Friday 21 November 2014

मस्साला डोस्सा.....

साल १९९१. हॉटेल रविराजला अकाउंटसला ट्रेनी म्हणून जॉईन झालेलो. पगार पाचशे आणि बिन पेट्रोलची टू व्हिलर हर्क्युलस. मस्तं चाललं होतं. एकतर ऑफिसमधे तीन मुली, असेना का म्हटलं पगार कमी. मला अकाउंटसचं काहीच यायचं नाही त्यामुळे प्रत्येक जण माझा गुरु. ज्ञान देण्याच्या आनंदापेक्षा आपल्यापेक्षा कमी माहितीचा माणूस सापडला की काय आनंद होतो ना पब्लिकला. तर यथावकाश xxx xxकर ला माझ्या बद्दल जरा वेगळं वाटायला लागलं. ती पर्मनंट होती तेंव्हा, माझ्या पेक्षा एक वर्षांनी मोठी. मग गप्पा, जे.एम.रोड ला रविवारी चक्कर मारणं चालू झालं. भरभक्कम पगार असल्यामुळे हॉटेल मधे कोण चल म्हणणार? भेळ परवडेबल मेन्यू होता.

आणि तो काळा दिवस आला एकदाचा. मला म्हणाली, उद्या आपण सनराईझला जायचं रे. तिथे हाकलत नाहीत कितीही वेळ बसलं तरी. (माझ्या हयातीत पुण्यात झालेल्या एकमेव दंगलीत लोकांनी सनराईझ पेटवलं इराण्याचं हॉटेल म्हणून. ते अक्रोडचं फर्निचर, केक, सामोसे, तो स्पेसिफिक चवीचा चहा, गेलं सगळं). म्हटलं जाउयात. त्यातला त्यात बरा असलेला ड्रेस घरी जाऊन इस्त्री केला. दाढी सकाळी केली कारण तेंव्हापासूनच ती सुफला १५:१५:१५ टाकल्यासारखी मायंदाळ उगवतीये. कावळा जेवढा देखणा दिसू शकेल तेवढा मी निश्चित दिसत होतो आणि पोचलो एकदाचा. हॉटेल मधे जाण्याचे प्रसंग त्या दिसापर्यंत मित्रांबरोबर ते ही क्वचित. आयुष्यात पहिल्यांदा देखण्या मुलीबरोबर (अरुणा इराणी सारखी दिसायची, कोब्रा गोरी, बुटुक) हॉटेलमधे, रात्रभर झोप नाही. 

मी वाटतोय एवढा बावळट नाहीये अशी पाटी गळ्यात अडकवावी का असंही वाटून गेलं. आम्ही बसलो, सोड्याच्या बाटलीसारखी फसफसत म्हणाली, काय खाणार? मी मेनू कार्ड घेतलंच नाही हातात, रेट बघून पडलेला चेहरा तिनी ओळखला तर? म्हटलं तू सांग. "मसाला डोसा, ओक्के?" मला ब्रम्हांड आठवलं, चटणी, सांबार मी कपड्यांवर स्पर्धा लावल्यासारखं सांडतो. मोठी पंचाईत. म्हटलं छे, इराण्याकडे? उसके लिए अण्णा लोग चाहिये. इथे सायकल मारून भूक मरणाची लागलेली. तिनी माझ्यासाठी सांडविच सुचवून उपकार केले. मी सौस लावला नाही. नाही म्हणजे नाही कपड्यावर सांडवायचं, ठरवलेलंच मी. कौफी पण गार होत आली की प्यायची ठरवलेलं, जीभ भाजली म्हणून सांडली तर? (बावळट म्हटलं की राग का येतो मग मला? असण्याची शक्यता आहे कारण अजूनही फारसा फरक पडलेला नाहीये). 

डोसा आला,सांडविच आलं. आम्ही चारलाच गेलेलो, आम्ही दोघेच फ्यामिली सेक्शनला. वेटर पण शहाणा, हाक मारली तरच येणारा, तिनी डोळे मिचकावले, म्हणाली, खाण्यासाठी एकांत? बस म्हणावं पलीकडच्या खुर्चीत. माझ्या अंगावर मोरपिसं, मोराच्या मागे सुद्धा कमी असतील. म्हणाली, लोक का घाबरतात काय माहित, मला हातानी डोसा खायला जाम धमाल येते. तिचा डोसा संपेपर्यंत मी "बावळट स्पर्धे"त पोल पोझिशन मिळवून गोल्ड मेडल साठी मान झुकवून उभा होतो. 

तेवीस वर्ष झाली. असेना का बावळट मी पण अजूनही डोसा खाताना सनराईझ आठवतं, ती आठवते आणि मिरची लागल्यासारखं डोळ्यात पाणी येतं. 
--जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment