Monday 1 December 2014

कुत्तेकी मौत.....

रविवार, चार जुलै चार. सहसा तारखा माझ्या लक्षात रहात नाहीत (त्याचं कारण पुन्हा कधीतरी). ही तारीख एवढी लक्षात रहायचं कारण म्हणजे आर्याला आठ महिने पूर्ण झाले होते म्हणून. माझ्या वहिनीचं बदलापूरला ऑपरेशन झालं होतं. प्रथमच आर्याला एकटीला घरी ठेवून तिला बघायला मी आणि क्षमा फ़िएरोवर वर गेलो होतो सकाळी सकाळी. येताना रणजीत त्याच्या क्रक्सवर सोबत होता. पोचलो, तिला बघितलं आणि लवकर घरी पोचायच्या हेतूने दुपारीच निघालो, पाऊस नव्हता हे नशीब. खोपोलीच्या अलीकडे "अंकल'ज किचन"ला जेवलो. लोणावळ्याच्या आसपास पाऊस पडून गेलेला. कामशेत नंतर मला हेल्मेटचा कंटाळा आला म्हणून ते मिररला अडकवलं. दोघांच्या अंगावर रेनी ड्रेस तसाच. रस्त्याला गर्दीही फारशी नव्हती. वडगाव सोडलं असेन आणि ते घडलं.

मी रोडच्या कडेला उभा होतो, शेजारी क्षमा आणि रणजीत. तो, "बरा आहेस ना?". "कुठे आहोत आपण?", मी. सिनेमात दाखवतात तसं माझी याददाश्त गेली बहुतेक असं त्याच्या चेह-यावर दिसत होतं. आम्ही उभे होतो त्याच्या मागच्या बाजूलाच एक ढाबा होता. तिथे जाऊयात म्हणाला, तोंड धू आणि बस जरा म्हणाला. बसलेलं तमाम पब्लिक मी शेलेब्रिटी असल्यासारखं माझ्याकडे बघत होतं. तेंव्हा कपड्यांसकट माझं वजन लाजत लाजत पन्नास भरायचं. हातभार म्हणून दाढीही वाढवायचो. तर मी बेसिनला गेलो आणि आरशात पाहिलं. दुसराच माणूस आधी तोंड धुतोय की काय वाटून बाजूला होणार होतो म्हटलं दाढी तर आपलीच दिसतीये, थांबलो. उजव्या नाकपुडीच्या खाली आणि मिशीच्या वर एक लाल रेघ, मिशीच्या उजव्या भागात फाळणी झालेली, हनुवटीवर एक लाल स्ट्राबेरी एवढा गुच्छ (गॉगल फुटून घुसलेला), सटपटलो. काय झालंय नेमकं? माझा चेहरा जेमतेम दिसेल एवढाच आरसा होतो, तोंडावर पाणी मारायला गेलो आणि बोंब ठोकण्याच्या बेतातच होतो मी. पाणी लागल्यावर दोन्ही हात झोंबले.


डाव्या हाताची चारी बोटं क्लचसकट रोडवर घासली गेल्यामुळे सोललेल्या चिंबोरीसारखी लिबलिबीत दिसत होती. तीस एकतीसचे महिने मोजतो त्याच्यावर चार ठिकाणी बोराएवढे चार सोलवटलेले लाल डाग, चौथं बोट पार कामातून गेलेलं. निर्जीव, ताकद नसलेलं (ते अजूनही वाकडच आहे). दोन्ही गुडघ्यावर, कोपरांवर रेनी ड्रेस फाटून आतली जीन फाटलेली आणि गुडघे, कोपरं किसणीवर किसल्यासारखी अशी एकूण अवस्था होती. चहा प्यायलो आणि जरा तरतरी आली. रणजीतनी विचारलं, काय झालं काही आठवतंय का? 'नाही, काय झालं नेमकं?' 'तुम्ही पुढे होतात, मी मागे पन्नास फुटांवर. आपल्या डाव्या बाजूला शेतात दोन कुत्री भांडत होती. एक दुस-याला जोरात चावलं, ते जे तडक १२०० सीसीच्या स्पीडनी निघालं ते बरोब्बर तुझ्या दोन चाकात पर्पेंडीक्युलर आलं. गाडी जागेवर वेडी झाली आणि तू गाडीबरोबर स्कीईंग केल्यासारखा फरफटत गेलास. मागे कुठेलीही मोठी गाडी नसल्यामुळे अनर्थ टळला". क्षमाला फार नव्हतं लागलं, मुका मार आणि घाबरली जास्ती होती. 

गाडीवर बसता येईना. क्लच दाबायला डाव्या हाताची करंगळी फक्तं शाबूत होती. रणजीतनी कात्रजलाच जाणा-या एका माणसाला रिक्वेस्ट केली डबलसीट घ्यायला पण मागे मला पाय दुमडून बसता येईना. शेवटी म्हटलं राहू दे, क्षमा त्याच्या गाडीवरच होती नाहीतरी, मला कव्हर दे चौक आला की, देहूरोड ते कात्रज फक्तं सेकंड गिअरवर, ब्रेक दाबायला लागणार नाही एवढाच स्पीड, गिअर बदलायला किंवा ब्रेक दाबायला पाय गुडघ्यात मुडपताच येत नव्हते. दोन अडीच तास लागले घरी यायला. घराजवळ रस्त्यात डॉक्टर होता तरी थांबलो नाही म्हटलं आधी घरी जाऊ मग परत चालत येतो पण आत्ता घरी चल. हेकटपणाला हसलेही असतील माझ्या. पण ड्रेसिंग केल्यावर पाय ताठ झाले असते, गाडी नसती चालवता आली. अजूनही फुटलेला उजवा इंडिकेटर आणि घासलेला डावा क्लच मी तसाच ठेवलाय. कुत्तेकी वजहसे कुत्तेकी मौत आनेवाली थी, बच गया, मैं भी, वो कुत्ता भी.  




घरी आलो आणि बेडरूममधे गेलो. न घडलेल्या अनर्थाच्या नुसत्या कल्पनेनेही माझ्या चेह-यापेक्षा सगळ्यांचे चेहरे भेसूर झाले होते. आर्या शांत झोपली होती. तिला बघितलं आणि का माहित नाही पण आयुष्यात आनंदानी पहिल्यांदाच एवढा ढसाढसा, हमसून हमसून रडलो.

--जयंत विद्वांस


1 comment:

  1. प्रमोद गानु1:21 pm, April 05, 2016

    Very nicely written .

    ReplyDelete