Monday 8 June 2015

वन्स अपॉन अ टाईम (१९).....

रिचर्डस, जयसूर्या, अरविंदा डिसिल्व्हा, सेहवाग, मार्क ग्रेटब्याच, कालुवितरणा, श्रीकांत, अतुल बेदाडे, रियाझ पूनावाला अशी उतरती कळा आठवण्याचं कारण म्याड म्याक्स डिसिल्वा. सगळे तडाखेबंद फलंदाज होते. बंडखोर सगळे. धुवायचं एवढंच माहित यांना. अजूनही माणसं राहिलीत या यादीत खरंतर. तसेही हिटर, पिंच हिटर असतात प्रत्येक टीम मधे. डिसिल्व्हा आला तेंव्हा रियाझ पूनावालाच होता. प्रत्येक बॉलला चौकार मारण्याची इच्छा असलेला. पण चुकतो तो डिसिल्व्हा आणि परत परत चुकतो तो श्रीकांत, पूनावाला, बेदाडे आणि तत्सम मंडळी. रिचर्डस या सगळ्यांचा बाप होता, बेदरकार, बिनधास्त आणि खेळाची मजा घेणारा. ते उपजत लागतं, पेंशनची सोय, रेकॉर्ड बुक मधलं स्थान वगैरे महत्वाच्या गोष्टींकडे या माणसांचं लक्ष नसतं. मला वाटलं मी केलं, परिणाम होतील ते होतील (हे विधान अतुल बेदाडे, रियाझ पूनावाला या आणि अशा इतर मंडळींसाठी लागू नाही). 

टी-ट्वेंटी आत्ता आली. रिचर्डस, डिसिल्व्हा, सेहवाग आधीपासून हेच खेळत होते. टी-ट्वेंटीमधे फिल्डिंग रेस्ट्रीक्शन असताना कुणीही तुडवेल हे लोक टेस्ट, वनडेला पण असंच धुवायचे. अर्थात शेवटी नशिबात असावं लागतं. ग्रेटब्याच सेम तुडवायचा पण न्यूझीलंड वर्ल्डकप जिंकू शकलं नाही डिसिल्व्हा नशीबवान. ते टीम जबराटच होती लंकेची. जयसूर्या, कालुवितरणा, अरविंदा डिसिल्व्हा, रणतुंगा, अटापटटू, महानामा, गुरुसिंघे, तिलकरत्ने, धर्मसेना, मुरली, वकारचा डुप्लिकेट पुष्पकुमारा. रणतुंगाची आयडिया भन्नाट होती. तुम्ही हाणा बिनधास्त, औत आउट झालात तरी चालेल पण पंधरा ओव्हर संपताना मला बोर्डावर शंभर हवेत. एवढासा देश आहे पण वर्ल्डकप नेला आणि दोनदा उपविजेते आहेत. रणतुंगाचे श्रम आहेत ते. समाजवादी संघ नसल्यामुळे सगळ्यांनी त्याचं ऐकलं हे महत्वाचं. 

एक तर अष्टपैलू भरपूर. रणतुंगा, डिसिल्व्हा, जयसूर्या दहा ओव्हर पूर्ण करण्याच्या लायकीचे गोलंदाजही होते. फलंदाजीतलं अपयश ते भरून काढायचे. अतिशय फ्लेक्झी टीम होती ती. आपल्याला सेमी फायनलाला त्यांनी लायकी दाखवली. पहिल्या दोन ओव्हरमधे अहिरावण महिरावण आउट झाले होते. श्रीनाथचा चेहरा सुद्धा कधी नव्हे ते हसरा झाला होता १-१, २-१ असताना डिसिल्व्हा आला आणि त्याने म्याच शांतपणाने काढून नेली. कुंबळेला मारलेले कव्हरड्राईव्ह शालीन होते. आपला एक्का निष्प्रभ म्हटल्यावर बाकी सगळ्यांनी माना टाकल्या. २५१ केल्या त्यांनी, आपण १२०. डिसिल्व्हा ६६ आणि एक विकेट तेंडूलकर ६५ आणि दोन विकेट, बाकी फरक उरलेला स्कोअरबोर्ड वाचला की कळेल. पेशवे पडले की आपल्याकडे बाकीच्यांनी गर्भगळीत होण्याचा प्रघात पूर्वीपासूनचा आहे. 

बाकी रेकॉर्ड काय वगैरे मारू देत, नसतीलही कदाचित त्याच्या नावावर फार पण शहाण्णवची फायनल मात्र या माणसानी एकहाती खेळली. नुसती जिद्द असून चालत नाही, मोक्याच्या क्षणी कर्तुत्व सिद्ध करावं लागतं, म्याड म्याक्सनी ते केलं. पहिल्यांदा बॉलिंग आली म्हणून त्यांनी माती खाल्ली नाही. अरविंदानी ४४ मध्ये तीन विकेट घेतल्या. दोन झेल घेतले आणि नंतर नाबाद १०७ काढल्या. म्याग्रा, राफेल, वार्न , फ्लेमिंग असे सरस गोलंदाज होते. इसको कहते है कर दिखाना. आता असं वेड बघायला मिळत नाही. संघात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नं भरपूर असतात पण खांद्यावर द्रोणागिरी आणणारा हनुमान विरळ, दुर्मिळ झालाय. रावणाच्या लंकेतला त्यांना संजीवनी, प्रतिष्ठा देणारा हा हनुमान मात्रं लक्षात राहिलाय, एवढं खरं.    

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment