत:चं महत्वं न वाढवता चेह-याच्या हालचालींनी जान ओततात.

अमिताभबरोबर तो मुन्शी फुलचंद-शराबी, नमक हलाल-दद्दू आणि लावारिस-डॉ.गोएल उभा राहिला. लावारिसचा डॉक्टर फार मोठा नव्हता. पण 'शराबी'तला मुन्शीजी अप्रतिम. मुन्शीजी मरतो त्या सीनचा किस्सा वाचला होता. ओमप्रकाशला अमिताभ रडायला लागला की हसायला यायचं. दरवेळेला अमिताभ ग्लिसरीन न वापरता पाणी काढायचा. बरेच रिटेक झाल्यावर ओमप्रकाशच्या मनात प्रश्नं आला की आता खरं रडू आलं नाही त्याला तर परत रिटेक होणार. सीन संपला, कट ओरडल्यावर ओमप्रकाश ओक्साबोक्शी रडू लागला कारण अमिताभ पण खरा रडला म्हणून. शेवटी त्याचं सांत्वन करावं लागलं. त्याचा 'ज्युली' मधला लक्ष्मीचा दारुडा बापही मस्तं होता. नातवावर प्रेम करणारा दद्दू खास गावाकडचा बुजुर्ग.  

'अमर प्रेम'मधे पाणीपुरीत दारू घालून पिणारा कफल्लक रईस होता तो. त्यातल्या 'ये क्या हुआ' गाण्यात तो खन्ना बरोबर तालात धोतर घालून डुलतोही पण त्यानी गाण्यात एकदाच दु:खी एक्स्प्रेशन दिलंय ते बघाच. अतीव करुणेने तो पाठमो-या राजेश खन्नाकडे बघतो त्या करता अभिनय यायला हवा. तिथे त्याचा रडका आवाजही नव्हता, फक्तं चेहरा. नावं लक्षात नसलेल्या अनेक सिनेमातून त्याला बघितलाय. चरित्रं अभिनेता ही वेगळी फौज होती तेंव्हा. सगळीकडे संस्कार वाटणारे एकसुरी आलोकनाथ नव्हते तेंव्हा. अशोककुमार, शम्मीकपूर सारखे दिग्गज हिरो चरित्रं अभिनेते झाले. ओमप्रकाश काय हंगल काय, मोठी माणसं, केस पांढरे करून, ग्लिसरीन टाकून रडलं म्हणजे म्हातारा माणूस उभा होत नाही. 

त्यानी राजकपूरला घेऊन 'कन्हैया' काढला, निर्माता दिग्दर्शक तोच, अजूनही सिनेमे काढले त्यानी. मुंबईत नाव काढायला आलेल्या लोकांसाठी त्याचं घर धर्मशाळा होती, अनेक लोकांना त्यानी त्यांच्या स्ट्रगल पिरीयडमधे मोफत छप्पर दिलं, असं वाचलंय. बायको त्याच्या आधी गेली, त्याच्या लहान भावाबरोबर तो रहायचा. त्याला पाच मुलं होती. सगळ्यांवर तो पोटच्या पोरांसारखी माया करायचा.
स्वत:ला मूलबाळ नसलेला हा प्रेमळ माणूस पडद्यावर कायम माया करताना दिसला यात काय नवल?   

जयंत विद्वांस 



 

No comments:

Post a Comment