Friday 12 June 2015

पी.एल. …….

मोठा माणूस. कर्तुत्वानी, दातृत्वानी, बुद्धीनी. अनुकरण करावा असा. अनुकरण मुद्दाम म्हणतोय कारण कॉपी करायला धारिष्ट्यं हवं, कुवत हवी आणि असली समजा तरी कातडं किती काळ पांघरणार, कोल्हेकुई समजतेच आज ना उद्या. पुलंचा सगळ्यात मोठा मला भावलेला गुण काय असेल तर खुदकन हसू आणणारा विनोद आणि टचकन पाणी आणणारं साधं सरळ वाक्यं किंवा शब्दं. त्यांनी खूप पण वाचनीय लिहिलंय पण फक्त 'व्यक्ती आणि वल्ली' जरी त्यांनी लिहिलं असतं तरी ते थोर म्हणूनच गणले गेले असते इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी. 

माणूस नजरेसमोर उभा राहील असं वर्णन कसं करायचं हे मी त्यांच्याकडून शिकलो, किंबहुना जी काही सत्यं/काल्पनिक व्यक्तिचित्रं आजवर लिहिली ती त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच. कॉपी शक्यं नाही त्यामुळे केली नाही पण शैली मात्रं असेल काही तर ती त्यांचीच. त्यांच्या काल्पनिक माणसांचं एखादं वाक्यं सुद्धा त्यांना आणि त्या पात्राला अजरामर करून गेलं. अजूनही 'ही गेल्यापासून दारचा आंबा मोहरला नाही' या वाक्याला पाणी येतंच, हरितातात्यांवरच्या लेखात 'पाठीला डोळे फुटावेत…' हा परिच्छेद वाचताना आवंढा येतोच, 'बटाट्याची चाळ' कालबाह्य झालं असेल कदाचित पण त्याचं शेवटचं चिंतन मात्रं चटका लावून जातं.  

दुसरा मोठा गुण म्हणजे कौतुक. चांगल्याचं जाहीर कौतुक करायचं, प्रस्तावना लिहायची आणि त्या माणसाला उभा करायचा. 'रामनगरी'मधे प्रत्येक प्रयोगाला राम नगरकर त्यांच्या ऋणाचा उल्लेख करायचे, मच्छिंद्र कांबळीचं 'वस्त्रहरण' फ्लॉप होतं आल्या आल्या, पुलंनी उचलून धरलं त्यानंतर मागे वळून पहायची गरज पडली नाही त्या नाटकाला. मूळ नाटक, पुस्तक सुंदर असणारच हे मान्यं पण प्रथितयश माणसाची थाप पडली की त्याचा प्रवास लवकर आणि विनासायास होतो. 

पुलंच्या लिखाणात तुम्हाला व्हिलन दिसणार नाही. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. वाईट दिसणार नाही, पहाणार नाही, ऐकणार नाही, सांगणार नाही. स्वत:च्या दु:खाचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात, लेखात मला सापडलेला नाही. त्यांची पहिली बायको लग्नाच्या दुस-या दिवशी गेली. निपुत्रिक होते. पण कुठेही कडवट सूर, उल्लेख नाही. पण बरं झालं ते निपुत्रिक राहिले. त्या वारसाची तुलनाहत्या झाली नाही त्यामुळे (अभिषेक बच्चन, रोहन गावसकर बघा - जिंदगीभर अमक्या तमक्याचा मुलगा हीच ओळख नशिबात). जे काही होतं ते पुलंबरोबर संपलं.

कधी विषण्णता आली, एकटं वाटलं, निरस वाटलं की मी पुलं हातात घेतो, हसतो, रडतो, रमतो, बाकी सगळं विसरतो आणि रिफ्रेश होतो. कुठल्याही पानापासून सुरवात करा, अडचण नाही. कधीही बघायला शोले, गणपतीत वाजायला नाच रे मोरा, मुंगडा मुंगडा आणि एकांतात/गर्दीत वाचायला पुलं, यांना पर्याय नाही. अजूनही पुलं दुकानात खपतात. पंधरा वर्षात नवीन काहीही आलं नसतानाही, अजून काय पाहिजे. पुलं म्हणालेत म्हणून मला वुडहाउस वाचायचाय. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला मिळाला होता वुडहाउस हैदोस लेव्हलच्या मासिकाशेजारी. मी कर्मदरिद्री, घेतला नाही तेंव्हा. आता घेईन आणि मरायच्या आधी वाचेन एवढं निश्चित. 

पुलंच्या अंत्यंयात्रेला मी गेलो नाही कारण मला तिथे हमसाहमशी रडता आलं नसतं. घरी टीव्ही वर दाखवत होते, जेवत असताना मला अनावर रडू आलं. त्या माणसानी आयुष्यं सुंदर केलं हे निश्चित. अजूनही तीच तीच पुस्तकं वाचताना खुदकन हसू येतं, कधी डोळे पाणावतात, हुंदका येतो, गलबलायला होतं.शेवटचा श्वास घ्यायच्या आधी इंद्रिये शाबूत ठेव एवढीच मागणी आहे देवाकडे, रात्री झोपताना 'व्यक्ती आणि वल्ली', गणगोत, गुण गाईन आवडी', 'साठवण' किंवा कुठलंही वाचून आनंदात झोपावं आणि सकाळी जाग येउच नये. असं झालंच तर फक्तं हस-या चेह-यानी जाण्याचा योग येईल. :) 

--जयंत विद्वांस
 
 

No comments:

Post a Comment