Tuesday 11 November 2014

उर्मिला....

प्रिय सीतावहिनीस,

कोण म्हणतं कैकयीनं रामासाठी वनवास मागितला? जगाच्या दृष्टीने असेलही तसं पण माझ्या दृष्टीने नाही.  त्यांनी मागितला तुमच्यासाठी, भोगला मी. आपण दोघीही साधारण एकाच वयाच्या ना गं तेंव्हा. सहजीवनाची रंगीत स्वप्नं दोघींनाही जवळपास थोड्याफार फरकाने सारखीच पडली असणार. किती हरखून गेलो होतो ना आपण.

त्या कोवळ्या वयात तुझ्यावर झालेला आघात जबरदस्तच होता. एका स्त्रीच्या हट्टापोटी, पुत्रप्रेमापोटी दुस-या स्त्रीच्या नशिबी वनवास आला. पावसाळ्यात जसा क्षणार्धात वातावरणात बदल होतो, घटकाभरापूर्वीचं निरभ्रं आकाश काळ्या ढगांनी गजबजत तसं तुझ्या प्रारब्धावर काळे ढग जमा झाले. आकाशातला पाऊस तुझ्या डोळ्यात वस्तीला आला.

पण मोठेपणा, मानमरातब मिळायला सुद्धा नशिब लागतं बघ. युद्धात मरणा-या सगळ्याच वीरांच्या नशिबी सन्मान येतो असं नाही. तसंच झालं माझ्या बाबतीत. तू गेलीस् त्याच्या पाठोपाठ, तुझं चूक नव्हतंच काही. तू पत्नीधर्म सांभाळलास. तू नायिका झालीस गं. तुझ्या सुखदुःखाचे पोवाडे झाले, मी मात्रं उंबरठ्याशीच् राहिले.  माझ्या दु:खाची नोंद नाही. हे चल म्हणाले असते तर  आले नसते? पण मग रामायण वेगळं लिहिलं गेलं असतं.

वनवासात का होईना पण तो तुझ्या सोबत होता. रानावनात का होईना तू चार सहवासाचे अमृत क्षण भोगलेस तरी, मी मात्रं एकटीच् राहिले मागे, दिवसरात्र एकांतात पावसाळी ढगासारखी रडत, सकाळ झाली की नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून बघत. गळवासारखं ठसठसणारं आयुष्यं भरजरी वस्त्रासारख सांभाळत. घरात सतत तुमचच कौतुक, सतत तुमचीच् काळजी. माझा त्याग राजवाड्यातला त्यामुळे मी उपेक्षितच् राहिले. अगं नवरा बरोबर असेल तर वनवास सुद्धा सुसह्य असतो, मी गाद्या गिर्द्यांवर, ऐश्वर्यात सालंकृत वनवास भोगला.

वाईट असेल पण घडलं तरी गं तुझ्या आयुष्यात काही. माझं आयुष्यं सपाट, रसहीन, सगळ्यांच्या सहानुभूतीच्या नजर झेलण्यात गेलं. मी तरीही जगतच् राहिले उद्याच्या आशेने. मला असूया नाही, द्वेषही नाही. वहिनीच्या नात्यापेक्षा आपलं बहिणीचं नातं जवळचं आहे. पण माणूस मोठा झाला की त्यानी लहान लहान स्वप्नं बघूच नयेत का गं? मोठ्या स्वप्नांचे स्वप्नभंगही मोठेच असतात.

नाही जास्तं काही लिहित आता. पण माझ्या मनातली इच्छा सांगते तुला. परत जेंव्हा रामायण घडेल तेंव्हा मी तुझा जन्मं मागितलाय. याचा अर्थ अदलाबदल करून तुला माझा मिळावा इतका माझा क्षुद्र हेतू अजिबात नाही. पण मला ते रानावनातलं का असेना सहजीवन उपभोगायचंय. मी देवाकडे ऐश्वर्यात निर्माल्यं करणारा नवरा नको, वनवासात बरोबर नेणारा मागितलाय...बरोबर नेणारा मागितलाय...
तुझीच अभागी ….

उर्मिला
.....
जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment