Saturday 8 November 2014

काजळे.....

चौ-याऐंशीला ओळख झाली आमची रस्टनला. दोघांचाही ट्रेड सेम होता. सहा फुटाच्या आसपास उंची, गोरापान, देखणा, सरळ नाकाचा, डबल हाडाचा आणि उठून दिसणारा, लक्ष वेधून घेणारा, केस, मिशी, डोळे आणि भुवयांचा काळा रंग. त्याच्या गो-यापान चेह-यावर अगदी मुद्दाम रंगवल्यासारखा तो रंग रेखीव दिसायचा. दाढी वाढवली तर उर्वरित लाल गोरा चेहरा अगदी मस्तं दिसायचा. त्याचे वडील नेहरू स्टेडीअमजवळ जिम मधे इन्स्ट्रकटर होते, हा ही तसा कमावलेल्या अंगयष्टीचा माणूस.

खूप कमी बोलायचा, कुणाच्याच अध्यात मध्यात नसलेला,  सेन्स ऑफ ह्यूमर उपजत असलेला, पण हसणंही अगदी मोजकं, गालातल्या गालात. आम्ही सगळे १७-१९ वयाच्या रेंज मधले. अचकट विचकट बोलणे, शिव्या देणे, शिग्रेटी ओढणे, टपरीवर भजी, चहा वर तासंतास गप्पा ठोकणे, एस.पी.वर संध्याकाळी क्रिकेट खेळणे असे उद्योग करायचो. हे सगळं त्याला माहित असायचं पण तो कशातच नसायचा. त्याच्या वाटेलाही कुणी जायचं नाही, एक तर तो तगडा होता आणि सज्जन होता. कमी बोलणा-या माणसांचा एक अदृश्यं दरारा तयार होतो, तसा होता त्याचा. आमच्या दृष्टीने तो निरुपद्रवी होता.

गुरुवारी आम्हांला थेअरीसाठी ए.टी.एस.एस., चिंचवडला जावं लागायचं. टवाळ्क्याच जास्तं. मी, मोडगी, कुट्टी गाणी म्हणायचो भसाड्या आवाजात. ठेका धरायला भरपूर होते. काजळे एकच गाणं म्हणायचा आवाज बदलून, 'सून सायबा सून……'. बाहेरून ऐकणा-या माणसाला खरोखर मुलगी/बाईच गातीये असं वाटेल इतकं सरस म्हणायचा. कुठेही आवाज चिरकणं नाही, बेसूर नाही. बरं या गोष्टीचा त्याने मोठेपणा कधीच मिरवला नाही. मुळात त्याला काही त्यात विशेष वाटायचंही नाही. दोनचारवेळा आग्रह झाला की आढेवेढे न घेता म्हणायचा आणि परत शांत बसून सगळी गंमत अब्सोर्ब करत बसायचा. माझ्या सततच्या विनोदी बोलण्याला स्मित हास्याची दाद असायची आणि भन्नाट हजरजबाबाला डोळ्यात कौतुक. 


सत्याऐंशीला रस्टन संपलं आणि वाटा वेगळ्या झाल्या. मी ही बदलापूरला गेलो अठ्ठ्याऐंशीला मग सगळ्यांशी पार संपर्क तुटला. आमचाच एक त्यावेळचा कॉमन मित्रं भेटतो अधूनमधून. तरी आठ नऊ वर्ष झाली या गोष्टीला. एकदा त्याचा मला फोन आला, म्हणाला "काजळे आठवतोय?" म्हटलं "हो, का रे?" "अरे, तो काल मला अरण्येश्वरच्या देवळात भेटला. वेडा नाही म्हणता येणार पण तीच स्टेज. दाढी, केस वाढलेले आणि चेह-यावर निष्प्राण शांतता, तासंतास देवळात बसून असतो, चेंज म्हणून घरी जातो, तिथे कंटाळा आला की देवळात. काय झालंय नक्की कुणाला विचारणार, त्यामुळे मी जनरल गप्पा मारल्या, आपल्या ब्याचच्या मुलांची नावं विचारली. माझं नाव ही त्याला आठवेना. विद्वांस आहे लक्षात म्हणाला. कधी गेलास तर जा देवळात, बघ सापडतोय का."

मी आजतागायत त्या देवळात गेलेलो नाही. गेलो तरी माझं बोलायचं धाडस होणार नाही. विचार केला की वाटतं त्या माणसाच्या दृष्टीनी वेड लागणं किती फायद्याचं असेल ना? अपेक्षाभंग, प्रेमभंग, अपयश कशाचंही दु:खं नाही. पॉझ केलेलं आयुष्यं. पुढे काय घडतंय याची उत्सुकता नसलेलं. मरणाची तर नाहीच पण जगण्याचीही भीती नाही. काय घडत असावं मेंदूत इतकं? सगळा डाटा इरेझ होण्यासारखं? त्याचा त्या व्यक्तीला त्रास होत असेल? दु:ख काय किंवा आनंद काय सहनशक्तीच्या पलीकडे गेलं की हार्ड डिस्क उडत असावी बहुतेक. पीसी सारखी रिप्लेस करता येत नाही हे दुर्दैवं. 
जयंत विद्वांस


2 comments:

  1. apparently a case of nervous breakdown in which even an intervention by near ones seldom helps :( << पॉझ केलेलं आयुष्यं. पुढे काय घडतंय याची उत्सुकता नसलेलं. मरणाची तर नाहीच पण जगण्याचीही भीती नाही. काय घडत असावं मेंदूत इतकं? सगळा डाटा इरेझ होण्यासारखं? त्याचा त्या व्यक्तीला त्रास होत असेल? दु:ख काय किंवा आनंद काय सहनशक्तीच्या पलीकडे गेलं की हार्ड डिस्क उडत असावी बहुतेक. पीसी सारखी रिप्लेस करता येत नाही हे दुर्दैवं...>> Touching..

    ReplyDelete
  2. Very touching n disturbing

    ReplyDelete