Monday 24 November 2014

सवाई.....

मुळात मांड्या ठोकून शास्त्रीय गायन ऐकण्याइतपत मला त्यातलं कळत नाही. नाट्यसंगीत फार त्रास न होता ऐकता येतं, आवडतंही. ३१ डिसेंबर ९१ ला मी रविराज सोडणार होतो हे नक्की होतं. "सवाईला येशील"? म्हणजे ती जायचीच हे त्यात आलं. येतो म्हटलं. एकतर थंडी मरणाची, आधीच पुण्यातली माणसं वेधशाळेच्या आकड्यानुसार स्वेटर घालतात, थंडी वाजायलाच पाहिजे असं नाही. तर मी येतो म्हटलं. "साडेनऊ-दहा पर्यंत ये रमणबागेच्या मेन गेटला. मी नसले तिथे तर स्टेजच्या उजव्या बाजूला ये, सापडेन. आई बाबा आहेत बरोबर, बावळटासारखं किती शोधलं म्हणू नकोस. अचानक भेट झाली असं दाखवायचंय. ते दोघं नारायणपेठेत मावशीकडे जातात बारापर्यंत, तोपर्यंत कळ काढ."

स्टेजच्या उजव्या बाजूला सापडली, अभिनय उत्तम जमला असावा मला पण कदाचित ओसंडून आनंद घात करणार असंही वाटलं. मी तिच्या घरी गेलेलो त्यामुळे नावानिशी ओळख होतीच. औपचारिकता पूर्ण झाल्यावर ते गाण्याकडे वळले, आम्ही एकमेकांकडे. साडेदहाला ती म्हणाली, "आई, फ्फार बोअर मारतोय हा, झोप येतीये, चल रे चक्कर मारून बघू अजून कोण ओळखीचं दिसतंय का ते. सांगण्यात परवानगी गृहीत असल्यामुळे आम्ही उठलो. कुणीही वळून बघावं आणि माझा दु:स्वास करावा अशी होतीच ती. माझ्या हातात नाकापाशी धरलेला अदृश्य गुलाब आणि दृश्य मस्तानी डाव्याबाजूला. असंख्य नजरा झेलत आम्ही गेटमधून बाहेर शनिवारात आलो. तिनी शाल आणली होती. तेवीस वर्षापूर्वी पुणं कमी जागायचं. रस्त्याला सन्नाटा, बोचरी थंडी, हातात हात घालून आम्ही नि:शब्द बालगंधर्वपर्यंत चालत गेलो. पूल संपतो तिथे डावीकडे वळताना मस्तं झाड होतं. "बसूयात इथे?" असं तिनी खाली बसून विचारलं. आज्ञाधारकतेने आज्ञा द्यायची तिची उपजत लकब.

पांढरी शाल गुंडाळून बर्फ झालेल्या सिमेंटवर बिलगून बसलो दहा मिनिट अंधार उपभोगत. "इथे नको बसूयात, येताना मला जागा दिसलीये एक, सेफ आहे चल", म्हणाली. देवी हाईटस कडून रमणबागेकडे येताना डाव्या हाताला दुमजली घराच्या पुढचा सिमेंटचा कट्टा आणि ओटा संपतो तिथे कॉर्नरला पंचेचाळीस डिग्रीत लोखंडी पट्टी लावलेली बंद पानटपरी. कडेच्या कट्ट्याला किंवा त्या दरवाज्याला टेकून जेमतेम दोन माणसं दाटीवाटीनी बसू शकतील इतपत जागा. थंडी मरणाची. अपुरी शाल पांघरून आम्ही बसलो चिमणाचिमणीसारखे. भुतासारखे डोकी फक्तं बाहेर ठेवून. गस्तीला बसावं तसं आम्ही पहाटे पाच पर्यंत बसलो तिथे. शब्दं हळूहळू कमी झाले, स्पर्शानी, बोटांनी खूप बोललो. रात की बात है और रात अभी जादा बाकी तो नही अशी अवस्था. "वेडे आहोत का रे आपण" निघताना ती दाटलेल्या आवाजात म्हणाली. शाल तिची होती, काढून घ्यायच्या आधी तिनी जीव गुदमरेल अशी मिठी मारली. "उद्या येशील?" मी नाही म्हटलं. कुठल्याही गोष्टीतलं पहिलेपण जपायचं असेल, स्मृतीकुपीत साठवायचं असेल तर ती गोष्टं नजीकच्या काळात लगेच करू नये. नाविन्यं संपतं.

काळ हातानी किल्ली फिरवल्यासारखा झरझर सरला. थंडी आताही पडते, सवाई दरवर्षीच भरतं (आता वेळेच्या बंधनात), शहर पुणं रात्रं काय दिवस काय झोप न आलेल्या माणसासारखं टक्कं डोळे उघडे ठेवून जागं असतं, ते घर अजून तसंच उभं आहे. थंडीत तिचे मानेशी उष्मा निर्माण करणारे गरम श्वास… जाऊ दे. कधी वाटतं त्या पानवाल्याला जाऊन विचारावं, तेविस वर्षापूर्वी डिसेंबरला सकाळी दार उघडताना दरवाजा जरा जास्तच उबदार वाटला होता का हो?

--जयंत विद्वांस



1 comment: