Monday 14 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (७)…. अमजदखान....

सत्तर एमएम चे आप्तं (७)…. अमजदखान....

विजूमामानी 'मधुमती' बघताना सांगितलं होतं, 'तो वैजयंतीमालाचा बाप आहे ना जयंत, तो तुझ्या गब्बरचा खरा बाप आहे'. बालबुद्धीला जयंत आणि अमजद हे कोडं बरेच वर्ष सुटलं नव्हतं. जयंत हे त्याचं पडद्यावरचं नाव आहे हे नंतर कळलं तोपर्यंत माझं नाव दोन्हीकडे ठेवतात असंच वाटायचं. आज अमजद असता तर पंचाहत्तरी साजरी केली असती त्यानी. वयाच्या अवघ्या एक्कावन्नाव्या वर्षी अकाली गेला तो. जोपर्यंत 'शोले' दाखवला जाईल, लोक बघतील, तोपर्यंत अमजद आणि गब्बर अमर आहे. मूर्तिमंत विष भरलेला, क्रूर, थंड रक्ताचा माणूस(?) त्यानी उभा केला आणि दोघंही अजरामर झाले. आधी स्टेजवर आणि मग सिनेमात वडिलांबरोबर छोट्या छोट्या भूमिका करणारा अमजद 'हिंदूस्तान की कसम' मधून पडद्यावर आला आणि मग थेट 'शोले' मधे. 

त्या आधी तो के.असिफला दिग्दर्शनात सहाय्य करत होता. गब्बर करण्याआधी त्यानी जया भादुरीच्या वडिलांनी, तरुण कुमार भादुरींनी चंबळेच्या डाकूंवर लिहिलेलं पुस्तक वाचलं होतं. त्याचे शॉट नसताना तो आणि सचिन रमेश सिप्पीला मदत करायचे. गब्बरची भाषा शैली अमजदनीच ठरवली होती. तो तुटक बोलतो. मुळात सलीम जावेदनी ते लिहिलंच इतकं सुंदर आहे की आधी त्यानी अमजद बघितला गब्बर म्हणून आणि मग लिहिलं असं वाटावं, इतकं सुंदर. लेखक लिहिताना जी पात्रं तो उभी करतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर काही माणसं धूसर असावीत किंवा काही माणसांची मिळून सरमिसळ डोक्यात असणारच. पडद्यावर ते उभं करणारा माणूस जर बुद्धीमान असेल तर तो स्वत:चं काहीतरी अधिक करतो आणि मग गब्बर सारखा अजरामर होतो. त्याचं ते पायात पाय घातल्यासारखं चालणं, तंबाखू खायची ती विशिष्ट लकब, ते क्रूर हसणं, 'बहुत याराना लगता है' म्हणतानाचा असुरी आनंद, 'जब तक तेरे पांव चलेंगे' म्हणतानाचा क्रूर निर्धार, ठाकूरला खिजवताना बोलण्यातला कुत्सितपणा आणि शेवटी डोळ्यात दिसणारं मरण, भीती असं अमजदनी अफाट दाखवलंय सगळं.  

त्याचे बच्चन बरोबरचे चित्रपट माझ्या लक्षात आहेत कारण ते मी वारंवार पाहिलेत. परवरीश, कस्मे वादे, मि.नटवरलाल, सुहाग, राम बलराम, बरसात की एक रात, कालिया, नसीब, नास्तिक, मुकद्दर का सिकंदर, सत्ते पे सत्ता, याराना, लावारिस. सगळेच सिनेमे भन्नाट होते असं नाही. पण मुकद्दर का सिकंदरचा दिलावर, सत्ते पे सत्ता मधला रणजीत सिंह आणि याराना मधला बिशन सुंदर होते. समोर तोडीचा खलनायक असेल तर नायक अजून उठतो. समोर औरंगझेब होता म्हणून शिवाजी जास्ती ग्रेट. तसा अमजद होता. त्याचा दिलावर, सिकंदर आणि जोहरा एवढाच ताकदवान होता. जोहरावर प्रेम करणारा गुंड. त्याच्या डोळ्यातली खुन्नस बघा त्यात. शेवटी उलगडा झाल्यावर त्याच्या आवाजातला आणि चेह-यावरचा पश्चाताप बघा. गैरसमजामुळे काय करून बसलो हे या अर्थाचं तो पुटपुटतो ते बघताना मी कायम अमजदला सलाम करत आलो आहे. काय करून बसलो हे, आता ते सुधारताही येत नाही ही घालमेल मरणाच्या दारात वाटतीये त्याला. त्याचं वैर जोहराच्या आशिकशी होतं, सिकंदर नावाच्या व्यक्तीशी नाही हे तो ठसवून जातो. 

त्याचा प्रेझेंस पडद्यावर नोटेबल असायचा. 'सत्ते पे सत्ता' मधला रंजिताच्या जीवावर उठलेला तिचा काका रणजितसिंह, बच्चन बरोबरचा त्याचा तो दारू पितानाचा सुप्रसिध्द संवाद, 'कस्मे वादे' मधला तो कुबडा जुडा, 'सुहाग' मधला बाप, 'लावारिस'मधला श्रीमंत, मुलगा रणजीत पुढे हात टेकलेला सज्जन बाप, अनाथ अमिताभ विषयी ओढ वाटणारा, सत्यं समजल्यावर झालेल्या चुकीची भरपाई करू पहाणारा बाप, 'याराना' मधला दोस्तासाठी इस्टेट गहाण टाकणारा, तो गायक झाल्याचं स्वप्नं बघणारा, पूर्णत्वाला नेणारा दोस्त बिशन, 'परवरिश'चा मंगलसिंह, 'उत्सव' मधला त्याचा गमत्या वात्सायन, 'चमेली की शादी', पाताल भैरवी' मधला विनोदी अमजद, 'हमसे बढकर कौन' मधला काजल किरणचा शेंडीवाला हिरो, 'कुर्बानी'त लैला मै लैला गाण्यात टोप घालून अमितकुमारच्या आवाजात 'ओ लैला, टुबुक टुबुक' म्हणणारा इन्स्पेक्टर अमजदखान, 'शतरंज के खिलाडी'मधला गुडगुडी ओढणारा वाजीद अली शाह.  

तसा तो माझ्या लक्षात आहे 'इन्कार'मधला राजसिंह. त्याची ती डाव्या पायाच्या मागे उजव्या पायाच्या बूट चमकवण्याची स्टाईल, नेमका हाताला खोटं ड्रेसिंग करून हात गळ्यात आणि चुकीच्या खिशात पाकीट ठेवलेलं, समोरचा माणूस त्याची चूक व्हायची वाट बघतोय आणि तिकीट काढण्यासाठी त्याला खिशातून पैसे काढणं गरजेचं आहे, ती सगळी घालमेल बघणीय आहे, त्याचा चेहरा, तो आटापिटा, ते क्षण संपवण्याची घाई परत परत बघावी. तो पाण्यातला पाठलाग, कुत्र्याला जबडा फाडून मारतो ते मोठ्या पडद्यावर बघण्याचा लायकीचं आहे. हल्ली हे सिनेमे थेटरात लागत नाहीत याचं अतीव दु:खं मला होतं. घरचा टी. व्ही. अगदी ४८", ५४" असला तरी त्यात ती सत्तर एमेमची मजा नाही. एकतर खुर्चीत बसलेलो नसतो त्यामुळे हातानी खुर्चीचे हात घट्ट धरता येत नाहीत. तो अंधार फार गरजेचा असतो. आपली कधी फाटते, कधी गहिवर येतो, कधी टचकन डोळ्यात पाणी येतं, कधी पोटात गोळा येतो, कधी खदखदून हसायला येतं. हे सगळं ज्या चित्रपटात असतं तो सुंदर एवढी माझी सुंदर चित्रपटाची साधी व्याख्या आहे. 


शहाऐन्शीला त्याला अपघात झाला. मग त्याचं वजन वाढलं. अदनान सामी वाचला पण वाढलेल्या वजनामुळे नुसरत फतेह अली आणि अमजद ही दोन चांगली माणसं मात्रं गेली. त्याला हृदयविकाराचा झटका आला. काही काळ त्याचं नाव कल्पना अय्यरशी जोडलं गेलं बाकी तो सज्जन माणूस होता. त्याचा मुलगा शादाब खान 'राजाकी आयेगी बारात' मधून पडद्यावर आला खरा पण तरला नाही. त्याचा भाऊ इम्तियाझ 'धर्मात्मा' सोडल्यास फार चमकला नाही, किर्ती देसाईशी लग्नं केलं ही बहुतेक त्याच्या बाबतची मी वाचलेली शेवटची बातमी. ब्रिटानिया ग्लुकोजची 'गब्बर की असली पसंद' अशी जाहिरात करायला मिळणारा तो पहिला व्हिलन होता. अमजद, तुझा खलनायक कधीही अश्लील, कामापिपासू, आचरट, विनोदी नव्हता. जे काय होतं ती शंभर टक्के शुद्ध दहशत होती. 'शोले' आणि 'इन्कार' मधे अनुक्रमे 'मेहबूबा मेहबूबा' आणि मुंगडा मुंगडा' दोन्हीत हेलनकडे आम्हीही नव्हतोच बघत वाईट नजरेनी आणि तू ही वाईट नजरेने बघताना काही दिसला नाहीस. तुला सगळे रोल चांगलेच मिळाले असं नाही.

काळ बदलला, व्हिलन बदलले, आता तू नाहीस, प्राण, अजित नाहीत. आता विकृती जास्ती आली, निखळ शुद्ध वाईटपणा कमी झाला. तू 'शोले'मधे म्हणाला होतास 'पचास पचास कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है, तो मां कहती है, बेटा सो जा, सो जा वरना गब्बरसिंघ आ जायेगा'. आता जागं रहावंच लागतं. पचास कोस सोड, आता फुटाफुटावर गब्बर झालेत. परत एकदा थेटरात 'इन्कार' 'शोले' बघण्याचा योग यावा. मी तुझ्या एन्ट्रीला खुर्चीत ताठ होऊन बसेन, हातात पट्टा, शिळांवर चालणारे नुसते पाय दिसतायेत, घाबरलेले तीन जण आणि अंधारात घुमणारा तुझा आवाज 'कितने आदमी थे?' मी मनातल्या मनात म्हणेन, कुणी मोजलेत? इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जणानी तुला पाहिलाय, प्रेम केलंय, अमोजणीय आहे ते.  
   
 
जयंत विद्वांस





No comments:

Post a Comment